Followers

Thursday, 23 April 2020

किल्ले लिंगाण्याची

वैभव महाराष्ट्राचे!
शिवलिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत रायगड ते तोरणा, राजगड यांच्या दरम्यान आहे.
किल्ले लिंगाण्याची उंची समुद्रसपाटीपासून २९६९ फूट येवढी असून त्याची प्रस्तरारोहन उंची जवळपास ११०० फुट आहे. किल्ले लिंगाणा भटकंतीसाठी दोन मार्गे गडावर जाता येते. पहिला मार्ग - पुण्यावरून वेल्हे - सिंगापूर - मोहरी गाव असा गाडीमार्ग आहे. सह्याद्रिमाथ्यावरील मोहरी गावातून बोराट्याची नाळ जवळ आहे. ही नाळ चालत जायला बरीच अवघड आहे. येथून जवळच असणाऱ्या रायलिंगहून लिंगाण्याचे मनमोहन दर्शन होते. सिंगापूरच्या नाळेने जाणे त्या मानाने सोपे आहे. दुसरा मार्ग - महाड या तालुक्याच्या गावातून बिरवाडी मार्गे वाघेरी नंतर पाने गाव आहे. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर लिंगाणा माचीवर पोहोचता येते.
लिंगाण्यावर जाण्यासाठी आधी लिंगणमाची वरील जननीचे आणि सोमजाईचे दर्शन घेऊन मग लिंगाण्याकडे निघतात. घसरड्या वाटेवरून अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी पोहचता येतो. उजवीकडे पाण्याचे एक टाके आहे. पुढील वाट कड्याच्या अगदी टोकावरून जाते. येथे खालून येणारी पायऱ्या ढासळलेली एक वाट आहे. उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे, तिथे एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आले आहे. त्याचाच आधार घेऊन कडा पार करावा लागतो. येथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे. त्याच्या पोटात एक गुहा आहे, तिला सदर म्हणतात. सदरेला एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या आहेत. त्या गुहेला लागूनच एक धान्याचे कोठार असून, पलीकडे जीभीचा पहारा आहे. तिथून माची पसरत गेली आहे. गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे सामावून घेते. समोरच दुर्गराज रायगडावरचा स्थितप्रज्ञ जगदीश्र्वराचे आपल्याला दर्शन होते. या गुहेवरून पुढे गेल्यावर एक कोरडा हौद वत्यानंतर पुढे चांगल्या पाण्याच्या हौद. इथे एक शिवलिंग आहे, पण कुठे मंदिराचा मागमूसही नाही. या हौदाच्या पुढे, म्हणजे गडाच्या उत्तरेस पायऱ्या आहेत त्याने वर असलेल्या गुहांपर्यंत जाता येत होते.
लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येतं. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये दोन गुहा आणी फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर वेगळाच आनंद मिळतो. या सुळक्याच्या पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. जावळीचे मोरे यांचा पराभव केल्यावर शिवरायानी रायगडाजवळ हा किल्ला बांधला. इथल्या गुहेत, जे जुने कारागृह होते, एका वेळेस ५० कैदी ठेवत. लिंगाणा किल्ला रायगडचा पूरक होता त्याच्या डागडुजीचे काम रायगडाबरोबरच चालत असे. १७८६ सालापर्यंत त्यावरील वास्तूंची देखभाल केली जात असे असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये गडावरील सदर, बुरूज, दरवाजे आणि धान्यकोठार यांचा समावेश असे. स्वराज्यात किल्ले लिंगाण्यास खुप महत्व होते.
किल्ले लिंगाणा, ता. महाड, जि. रायगड
# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment