महाराजांचे जलदुर्ग बांधणीतील अभिनव प्रयोग. नमस्कार मित्रांनो,
सर्व प्रथम आपणा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो! कारण मागील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया वाचून खरंच भारावून गेलो. काही प्रतिक्रिया तर अंगावर शहारे यावेत इतक्या विस्मयकारक होत्या. आपल्या अनमोल प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांच्या ऋणात राहणेच मी पसंद करेन.
मित्रांनो तुमच्या प्रतिक्रियांमधून मला माझ्या लिखाणाची पावती तर मिळतेच त्याच बरोबर मनात एक आत्मविश्वास तयार होतो जो मला इतिहासाच्या नवनवीन वाटा शोधण्यास प्रवृत्त करतो. ही पावतीच मला वाटते मला तुमच्याशी जोडून ठेवते. त्यामुळे तुमच्या सर्व प्रतिक्रियांचे अगदी हृदयाच्या अंत:करणातून स्वागत आहे.
मागील लेखात आपण महाराजांनी डोंगरी किल्ल्यांवर केलेले काही अभिनव प्रयोग जाणून घेतले.
प्रस्तुत लेखात आपण महाराजांच्या सागरी किल्ले म्हणजे जलदुर्गांच्या बाबतीत केलेल्या अभिनव प्रयोगांबद्दल माहिती घेणार आहोत.
8 फेब्रुवारी 1665 ह्या दिवसाला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे कारण याच दिवशी इतिहासाच्या कालपटलावर दोन गोष्टी घडल्या - एक मुंबईसारखे व्यापारी बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण म्हणून दिले आणि त्याच दिवशी दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपति शिवरायांनी आपल्या सागरी मोहिमेसाठी स्वतःच्या आरमारासोबत समुद्रावर पहिले पाऊल ठेवले. हीच ती प्रसिद्ध अशी बसरूर ची पहिली सागरी मोहीम.
इतिहासामध्ये काही घटना अशा असतात की, त्यांना आपण फक्त 'co-incidence' म्हणू शकतो, त्यात खऱ्या अर्थाने इतिहासानेच इतिहासाला दिलेला भविष्यातील इतिहासाचा एक गर्भित इशाराच असतो. महाराजांची पहिली समुद्र सफर आणि पहिली सागरी मोहीम एकाच दिवशी असण्यामागे निश्चितच भविष्यातील मराठ्यांच्या बलदंड आरमाराची मुहूर्तमेढ होती. बऱ्याच वेळा शिवचरित्र वाचतांना मन अचंबित होते. फक्त पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत एखादा माणूस पाठीशी कसलं बळ नसताना स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतो काय आणि एकापेक्षा एक किल्ले जिंकत काही बांधत गडपती होतो काय! ह्या पुण्यभूमीला अंकित करून स्वराज्य उभं करतो आणि ह्या भूमीचा भूपती होतो काय! इथेच न थांबता सागरावर शतकोत्तर अधिराज्य गाजवणाऱ्या पारंपारिक शक्तींना आव्हाने देत स्वतःचे बलदंड आरमार उभं करतो काय आणि जळपती होतो काय! हे सारेच थक्क करणारे आणि महाराजांच्या कर्तुत्वाला बहुरंगी, बहुढंगी आयाम चढवणारे आहे.
महाराजांचे हे कर्तृत्व पटवून देताना एका डग्लस नामक इंग्रज अधिकाऱ्याचे उदगार सांगावेसे वाटतात " शिवाजीमहाराज जन्माने खलाशी नव्हते ईश्वराची कृपा समजली पाहिजे. जर ते खलाशी असते तर जमिनीप्रमाणे सागर सुद्धा त्यांनी शत्रूपासून मुक्त केला असता!".
साधारणत: जावळी हस्तगत केल्यानंतर महाराजांचे लक्ष तळकोकणाकडे वळले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले, कोकण किनारपट्टीवर मोकळ्या ठिकाणी शत्रू मोक्याची ठाणे बळकावून बसला होता. गोवा, वसई, रेवदंडा, मुंबई येथे पोर्तुगीज तर डच कोचीन जवळील काही भागात सत्ता बळकावून बसलेत. अगदी पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1608ला आलेले इंग्रज मच्छलीपट्टण, मद्रास, हरिपूर बालासोर, हुबळी, सुरत, राजापूर इत्यादी बंदरे बळकावून बसले होते. हे कमी की काय राजापूरच्या खाडीत जंजिरेकर क्रूर सिद्दींनी कोकणातील काही भागावर सत्ता टिकवून धरली होती. व्यापारीदृष्ट्या ही बंदरं खूपच महत्त्वपूर्ण होती .स्वराज्यातील किनारी भागांना संरक्षण द्यायचे असेल तर ह्या भागात फक्त दुर्ग उभे करून चालणार नव्हते तर फिरंग्यांच्या तोडीस तोड आरमार उभे करण्याची गरज होती, हे महराज जाणून होते. कारण त्यावेळी भारतीय राजांकडे स्वतःचे आरमार नव्हते अगदी इस्लामिक पातशहाला सुद्धा मक्केला जाण्यासाठी पोर्तुगीजांच्या परवान्याची गरज लागायची. त्यामुळे पोर्तुगीजांचा असा समज झाला होता कि सागरावर आमचीच मालकी आहे.आमच्या परवानगी शिवाय कुणीही समुद्रात पाय सुद्धा ठेऊ शकत नाही. हेच त्या दूरदर्शी राजाच्या मनाला टोचत होते. म्हणूनच महाराजांची स्वराज्याचा डाव विस्तारायचा ठरवला.यांत त्यांनी प्रथम कल्याण, भिवंडी, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, अंजनवेल, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, ही महत्वाची बंदरे ताब्यात घेऊन तिथे जहाज बांधणीचे कारखाने खोलले.
बघता बघता हा उदयॊग इतका वाढला कि सुरुवातीला दुर्लक्ष करणा-या परकीय सत्ताधीशांनी मराठ्यांचे आरमार पाहून अक्षरश: तोंडात बोटे घातली! महाराजांचे नियोजन इतके शास्त्रशुद्ध होते की भिंग लावून शोधले तरी त्यात त्रुटी सापडणार नाही.
सदर लेखात आपण महाराजांनी कोकणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरमार उभे करण्यापासून ते सागरी आणि किनारी दुर्गांची साखळी उभी करण्यापर्यंत माहिती घेतली आहे. त्यातील महाराजांनी नव्याने बांधलेल्या किल्ल्यांचे अभिनव प्रयोग पाहणार आहोत.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सामान्य दुर्गप्रेमींना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे काही पुस्तकातून तर शोधलेली आहेतच पण त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाऊन परीक्षण केली आहेत.( प्रा. प्र.के. घाणेकर सरांचे मनापासून धन्यवाद कारण त्यांच्या "शिवरायांचे दुर्गविज्ञान " या नितांत सुंदर पुस्तकाचा एक उत्तम माहितीस्रोत म्हणून खूपच उपयोग झाला.)
महाराष्ट्राला जवळ जवळ 700 किलोमीटर ची किनारपट्टी लाभली आहे त्यात लहान मोठे अनेक दुर्ग आहेत. काही जलदुर्ग तर काही किनारी प्रदेशातील पाणकोट आहेत. त्यापैकी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य वेगळेच. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये विविधता तर दिसतेच परंतु त्यास स्थापत्यशास्त्र आणि विज्ञानाची जोड सुद्धा दिसते. त्यापैकी अलिबाग जवळील थळ ह्या किनारी किल्ले वजा गावापासून काही अंतरावर समुद्रात उभे आहेत दोन जुळे दुर्ग एक खांदेरी तर दुसरा उंदेरी.
#खांदेरी किल्ल्यावरील प्रयोग
उंदेरी हा किल्ला जंजिरेकर सिद्द्यांनी बांधला तर खांदेरी महाराजांनी बांधला आहे. खांदेरीचे बांधकाम हे इंग्रजांच्या सामर्थ्याला उघड उघड आव्हान होते. हा किल्ला बांधताना महाराजांना माहित होते की, या किल्ल्यावर कितीही भक्कम तटबंदी बांधली तरी समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात ती जास्त दिवस तग धरणार नाही. म्हणूनच कि काय महाराजांनी ह्या किल्ल्याच्या बाहेर काळ्या पाषाणाची रास आणून टाकलेली दिसते. त्याचे प्रयोजन असे की, ह्या दगडांच्या संपर्कात समुद्राचे खारे पाणी आल्यावर त्यावर 'बरन्याकल्स' या सागरी शिंपल्याच्या वर्गातील प्राण्याची वाढ होते. हे आपण कोकणात फिरताना पहिलेच असेल.
मग या दगडावर त्यांचे जणू अणुकुचीदार आवरण चढते. त्यामुळे अशा ठिकाणी लहान होडीतून उतरून जरी शत्रू किल्ल्यापर्यंत आला तरी त्याचा पाय कापला जाऊ शकतो. तसेच त्या जखमेत खारट पाणी जाऊन जी आग होणार ती निराळीच!
याव्यतिरिक्त भरतीत उसळणाऱ्या विशाल लाटांचा तडाखा किल्ल्याच्या तटबंदीला लागू नये हे सुद्धा कारण आहे. ( मरिन ड्राईव्ह ला फिरायला गेल्यास अशा प्रकारच्या लाटांच्या पासून किनाऱ्याचे संरक्षण व्हावे म्हणून कॉंक्रिट चे ब्लॉक टाकल्याचे आपण पाहतोच ना.) म्हणजे ज्या गोष्टींचा आपण आज उपयोग करतोय त्याचा विचार महाराजांनी 350 वर्षांपूर्वी केला होता हे विशेष.
#कुलाबा किल्ल्याची तटबंदी
कुलाबा हा किल्ला अलिबाग च्या समुद्रकिनारी आहे. भरती असल्यावर ह्या किल्ल्याला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडतो तर ओहोटीच्या वेळी चालत जाता येते.
ह्या किल्ल्याच्या बुरुजाच्या भिंतीचे बांधकाम पाहिल्यास आश्चर्य वाटते.कारण इतर किल्ल्यांच्या बांधकामात जसे दोन दगड सांधण्यासाठी चुना वापरतात तसं काहीच वापरलेले नाही आणि दोन दगडात लक्षात येईल अशा प्रकारचा गॅप ठेवलेला दिसतो.कशासाठी असेल बरे असे? हा प्रश्न पडतो.
सामान्यतः लाटांचा मारा ह्या भागात खुप असतो आणि पावसाळ्यात तर सागराला रौद्र रूप प्राप्त होते.अशा वेळी कितीही भक्कम तटबंदी बांधली तरी ती टिकू शकत नाही. सागरी लाटांचा मारा जितका कमी करता येईल तितका कमी करायचा प्रयत्न या फटी करतात कारण लाटांचे पाणी या फटींमधून आत जाते आणि परत तटबंदीच्या तळातून बाहेर येते. तर अशा प्रकारचा प्रयोग महाराजांनी हा किल्ला बांधताना केला आणि ह्या बुरुजांच्या भिंतीचे आयुष्य वाढवले.
#पद्मदुर्गाचे बांधकाम
सागरात उंदराप्रमाणे फिरणारा आणि महाराजांना शेवट पर्यंत झुंज देणाऱ्या सिद्दीला शह देण्यासाठी जंजिऱ्याच्या मागील बाजूस दूर समुद्रात पद्मदुर्ग पाहण्यास मिळतो. महाराजांनी पद्मदुर्गचे बांधकाम करताना कुलाबा किल्ल्याच्या उलट प्रकारची पद्धत वापरली. इथे बांधकामाची भिंत बांधताना दोन दगडांना सांधायला चुन्याचा वापर करत असताना चुन्यासोबत आणखी बऱ्याच गोष्टी वेगवेगळया प्रमाणात वापरल्या. त्यामुळे पद्मदुर्ग आजही दिमाखात उभा आहे.
ह्या तटबंदीच्या भिंतीमधील दगड अक्षरशः लाटांमुळे झिजले आहेत पण चुना जशाचा तसा आहे. म्हणजे महाराजांनी नक्की कोणते केमिकल इंजिनीयरिंग वापरले हा एक संशोधनाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.
#सिंधुदुर्ग
मालवण स्थित सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे मराठ्यांची पाण्यातली राजधानीच. सुरतमध्ये मिळवलेली अमाप संपत्ती महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामात वापरली. हा किल्ला सुद्धा महाराजांच्या सूक्ष्म निरीक्षण पद्धतीचा नमुनाच म्हणावा लागेल. मालवणला महाराज जेव्हा आले त्यावेळी महाराजांना सागरात एक बेट दिसले. त्यास 'कुरटे बेट' म्हणत. त्या बेटाच्या चहुबाजूंनी लहान मोठया अणुकुचीदार खडकांचे निसर्गतःच जणू काय संरक्षित आवरण आहे. इथे जर किल्ला बांधला तर शत्रुच्या मोठया होड्या किल्ल्यापर्यंत पोहचू शकत नाही. मराठ्यांच्या होड्या लहान आणि उथळ असत त्यामुळे त्या सहज किल्ल्यापर्यंत पोहचतील. तर अशाप्रकारे समुद्रातील नैसर्गिक गोष्टींचा अचूक अभ्यास करून महाराजांनी विशाल तटबंदीयुक्त बेचाळीस भक्कम बुरुजांचा किल्ला उभा केला. विशेष म्हणजे ह्या किल्ल्याच्या तटबंदी मध्ये आहे चाळीस शौचालये.
गोमुखी बांधणीचे महाद्वार बुरुजांआड लपलेले सहज लक्षात न येणारे आणि शत्रूला बुचकळ्यात पाडणारे आहे. तसेच सर्व शिवप्रेमींच्या दृष्टीने सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या महाद्वारातील नगारखाण्यातील घुमटीत डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचे ठसे आहेत हे विशेष वंदनीय. हा महत्वपूर्ण वारसा जतन करणे गरजेचे आहे.
#विजयदुर्ग.
साधारणतः 1664 ला शिवरायांनी हा किल्ला जिंकून तो पाडून परत बांधला. आज त्या किल्ल्यावर जी तिहेरी तटबंदी दिसते ती महाराजांनी बांधली. ह्या किल्ल्याबद्दल जी गोष्ट काळाच्या उदरात लपली होती ती आता आता काही वर्षांपूर्वी कळली. ह्या किल्ल्याच्या उत्तर पश्चिमेला किल्ल्यापासून काही अंतरावर पाण्याच्या आत मानवनिर्मित एक 9 फूट जाडीची आणि जवळ जवळ पाऊण किलोमीटर लांबीची, काही अंशात कोनात वळवलेली भिंत बांधलेली आहे की जी भरती असो वा ओहोटी पाण्याच्या वर येत नाही.
ह्या संदर्भात एक ऐतिहासिक पत्र मिळाले. त्यात असा उल्लेख सापडतो की, "विजयदुर्ग जिंकण्यासाठी म्हणून इंग्रजी जहाजांनी रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हल्ला केला.त्यावेळेस गलबते तोफांचा मारा करण्यासाठी किल्ल्याच्या जवळ जाऊ लागली तशी एक एक करून तीनही जहाजे पाण्यात कशाला तरी आदळून फुटली आणि नष्ट झाली आम्ही कसे तरी किनाऱ्याला पोहत आलो." त्यातल्याच एका पोर्तुगीज खलाशाने हे पत्र लिहिल्याचे दिसते. वरील पत्र कमांडंट ऑफिसर ए. व्ही. गुपचूप यांना लिस्बन ह्या पोर्तुगाल च्या राजधानीत मिळाले. याचा शोध जेव्हा गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओशनोग्राफी ने घेतला तेव्हा त्याचे अवशेष लॅब मध्ये नेऊन त्याची " C14"
नावाची कार्बन टेस्ट केली.या टेस्टच्या आधारे ती भिंत मानवनिर्मित आहे आणि साधारण त्याचा कालावधी महाराजांच्या काळातील आहे हे स्पष्ट झाले.
ह्या भिंतीचे प्रयोजन पाहिल्यास आपणांस असे लक्षात येईल कि किल्ल्यावर सहजा सहजी जवळ जाऊन हल्ला होऊ शकत नाही. कारण इंग्रजी होड्यांचा तळ हा निमुळता आणि पाण्यात खोलवर बुडणारा असतो याउलट मराठ्यांची जहाजे छोटी उथळ तळाची त्यामुळे ती जहाजे ह्या भिंतिवरून सहज येजा करीत. वरील उदाहरण पाहिल्यावर थक्क होतो कारण आजपासून जवळ जवळ साडेतीनशे वर्षांपूर्वी इतके प्रगत तंत्रज्ञान होते कि पाण्याचा आत पाऊण किलोमीटर लांबीची भिंत आपण बांधू शकलो. कशी बांधली असेल अशाप्रकारची भिंत?
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जो प्रयोग केलाय हे बघून भारतीय नौदल सुद्धा आश्चर्यचकित झाले.
मित्रांनो, काळाच्या उदरात असे शिवनिर्मित अनेक चमत्कार लपले असतील यांत दुमत नाहीच. गरज आहे त्याचा शोध घेण्याची. ह्या लेखाच्या माध्यमातून मला हेच सांगायचे आहे कि, जलदुर्ग किंवा सागरी किल्ला म्हटले कि भारतीय पर्यटक नाव घेतो ते फक्त जंजिऱ्याचे पण इतर सुद्धा किल्ले आहेत जे पर्यटकांनी पहिले पाहिजेत. महाराजांनी बांधलेले किल्ले स्थापत्य शास्त्राची प्रतिकं आहेत. आणि ती आपण जरूर अभ्यासली पाहिजेत . जंजिरा जरूर बघा पण जंजिऱ्याच्या आसपास किती तरी सुंदर दुर्ग आहेत जे कि पर्यटकांच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत . अलिबागच्या किनारपट्टीवर पद्मदुर्ग, कोर्लई, रेवदंडा, खांदेरी उंदेरी हे किल्ले सुद्धा बघण्यासारखे आहेत.
माझा विरोध जंजिरा किल्ला पाहण्याला नाही पण त्यासोबत महाराष्ट्रात अनेक उपेक्षित जलदुर्ग आहेत जे दुर्गप्रेमींनी अभ्यासले पाहिजे, आणि त्यावर सहज जाता येता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळेल ना की त्याचे केंद्रीकरण होईल.अशा प्रकाराच्या ऐतिहासिक ठेव्यांचे निरीक्षण सुद्धा करता येईल. विचार करा मित्रांनो विजयदुर्गची भिंत पाहण्यासाठी जर शासनाने एखादी योजना राबवली तर आपल्या राजाच्या ठायी असलेल्या तात्कालीन जलदुर्गविज्ञानाचा प्रसार व प्रचार सातासमुद्रापार होण्यास मदत होईल. म्हणून माझी सर्व गडप्रेमींना विनंती आहे की हा ठेवा पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर नुसतेच ट्रेकिंगच्या नावाखाली न फिरता, दुर्गभ्रमंतीला अभ्यासू निरीक्षणाची जोड दया. म्हणजे त्यातून नक्कीच आपल्याला काहीतरी शिकता येईल.
जय शिवराय
लेखनसिमा.....
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
सदर लेख कसा वाटला कंमेंट जरूर कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया मला अधिक लिहिण्यास उद्युक्त करतात तसेच आपल्या सखा सह्याद्री पेजला like आणि share करा म्हणजे आपल्या कल्याणकारी राजाचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.
जय शिवराय!
No comments:
Post a Comment