Followers

Saturday, 25 April 2020

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती भाग ५

गडकोट - हिंदवी स्वराज्याची दुर्ग संपत्ती
भाग ५
रायगडचे वाचन
रायगडची पायथ्यापासूनची उंची २२५० फूट आहे आणि गडाचा महादरवजा १८५० फुटांवर बांधलेला आहे. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून, एक ७५ फुट उंच तर दुसरा ६५ फुट उंच आहे.‘सर्पाकृती’ बांधकाम असलेल्या या मार्गाची रूंदी सुरवातीला १६ ३/४ फूट व आत शिरेपर्यंत फक्त ८ १/२ फुट आहे. आणि म्हणूनच कितीही मोठया संख्येने आलेल्या शत्रूला महाद्वारात प्रवेश करताना दोन दोन किंवा तीन तीन च्या गटापेक्षा जास्त संख्येनी आत शिरणे शक्यचं नाही. या बुरूजाच्या, तटबंदीच्या भिंतीची जाडी २ फुटांपासून ४ फुटांपर्यंत आहे. बांधणी शास्त्राचे विशेष सांगायचे तर ते असे, की महादरवाजासमोर आपण जाऊन पोहचलो तरीही, दरवाजा कुठेच दिसत नाही. दर्शन होते ते फक्त महाकाय बुरूजांचे शत्रुला बुरूजांना समोर घालून दरवाजा बांधावा असा ‘आज्ञापत्रात’ उल्लेख आहे. ’किल्ला’ हा शब्द उच्चारल्याबरोबर कुणाच्याही डोळयासमोर प्रथम ‘बुरूज’ उभा राहतो. सिंधु दुर्गाच्या बांधकामात ४२ बुरूज आहेत, हे सांगून कदाचित आश्चर्य वाटेल. तटबंदीच्या मजबुतीचा बुरूजांशी अतिशय निकटचा संबंध आहे. सरळ सरळ बांधलेली तटबंदी तोफेच्या गोळयांनी किंवा हत्तीच्या धडकेने पडण्याची शक्यता असते, पण बुरूजांच्या अर्धगोलाकृती बांधणीमुळे त्यांची मजबुती फारच वाढते. संरक्षणाच्या दृष्टिनेही बुरूज मोठी कामगिरी बजावू शकत.
गोमुख बांधणी
प्रवेशद्वाराची ‘गोमुख’ बांधणी हे शिवनिर्मित दुर्गांचं आणखी एक वैशिष्टय| गडावरच्या मुख्य भागापासून बरेच दूरवर, खाली प्रवेशद्वार बांधणे, म्हणजे गोमुख बांधणी. बालेकिल्ल्यापासून रायगडचं महाद्वार हे कमीत कमी ४०० फुट खाली आहे. मंदिराच्या गाभारयातून अभिषेकाचे पाणी बाहेर येण्यासाठी, मंदिराच्या मागे खालच्या बाजूला ‘गोमुख’ असते. या गोमुखातून गाभाऱ्यात प्रवेश मिळवणं जितक कठीण, तितकच महाद्वारातून बालेकिल्ल्यापर्यंत पोहचणे मुष्किल आहे. ‘अन्नाचा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने रायगड सगळया जगाविरूद्ध समर्थपणे लढु शकेल’, हा टॉमस निकल्सचा अभिप्राय रायगडची बांधणी पाहूनच, व्यक्त केला गेला आहे. इंग्रजांनी रायगडला पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हटले आहे, तेही एवढयासाठी.
रायगडवरील माझ्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी की, गडावरच्या सगळयाच म्हणजे जवळ जवळ ३५० वास्तुबांधणीमध्ये काहीना काही तरी विशेष दृष्टिकोन आहे. वास्तुशास्त्रीय दृष्टया शिवदुर्गांचा किंवा एकटया रायगडचा ही अभ्यास करणं, हे प्रचंड कार्य आहे, पण ते होणं अतिशय आवश्यक आहे. वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनी या कार्यात लक्ष घातल्यास एक नवी दिशा शिवचरित्र अभ्यासकांना मिळू शकेल. रायगडच्या मी केलेल्या अभ्यासापैकी काही महत्वाचे मुद्दे या लेखाद्वारे मांडण्याचा माझा प्रयन्त आहे.
' चमत्कार’
गडावरच्या वास्तव्यात, मला राजदरबारात अनेक चमत्कार असल्याचं सांगण्यात आलं. उदाहरणादाखल सांगायच तर अंस की, रायगडच्या पूर्वेला तोरणा किल्ला आहे जेथून महाराजांनी स्वराज्याचे पहीले तोरण बांधले आणि राजगड किल्ला स्वराज्याची पहीली राजधानी यांच्या मधुन उगवणाऱ्या सूर्याची प्रभात किरणं नगारखाण्याच्या कमानीतून येऊन, सिंहासनाच्या जागेवर पडतात. मला मोठ आश्चर्य वाटलं. तसेच माझी उत्सुकता, जिज्ञासा देखिल चाळवली गेली आणि मी विचार करू लागलो ‘हे खरचं शक्य आहे का?’ विचारांती, हे शक्य आहे असे वाटले, पण मग ही काव्यात्मकता, वास्तुशास्त्रीय माध्यमातून साधनारा महाराजांचा वास्तुशास्त्रज्ञ कोण, त्याने ही रचना कशी साधली, हा विचार अस्वस्थ करू लागला. सुदैवाने जगदीश्वराच्या प्रासादातील एका भिंतीवर शिलालेख आढळला. त्याचा अभ्यासकांनी दिलेला अर्थ पुढीलप्रमाणे ‘१५९६ शके आनंद नाम संवत्सराची ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या राज ज्योतिषांनी काढलेल्या किर्तीमान मुहूर्तावर, जो छत्रपती शिवनृपती सिंहासनाधिष्ठित झाला, त्याच्या अनुज्ञेने जगाला आनंद देणारा, हा जगदिश्वराचा प्रासाद ‘हिराजीने’ अनेक तळी, विहीरी, रम्य वनश्री, कुंभीगृहे राजप्रासाद, स्तंभ मिनार इत्यादिंनी मडित असलेल्या, वाणीला अवर्ण्य अशा श्रीमंत रायगडावर निर्माण केला. जोवर आकाशात चंद्र सुर्य नांदतील तोवर हा नांदत राहो.’
शिलालेखाची आणखी एक छोटीशी ओळ एका पायरीवर आहे ‘सेवेचे कार्य तत्पर हिराजी इंदुलकर’ म्हणजे रायगडवरील वर दिलेल्या यादीतील, सगळं बांधकाम हिराजींनी एकतर नवीन बांधले किंवा आधी होतं, त्याला राजधानीच्या दृष्टिने नवीन रूप दिले.
सुर्योदयासंबंधी हिरोजी इंदुलकारांनी केलेल्या, या रचनेची मी आधुनिक वास्तुशास्त्राच्या तत्वाप्रमाणे चिकित्सा केली आणि शिवकाली अशाप्रकारचे प्रगत वास्तुशिल्प साकार करणाऱ्या इंदुलकरांबद्दलच्या अभिमानाने ऊर भरून आला.
सुर्य हा उत्तरायण व दक्षिणायन असा वर्षभर फिरत असतो. त्यामुळे इंदुलकरांनी केलेली ही रचना, वर्षभरासाठी असू शकत नाही, हे सहज लक्षात येते. मग वर्षभरातले हे आश्चर्य साकार होणारे नेमके दिवस कोणते? हे ठरवण्याच्या मागे मी लागलो. त्यासाठी दरबार, नगारखाना व राजगड तोरणा यांचा दिशात्मक अभ्यास केला. दरबारात नगारखान्यापासून सिंहासनाची जागा १९० फूट लांब आहे. सिंहासनाच्या जागेची जमीनपासूनची उंची कामीत कमी ६ फूट आहे. नगारखान्याच्या कमानिची उंची १९ फूट तर रूंदी ९ फूट आहे. एखाद्या ठिकाणासाठी, सुर्याची स्थिती निश्चित करताना, ‘सोलर पाथ डायग्राम’ हा नकाशा काढतात. हा प्रत्येक अक्षांश रेखांशाने बदलतो रायगडच्या १८ अंश ते १४ अंश उत्तर या स्थितीसाठी असा सगळा अभ्यास केल्यानंतर, मी निष्कर्षाप्रत आलो की, अशी सुर्योदय स्थिती मे चा शेवट आणि जून महीन्याच्या पहील्या आठवडयापर्यंत असू शकते. माझ्या या निष्कर्षाला, आश्चर्यकारक दुजोरा मिळाला तो एका महत्वपूर्ण घटनेचा म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाची ती तारीख होती.
नगारखान्याच्या प्रवेशद्वाराची उंची ठरवताना, अंबारीसहीत हत्ती आत येऊ शकेल अशी व्यव्स्था केली होती वगैरे बरीच माहीती आपल्याला ठाऊक आहे. पण फक्त तेवढयाच कारणामुळें प्रवेशद्वाराची उंची १९ फूट ठेवली नसून, वर सांगीतल्याप्रमाणे सुर्याची किरणं सिंहासनापर्यंत पोहचू शकतील, अशा बेताने ती ठेवली आहे. हेही लक्षात घेतले पाहीजे.
आवजाचे रहस्य
राजदरबारासंबंधी मला कळलेला दुसरा चमत्कार असा, की सिंहासनाच्या जागेपासून कितीही हळू आवाजात बोलल्यानंतर तो आवाज संपूर्ण दरबारात स्पष्टपणे एकू येतो. याची सत्यता पडताळून बघण्यासाठी, मी सिंहासनाच्या जागी उभा राहीलो आणि आमच्यापैकी एका सहकारयाला, नगारखान्याच्यवर जाऊन, आगपेटीची काडी पेटवण्यास सांगीतले. आणि खरोखरच मला आश्चर्याचा धक्का बसला| कारण नगारखान्यापासून सिंहासनाचे अंतर १९० फूट आहे आणि तरीही आवाज स्पष्टपणे ऐकू आला. मग या चमत्काराला वैज्ञानिक चिकित्सेच्या साहाय्याने उकलण्याचा प्रयन्त मी केला. तो असा...
दरबाराची दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे. सिंहासनाच्या जागेपासून २१ फूटांवर असलेली १२ फूट उंचीची भिंत बांधून, ही विभागणी केलेली आहे. १९० २१० फूट जागा असलेला दरबार १ फूट जाडीच्या दगडी भिंतीने बंदिस्त केलेला आहे. तिनीही बाजूच्या दगडी भिंतींची उंची १६ फूट आहे. रायगडवर वारा वेगात वहात असल्याकारणाने, या भिंती इतक्या उंच बांधल्या आहेत. या भिंतींची पडझड झाली, तर आवाजाच्या चमत्काराला अडथळा येईल. बंदिस्त जागेमध्ये आवाज घुमतो किंवा अस्पष्ट ऐकु येतो.ह्याच प्रमुख कारण म्हणजे, बाजूच्या भिंतीवरून आवाजाचे होणारे परावर्तन आणि छताच्या पृष्ठभागामूळे होणारे परावर्तन. दरबारातील अवशेषांवरून सिंहासनाची जागा वगळता, दरबाराच्या मोठया भागाला छत असू शकेल, असा कुठलाही पूरावा नाही. दरबार भरवताना आवश्यक तेंव्हा कापडाचा शामियाना घालत असावेत असे माझे मत आहे. आवाजाच्या चमत्काराचं प्रमुख कारण म्हणजे, सिंहासनाच्या जागेला, दरबारापासून वेगळ करणारी भिंत. सिंहासनाच्या सरळ रेषेत, या भिंतीमध्ये २४ फूट रूंद ओपनींग आहे. सिंहासनाची जागा जमिनीपासून कमीत कमी ६ फूटांवर होती| या सगळया एकंदर रचनेमूळे बाजूच्या भिंतीवर जाणारा आवाज अडवला जातो आणि दरबारातल्या ८० टक्के जागेवर पोहचणारा आवाज हा ‘डायरेक्ट ऍकॉस्टिकल रेंज’ मुळे येतो आणि म्हणूनच आवाज आपेक्षेपेक्षा जास्त स्पष्ट येतो. सिंहासनाची जागा आणि त्याची उंची अशी ठेवली आहे की, दरबारात कुठेही बोललेल्या व निर्माण केलेल्या आवाजाचा ‘ऍकॉस्टिकल फोकस’ सिंहासनाच्या जागी तयार होतो| त्यामुळे दरबारात कुणीही बोलले, तरी महाराजांना ऐकू जात असे.
खिडक्यांची रचना
मधल्या भिंतीचे, सिंहासनासमोर आलेल्या ‘ओपनिंग’ मुळे २ भाग झालेले आहेत| त्या प्रत्येक भागात, ६ खिडक्या आहेत. त्यांची रचना उंची, रूंदी फार विचार करून ठरवलेली आहे. या सगळया खिडक्यांची सुरवात (सि लेव्हल) ही सिंहासनाच्या चौथरयापासून सुरू होते आणि दरबारातल्या उरलेल्या २० टक्के जागेवर, आवज पोहचण्याची व्यवस्था, ११ फूट रूंद व २१ फूट उंच खिडक्यांच्या मार्फत आहे, असा निष्कर्ष मी काढला आहे| दरबारात अशा जागी उभा राहीलो की जेथून सिंहासनाकडे बघीतले असता खिडकी मध्ये येत नाही| (त्यामुळे सिंहासन दिसत नाही) तेव्हा लक्षात आले की, असा सगळया जागांवर आवाज अजिबात पोहचत नाही. हा भाग ‘ऍकॉस्टिकल शॅडो’ मध्ये येतो असे म्हणता यईल पण असा भाग संपूर्ण दरबारात ६ ते ८ टक्क्यापेक्षा जास्त नाही.
मनोऱ्यात कारंजे
गंगासागर तलावाला लागून बांधलेल्या मनोऱ्यामध्ये कारंजे असावेत तशा खुणा तिथे दिसतात. द्वादशकोनी असलेल्या या काळया दगडी मनापऱ्यामध्ये, चिरागदाने, शमादानांच्या केसरी प्रकाशात, थुई थुई उडणारे ते कारंजे, शिवकालात किती प्रेक्षणीय दिसत असतील असे विचार मनात आले. आणि लगेच जाणवलं की, त्या काळात ‘वॉटर पंप’ नव्हते. मग मनोऱ्याच्या पायथ्याशी असलेले गंगासागरचे पाणी, ३ ते ४ मजली मनोरयांच्या कारंजामध्ये कसे उडत असेल? आणि मग शोध घ्यायला लागलो. कारंज उडत असायचा त्या जागी वॉटर हेड शोधण्याचा प्रयन्त करता करता, जमीनतले एक छिद्र सापडले.त्या दिशेनी मग मनोऱ्याच्या भिंतीचा शोध केला. सुदैवाने एक मोठा दगड फुटलेला दिसला.त्याठीकाणी असलेल्या छिद्रातून तर चक्क २ इंच व्यासाच्या तांब्याच्या नळीचे दर्शन झाले. पण आश्चर्य असे वाटलं की हा नळ तर रजवाडयाच्या दिशेने वर जात होता. दिशा होती महाराजांच्या स्नानगृहाकडे. म्हणून मी तिकडे गेलो आणि ताबडतोब सगळा उलगडा झाला. महाराजांच्या स्नानगृहावर, पाणी साठवण्याचा हौद साधारण १२ फूट उंचीवर असावा.त्या हौदात गंगासागराचं पाणी पाणक्याच्या सहाय्याने काचडी भरून वर आणून साठवीत असावेत आणि त्या हौदातून ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पाणी मनोऱ्याच्या तीनही मजल्यावरच्या कारंजात उडत असावेत. मनोऱ्याच्या तळमजल्यापासून वरच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतची उंची कमी कमी होत जाते.
तसेच कारंजांच्या खडडयाचा घेर देखील तळमजल्यावर जास्त आहे तर वरच्या मजल्यावर कमी कमी होत जातो. या दोन्हीसाठी कारण आहे ते असं की, प्रत्येक मजल्यावरच्या कारंजाच्या वॉटर हेड्सची उंची टाकीतल्या पाण्याच्या पातळीसापेक्ष कमी कमी होत जाते. पाण्याचा जोर तळमजल्यावरच्या कारंजात जास्ती तर वरच्या मजल्यावर कमी कमी होत जातो.
अभ्यासाला भरपूर वाव
रायगडसंबंधी असा अभ्यास करायला भरपूर वाव आहे. राणीबसा, खजीनाघर, कचेरया, सदर, १८ कारखाने, १२ महाल यांच्या जागा देखील नीट दाखवता येत नाहीत.म्हणून हा विषय आता पुढे यावा. याचा अभ्यास व्हावा इतकाच या लेखनाचा हेतू आहे.
© ® info. by sagar kale
█║▌│█│║▌║││█║▌║▌║
sagarkale12@live.com

No comments:

Post a Comment