Followers

Sunday 14 March 2021

#किल्ले_ब्रह्मगिरी #दुर्ग_भांडार

 









































#किल्ले_ब्रह्मगिरी
#दुर्ग_भांडार
०७/०३/२०२१
नाशिक म्हटले कि सर्वप्रथम आपल्यासमोर उभे राहते ते तिर्थक्षेत्र गोदावरी नदीकाठचा सिंहस्थ कुंभमेळा, शिर्डीचे साईबाबा, त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंग मंदिर, कुशावर्त तिर्थ,संत निवृत्तीनाथांची समाधी, पंचवटीतील काळाराम मंदिर, सप्तश्रृंगी गड असे अनेक क्षेत्रं आहेत.तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंचीवर असलेले गडकिल्ल्याचा मान नाशिक जिल्हालाच मिळतो.आमच्या #Dream_Adventureclub च्या माध्यमातून किल्ले ब्रह्मगिरी दुर्ग भ्रमंतीची मोहिम आयोजित करण्यात आली होती.नेहमी प्रमाणे वीस जण होते.शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान ठाण्यावरून नाशिक कडे प्रस्थान केले.ते पहाटे साडेचार वाजता मजल दर मजल करत त्र्यंबकेश्वर गावात पोहोचलो.पोहोचल्या पोहोचल्या फ्रेश होऊन त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ हे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन १७५० मध्ये बांधण्यात आले आहे गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी प्रकट होते अशी लोकांची श्रद्धा आहे.अगोदर येतील दर्शन घेऊन मग बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरांचे मनोभावे दर्शन होऊन दिवसाची सुरूवात अगदी प्रसन्न झाली.त्यानंतर गड पायथाला असलेले दत्तादादांचे हाॅटेल भवानी मध्ये नाश्ता करून सर्वांची ओळख परेड घेऊन गड चढाईस सुरूवात केली.
पायथापासूनच गडाच्या माचीपर्यत पायर्यांची वाट गडावर जाते.वाटेवर ठिक ठिकाणी छोटी हाॅटेल आहेत.सर्वप्रथम वाटेत छोटेखानी श्री दुर्गामाता मंदिर आहे.दहा- पंधरा मिनिटे चालल्यावर उजवीकडे एक पायवाट गंगाव्दार कडे जाते.कातळातील गुफामध्ये श्री कोलंबिका मंदिर,१०८ महादेव मंदिर आणि श्री गहिनीनाथ महाराज यांची गुफा आहे.हे पाहून पुन्हा मागे वळून पाहिल्या वाटेवर यायचे.पुन्हा आठ दहा मिनिटांच्या अंतरावर मुलतानी लालचंद जसोदानंदन भंभाणी (पंजाब) यांनी सन १९१३ मध्ये बांधलेली धर्मशाळा आहे.त्याच्याच पाठिमागे साधारण ७० पायर्यांची बारव (stepwell) आहे.हे बघून पुन्हा पायर्याच्या वाटेने चढून गेल्यावर मध्येच कातळात कोरलेल्या हमुमानाची मुर्ती लागते.त्यापुढे कातळात देवीची मूर्ती कोरलेली आहे.याच ठिकाणी खायला काहीतरी मिळेल या आशेवर माकडे अगदी अंगावर येऊन बसतात.हातातील बॅग, पिशवी खेचण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे येथून जाताना जर संभाळूनच जावे लागते.साधारण दिड तासाच्या पायपीटनंतर पायर्याची वाट चढून आल्यावर आपण प्रथम प्रवेशद्वारातुन गड माचीवर प्रवेश करतो.दरवाज्याच्या दोन्ही बाजूला व्दारपालांसाठी देवड्या आहेत.पायर्यांची वाट संपल्यावर वरती डाव्या बाजूला अज्ञात व्यक्तींच्या समाध्या आहेत.तसेच पाण्याची टाकी आहेत.येथून वीस मिनिटात आपण भारत सरकारच्या वतीने लावलेल्या फलकाजवळ म्हणजेच गडमाथ्यावर पोहोचतो.ब्रम्हगिरी ऊर्फ त्रिंबकगडाचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. या ठिकाणाहून डावीकडून वाट गोदावरी नदीच्या उगमस्थानी जाते तर उजवीकडून जटामंदीराकडे जाते.आम्ही सर्वप्रथम डावीकडील वाटेने मुळगंगा(गोदावरी नदीच्या)उगमस्थानी पोहोचलो.अगोदर सतीशीळेचा दगड लागतो त्यानंतर ब्रह्मगिरीचे मुख्य मंदिर,गंगा गोदावरी मंदिर,श्री चक्रधर स्वामी मंदिर या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन जटामंदिराकडे निघालो.१० मिनिटांतच आपण दुसर्या मंदिराजवळ पोहोचतो. याच ठिकाणी शंकराने आपल्या जटा आपटून गोदावरी नदी भूतलावर आणली.या मंदिराच्या पाठीमागून वाट दुर्ग भांडार या गडाकडे जाते.या वाटेने जाताना दोन पाण्याची टाकी लागतात.त्यापुढे उभ्या कातळातील चिरा चिरून पायर्याची वाट बनवली आहे.अगदी गडाच्या पोटात जात असल्याचा भास होतो.सुरूवातीलाच श्री हनुमानाची दगडात कोरलेली मुर्ती आहे.तसेच पायर्या उतरून खाली गेल्यावर आपण एका दरवाजातून बाहेर पडतो.मध्ये दोन बाजूला खोल दरी असलेला नैसर्गिक पुल(दुवा) आहे.हे पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी दुर्ग भांडार गडावर जाता येते.हे दोन्ही दगडी जिने बघून आपण अचंबित होऊन जातो.या गडावर दक्षिण टोकाला एक बुरुज आहे.तसेच दोन पाण्याची टाकी आणि काही घरांचे अवशेष दिसतात.हे सर्व बघून आल्यावाटेने पुन्हा जटामंदिराकडे जाऊन गड उतार व्हावे. चारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर गावात पोहोचलो.जेवण करून संत निवृत्तीनाथांच्या दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला.
ब्रह्मगिरी जाणून घ्यावयाचा असेल तर आपल्याला पुरातन काळात जावे लागते.ऐवढा मोठा इतिहास या ब्रह्मगिरी पर्वताचा आहे.सर्वप्रथम ब्रम्हगिरी हे नाव कसे पडले, यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. एकदा विष्णू ब्रम्हदेवाला म्हणाले की, पुष्कळ तप केले परंतु अजूनही शिवाचे ज्ञान मला झाले नाही तेव्हा त्या दोघांनी ठरविले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध लावायचा. पण पुष्कळ शोध घेऊनही त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांनी केतकी आणि पुष्प यांची खोटी साक्ष उभी केली आणि ब्रम्हाने सांगितले की मी महादेवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. शिवाने कृद्ध होऊन गायीलाही शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला की, भूतलावर पर्वत होऊन राहशील. रागाचा हा आवेग ओसरल्यावर त्याने शाप मागे घेतला आणि त्याने भूतलावर पर्वताचे रूप घेतले आणि त्याचे नाव ब्रम्हगिरी ठेवले.या किल्ल्यावरून उगम पावणारी गौतमी गंगा ऊर्फ गोदावरी या ठिकाणाहून दक्षिणवाहिनी होते, त्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील किल्ल्यांचे उल्लेख पुराणातही आढळतात. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती तेव्हा शंकराने आपल्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. गौतमांचं गोहत्येचं पाप निवारण करून गाईलाही सजीव केलं म्हणून तिचं नाव पडलं गोदावरी. सिंहस्थ काळात जेव्हा गुरू सिंह राशीत असतो, तेव्हा सर्व देव देवता, नद्या, सरोवरे, तीर्थ गोदावरीत वास करतात, त्यामुळे सिंहस्थात गोदावरीला जास्त महत्त्व आहे.
इ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.यावर बादशहा म्हणतो, ‘‘त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा, त्याचे चीज होईल हे जाणावे.’’ यानंतर मातबार खान किल्ला कसा घेतला, हे औरंगजेबाला पत्रातून कळवितो, ‘ गुलशनाबाद नाशिकच्या ठाण्यात आमचे सैन्य फार थोडे होते. या भागात मराठ्यांच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या ही परिस्थिती पाहून मी त्र्यंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ त्र्यंबक किल्ल्याचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले. आपल्या कृपेने त्र्यंबकचा किल्ला आमच्या ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना कोणत्या मनसबी द्यावयाच्या याचा तपशील सोबतच्या यादीवरून दिसून येईल. त्याची अर्जी आणि किल्ल्याच्या किल्ल्या या काका मनसबदार भावाबरोबर पाठविल्या आहेत, त्या पहाण्यात येतील’.याशिवाय मातबरखान म्हणतो, ‘‘त्र्यंबक किल्ल्याच्या मोहिमेत औंढा किल्ल्याचा श्यामसिंग, याचा मुलगा हरिसिंग याने जमेतीनशे कामगिरी केली आहे. त्याच्या बरोबर तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन मी त्याला त्र्यंबकचा किल्ला सांभाळण्याच्या कामावर नेमले आहे. नवीन किल्लेदार नेमून येईपर्यंत तो हे काम सांभाळील.’‘ मातबरखान या पत्रात अशी मागणी करतो,’‘साल्हेरचा किल्ला नेकनामखान याने असोजी कडून ताब्यात घेतांना त्याला जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली, तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी.’’ किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेब फर्मान पाठवितो, ‘‘मातबरखानाने जाणावे की तुमची अर्जी पोहोचली. आपण त्र्यंबकचा किल्ला जिंकून घेतला असून त्र्यंगलवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला असल्याचे कळविले आहे. त्र्यंबकच्या किल्ल्या आपण पाठविल्या त्या मिळाल्या तुमची कामगिरी पसंत करण्यात येत आहे. तुमच्या स्वत:च्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात येत आहे. तुम्हाला खिलतीचा पोशाख, झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये रोख देण्यात येत आहे.’’
पुढे १६९१ च्या सुमारास या भागात मराठयांचे हल्ले वाढले. पुढे या भागातील अधिकारी मुकबरखान बादशहास कळवितो, ‘‘त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला आहे. त्याचा मुलगा लहान आहे, तो कर्जबाजारी आहे. सावकाराचा तगादा चालू आहे. त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा, नाहीतर किल्ल्यावर भयंकर संकट कोसळेल.’’ इ.स १७१६ मध्ये शाहूने किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली, पण ती फेटाळली गेली. इ.स. १७३० मध्ये कोळयांनी बंड करून तो घेतला. पुढे १८१८ पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता.
प्राचीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा एक मार्ग याच रांगेतून जात असे, म्हणून त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी किल्ला उभारला गेला होता.ब्रह्मगिरी आणि दुर्ग भांडार हे दोन्ही किल्ल्यांची संपूर्ण गडफेरी करून पायथ्याला यायला किमान पाच तास लागतात.गडावरून अंजनेरी आणि हरिहर किल्ले दिसतात.त्र्यंबकेश्वर गावाला आता मंदिराचे शहरच म्हणावे लागेल कारण येथे लहान मोठी मंदिरासमोर विविध संस्थाचे मठ आहेत.हे सर्व बघायला एक दिवसही कमी पडेल. त्र्यंबकेश्वरांगावात दत्ता मढे 9689015835 यांच्या कडे चहा-नाश्ता जेवणाची सोय होते तसेच जर कुटुंब सहित गेलात तर हरिभाऊ गुंड ७३५०८६०५७० यांच्या कडे फ्रेश होण्यासाठी रूम मिळतात.
ऐतिहासिक माहिती आभार :- शिवमुद्रा अप्लिकेशन
✍️ शैलेश ज्ञानदेव तुपे

No comments:

Post a Comment