Followers

Saturday, 25 April 2020

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग १०

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग १०
शिव छत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार
किल्ले श्री. प्रतापगड
नाव प्रतापगड
उंची ३५५६ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव महाबळेश्वर, आंबेनळी घाट
डोंगररांग सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापतीहंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जीजाऊन च्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..
अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
कसे जावे?
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.
उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.
इतिहास
प्रताप गडचा रणसंग्राम
“मासाहेब, उद्या आम्ही खान भेटीला जाऊ. जगदंबा आमच्या पाठीशी आहेच पण काही बरं वाईट झाले तर आपले राज्य …”
“शिवबा………..
“तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या चिंतेने तुमचा धीर खचून जाता काम नये “
जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.
महाराजांनी जावळी मारली आणि विजापूरची आदिलशाही पार थरारून गेली. सह्याद्रीचा हा वाघ आता डोईजड झाला होता. ह्याचा बंदोबस्त करणे म्हणजे काळाची गरज झाली होती. म्हणून बड्या बेगमने भर दरबारात आवाहन केले – ”कोण? कोण? कोण जाईल सह्याद्रीच्या त्या गुहेत? कोण पकडेल त्या वाघाला?” सगळ्यांची जुबान बंद, डोळे जमिनीचे वेध घेत, मुंड्या खाली झुकल्या होत्या. बडी बेगम आग ओकत होती, ” ऐसा कोई मायका लाल नही, ऐसा एक भी मर्द नही इस बिजापुर दरबार में?” उत्तर काही येत नव्हते. पानाचे विडे जसे होते तसे तबकात निपचित पडले होते.
“हम जायेंगे बेगम साहिबा” कोण? कोण? कोण? सगळ्यांच्या माना मागे वळत होत्या. नक्की आवाज आला कुणाचा?
तो तोच ज्याने फर्जंद शहाजी राजांना कैद केले.
तो तोच ज्याने संभाजी राजांना दगा करून मारले.
तो तोच ज्याची औरंगजेबला पकडण्यापर्यंत मजल गेली.
आडवा तिडवा धिप्पाड अंगाचा, प्रचंड बुरुजासारखा, जसा राक्षसी देहाचा तसाच राक्षसी मनाचा.
… अफजल खान
उचलला विडा, आणि कोसळला महाराष्ट्रावर.
रक्ताचा सडा शिंपून उभे केलेले शिवार हा भस्मासूर पायदळी तुडवत निघाला, देव फोडले, मंदिरे नासवली, बाटवली. आता शिवाजी बाहेर पडेल असा त्याचा डाव. पण राजे लवकर बाहेर येईनात. इकडे खानने रयत मारावयास सुरवात केली.
महाराजांनी राजगड सोडला व प्रतापगड जवळ केला. तो मृत्यूला घाबरून म्हणून नाही, तर राजगड ते प्रतापगड हा स्वराज्याचा बहुतांश भाग राजांनी अफझलखानपासून वाचवला. त्यात तो परिसर अतिभयाण. प्रतापगडाला जाण्यासाठी त्यावेळी एकच वाट होती. ती म्हणजे रणतोंडीची वाट. ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्याखेरीज राहत नाही अशी ती वाट.
खानाने घाईने वाई जवळ केली. खानाचे चाळीस हजाराचे सैन्य वाईच्या पसरणी घाटात पसरले. खानने राजांना खलिता पाठविला. ”जान प्यारी असेल तर तुरंत शरण ये. नाहीतर बेमोत मारला जाशील.” सक्त दमाची भाषा. महाराजांनी खलित्यास उत्तर पाठविले, अतिशय रसाळ भाषेत, ”तुम्ही तर आमच्या वडिलांच्या ठायी! आम्हाला तुमची फार भीती वाटते. तुम्हीच आम्हाला भेटायला या, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. राज्य आपलेच आहे.”
घोळून घोळून खानला आणला प्रतापगडावर. उभारला खानासाठी शामियाना. असा शामियाना की नक्षीदार, जडजवाहीर जडित, संपत्तीची लयलूट केलेला. इतका देखणा की बघावं आणि बघतच रहावं. असा शामियाना उभारायचं कारण म्हणजे खानाला संपत्तीची अशी लयलूट आवडते. ही सगळी संपत्ती बघून खान भुलतो.
घरात पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांच्या आधी हजर आपण. पण इथे उलटे आधी खान आला. शामियान्यात का… तर खान शामियान्यात आला आणि त्याला शिवाजी पहिला दिसला तर त्याच्या डोक्यात राग राहणारच. त्यामुळे आधी खान शामियान्यात आला आणि हरवून गेला. भुलून गेला खान त्या शामियान्याची शोभा बघून. मानसशास्त्र आहे हे महाराजांचे. खान येऊन टेकला आणि मग महाराजांनी गड सोडला. खानाचा शामियाना महाराजांना व्यवस्थित दिसत होता. पण महाराज वरतून येताना मात्र खानाला दिसू नये, म्हणून गड सोडण्याची वेळ सुद्धा भर दुपारची. आले महाराज. सोबत दहा अंगरक्षक.
शामियान्याच्या अलीकडे येवून राजे थांबले. आपल्या वकीलास शामियान्यात पाठविले व सय्यद बंडास बाहेर जाण्यास सांगितले. कारण सांगितले की, ”शिवाजी राजे डरते है सय्यद बंडा से” खानाचे मानसिक खच्चीकरण राजांनी केले (आता शिवाजी तर आपल्या नोकरालाच घाबरतो मग आपणास तर…) चढला खान हरभ-याच्या झाडावर. जगाने या डावाला गनिमी कावा मानला, पण आपण ह्यास शिवसूत्र मानले.
राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. जकडले राजांना आपल्या बाहुत. झाला दगा. मारला खानने खंजीर राजांच्या पाठीत, सदरा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. घातला बिचवा पोटात आणि पापणी लवायच्या आत काढला खानचा कोथळा बाहेर. खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवा महालेने त्याचा अचूक वेध घेतला.
खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण… खानाला तोडीस तोड अशा धिप्पाड अंगाचा, एकाच वेळी अर्ध बकरं जागीच बसवणारा, चार पाय धरून घोडा उचलणारा, चिखलात रुतलेली तोफ एकटाच काढणारा, असा संभाजी कावजी समोर ठाकला. ओढले त्याने वार भोयाच्या
पायावर, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║

No comments:

Post a Comment