भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित महाराष्ट्रातील हे एकमेव मंदीर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा गावातील आहे. सध्याचे हे मंदीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे. भगवान विष्णूची मोहिनी अवताराची ही मूर्ती जिला भक्त "मोहिनीराज" म्हणतात ती अर्धनारी नटेश्वर रूपातील आहे. म्हणून अलंकार पूजा करतांना मूर्तीला साडी व पितांबर दोन्ही नेसवतात. मोहिनी अवताराची थोडक्यात कथा अशी की, समुद्र मंथनातून निघालेले अमृत राक्षस गण पळवून नेतात. अमृत प्राप्ती साठी देवगण भगवान विष्णू ला शरण जातात. तेव्हा भगवान विष्णू मोहिनी चे रूप धारण करतात व अमृत प्राशन करण्यासाठी आपापसात भांडणाऱ्या राक्षस गणांन समोर येतात. मोहिनीच्या सौंदर्याला राक्षस गण भुलतात, अमृत वाटण्यात मदत करते म्हणून मोहिनी राक्षसांना मदिरा व देवांना अमृत पाजते. हा मोहिनी अवतार सध्याच्या नेवासा गवाजवळील गोदावरीच्या तीरावर झाला असे भक्त मानतात.
मंदिराचे बांधकाम नागर स्थापत्य शैलीतील असून मंदिर उंच अधिष्ठानावर स्थित आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेकडे असून प्रवेश द्वारावर द्वारपालांच्या मूर्ती आहे. सभामंडपातील वितान वाद्य वाजवणाऱ्या व नृत्य करणाऱ्या पुत्तलीकांनी तोलून धरले आहे. द्वारशाखेवरील ललाट पट्टीच्या वरती भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले आहे. गर्भगृहात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेली ४.५ फूट उंचीची श्री मोहिनीराजाची मूर्ती, उत्सव मूर्ती व शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे.
- रोहन गाडेकर
No comments:
Post a Comment