Followers

Tuesday, 9 March 2021

किल्ले कित्तूर

 









किल्ले कित्तूर
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या तालुक्याच्या गावी शूर राणी चेन्नमा यांच्या देसाई घराण्याची शान असलेला भव्य असा भुईकोट किल्ला आहे. कित्तूर हे बेळगावपासून ५० कि.मी अंतरावर आहे. कित्तूर बंगलोर महामार्गावर आहे. अजून पण किल्ल्याची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार भक्कम स्थितीत आहे. किल्ल्याला खंदक आहे. सध्या किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. आत किल्ल्यामध्ये शिवमंदिर, देवीचे मंदिर, हनुमान मंदिर, पुरातत्व खात्याचे संग्रहालय आहे. या संग्रहालयात अनेक विविध शिल्प, वीरगळ, सतीशिळा, शिलालेख असे सर्व पहायला मिळते. किल्ल्यात किल्लेपणाच्या अनेक वास्तू आहेत. किल्ल्यात महाल आहे. महालात दिवाणखाना, विश्रामगृह, शयनकक्ष, स्वयंपाकघर, विहीरी, पाण्याच्या टाक्या असे अनेक ठिकाणे पहायला मिळतात. आत चौथरे आहेत त्यावर कारंज्याचे निशाण आहे. किल्ल्यात सकाळी ९ ते ६ प्रवेश असतो.
किल्ल्याचे बांधकाम इ.स. १६६० ते १६९१ कालावधीत देसाई घराण्यातील गौडा सरदेसाई यांच्या काळात झाले.मल्ल आडनावाचे हिरेप्पा यांनी विजापूरकरांच्या सैन्याबरोबर शौर्य गाजवल्यामुळे त्यांना हुबळी परगाणा इनाम दिला व समशेर-जंग-बहाद्दुर हा किताब दिला. हेच कित्तूरकर देसाईंचे मूळ पुरूष. पुढे इ.स. १७४६ मध्ये सदाशिवराव भाऊंनी कर्नाटकात स्वारी करून सावनुरकर नवाब, देसाईंवर जरब बसवला तेव्हा कित्तूर, परसगड, गोकाक या प्रांतावर नियंत्रण मिळवले. इ.स. १७८७ साली सावनेर येथील लढाईत टिपूने मराठ्यांबरोबर तह केला तेव्हा कित्तूर, बदामी, गजेंद्रगड आणि ४८ लक्ष खंडणी मराठ्यांना दिले. पण मराठे फिरताच टिपूने कित्तूर ताब्यात घेतले. परत इ.स. १७९२ च्या तहात कित्तूर टिपूकडून मराठ्यांना परत मिळाले.
इ.स. १८०२ साली मल्लसर्जा देसाईंना कित्तूर परत ताब्यात मिळाले.इ.स. १८०९ मध्ये पेशव्यांनी देसाईंना प्रतापराव हा किताब देऊन जहागिर कायम ठेवली पण इ.स. १८१८ च्या इंग्रज मराठा संघर्षात देसाईंनी इंग्रजांना मदत केली. पुढे इ.स. १८२४ मध्ये शिवलिंगरूद्र सर्जा हे राणी चिन्नमाचे पती मृत्यू पावल्यावर राणीने शिवलिंगाप्पा यांना दत्तक घेतले. पण दत्तकवारस नामंजूर करणे, करवसुलीची पिळवणूक करणारी धोरणे यामुळे राणी चिन्नमा आणि इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. अखेर युद्धास सुरवात झाली आणि इंग्रज अधिकारी कॕप्टन थॕकरे हा लढाईत मारला गेला.
- टीम पुढची मोहीम

No comments:

Post a Comment