Followers

Wednesday, 22 April 2020

#मातब्बर_शस्त्र #तलवार

धनुर्वेदातील वर्गीकरणानुसार #तलवार हे अमुक्त म्हणजे हातात धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. अगदी पुराण काळातही हिंदू देवतांनी तलवार ‘‘शस्त्र’’ म्हणून धारण केली आहे. देववाणी संस्कृतमध्ये तलवारीस खडग, तीक्ष्णवर्म, विषसन, श्रीगर्भ अशी अनेक संबोधने आहेत. इ.स.पूर्व ६०० पासून ते १९ व्या शतकापर्यंत जगातील विविध भागात तलवारीचा प्रसार झाल्यामुळे, तीला वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.उदा. उर्दूत :- समशेर, पंजाबीत:- तेगा, कानडीत:- कत्ती, नेपाळीत:- दाओ कारा, इंग्रजीत:- स्वॉर्ड तलवार हे शौर्याचे प्रतिक समजले जात असे. पूर्वीच्या काळी पदाती सैनिक व घोडेस्वार द्वंद्वयुद्धासाठी तलवार वापरीत.पाते व मूठ हे तलवारीचे दोन मुख्य भाग होत. प्रारंभ काळात तलवारीच्या पात्याचा आकार कण्हेरीच्या पानासारखा असल्यामुळे पात्यास पान असेही म्हटले जाते. सामान्यपणे पात्यावरूनच तलवारींचे वर्गीकरण केले जाते. हे पाते मुठीमध्ये बसवून तलवार हाताच्या पंज्यात पकडता येते आणि मुठीमुळे पंज्याचे व बोटांचे रक्षणही होते. मुठीचेही विविध प्रकार आढळतात.
अश्मयुगातील दगडी धारदार आयुधापासून तलवार उत्क्रांत झाली असावी. महाभारताच्या शांतिपर्वात ब्रहयाने यज्ञ केला असता ‘अशना’ या कमलासारख्या उल्केतून तलवारीचा जन्म झाला, असे भीष्म सांगतात. शस्त्रास्त्रांचा विकासक्रम लक्षात घेता गदा, कुऱ्हाड, गोफण, धनुष्यबाण व भाला यानंतरच तलवार प्रचारात आली असावी, असे दिसते. तलवारीला तांबे, कासे यांची पाती आणि हाडांच्या व धातूच्या मुठी बसवीत.. यजुर्वेदसंहितेत मात्र लोखंडी आयुधांचा स्पष्ट निर्देश आहे. आधुनिक काळात प्रदेश, गाव किंवा विशिष्ट व्यक्तीवरून तलवारी ओळखल्या जातात. उदा., आलेमानी (जर्मनी), मुल्हेरी (मुल्हेर, महाराष्ट्र), हुसेनी, भवानी वगैरे. शुंगकालातील सरळ, रुंद दुधारी व बिनमुठीच्या (?) तलवारींचे स्वरूप भारहूत येथील शिल्पकामात आढळते.वाकाटककालीन अजिंठा लेण्यांत दिसणारी तलवार ही टोकाला रुंद असलेल्या पात्याची दिसून येते. तिचे बामियान (अफगाणिस्तान) येथील बुद्धाच्या पाठीमागे असलेल्या चंद्रदेवाच्या तलवारीशी साम्य आहे. कोपीस म्हणजे मुठीखाली अरुंद पण टोकाकडे रुंद होणारे पाते असलेल्या तलवारींचे नमुने जावा–सुमात्रा येथील मंदिरशिल्पांत आहेत खुरपी तलवारी (कुकरी, नायर) आजही केरळमध्ये आढळतात. वीरगळांच्या हातांतील तलवारी खंडा किंवा खुरपी धर्तीच्या आढळतात. कर्नाटकात ‘आद्य–कट्टी’ नावाची तलवार आढळते. हिचे पाते कोयत्यासारखे असते. टिपूचे सैनिक आद्य–कट्टी वापरीत. नेपाळात खंडा, कोश व कुकरी या प्रकारच्या तलवारी प्रचारात होत्या.
तलवारीचा वापर हा जनांमध्ये एवढा रूळला की मराठे, क्षत्रिय हे खंडेनवमी वा विजया दशमीच्या निमित्ताने तलवारीची पुजा करू लागले. तलवारीने त्यावेळी मानवी जीवनात एवढे महत्त्वाचे स्थान पटकावले होते की, तिच्यावरुन बोली भाषेत धारेवर धरणे, धारेवर चालणे इ. सारखे अनेक वाक्प्रचार तयार झाले. शौर्याचे प्रतिक असलेली तलवार अनेक देशांच्या झेंड्यांवर आजही विराजमान झालेली दिसते.
तलवारीचे हात 32 आहेत. ज्यांची नावे आहेत - भ्रामक, अहंकारी, विवादास्पद, प्रतिकूल, विपुलूट, क्रेट, शत्रुत्व, समुद्र, निग्रा, कृपा, कृपा, विध्वंस, एकत्र, कपाळ दिशाभूल, बीटल भ्रामक, पळवाट, पाय, निर्बंध, जमीन, बंड, गति, अपेक्षेने, आक्षेप , पाटण, उत्क्रांतिवादक - प्लूटी, बधूता, स्वास्तव, शोभा, टिकाव, धैर्य, कर्तव्यदक्षता आणि अनुलंब प्रचार.
धातूकामातील प्रगती बरोबर कार्बन, क्रोमियम, झिंक, निकेल, अल्युमिनीयम, मॉलीब्डेनम, तांबे, चांदी; इ मिश्र धातूंच्या बनविलेल्या तलवारी उपलब्ध होऊ लागल्या. तलवारीच्या पात्यांमध्येही एकधारी, दुधारी व बिनधारी (पण टोकदार) अशी विविधता आढळते.प्राचीन भारतीय धातु शास्त्र अतिशय प्रगत होते. आजही जग भरात दमास्कस ब्लेड हे सर्वात प्रसिद्ध आहे. दमास्कस सिरीयाची राजधानी असुन तेथे ही पाती पुर्वांपार बनवली जातात ..पण या साठी लागणारे लोखंड मात्र देशी बनावटीचे असायचे.
पूर्वी तलवार चालविण्याच्या शिक्षणाचा प्रारंभ फरीदग्याने होई. फरीदग्यानंतर तलवार बंदेश (वार आणि डावपेच) लाकडी तलवारीने शिकविले जात. पट्टा चालविण्याचे शिक्षण लाठी–काठीच्या डावांनी दिले जाई. तलवार व पट्टा यांचे तडफी, सरका, डुबी, काटछाट, हूल, गर्दनकाट इ. बंदेशांचा सराव केळीच्या खांबावर केला जाई. महाभारतात बावीस बंदेश सांगितले आहेत. तलवार बंदिस्त ठेवण्यासाठी चामड्याचे किंवा धातूचे म्यान असते. हे म्यान कमरेला अडकविण्यासाठी कमरबंद किंवा कातडी पट्टे असतात. तलवारबाजीत आतापर्यंत ५२ पवित्रे ज्ञात आहेत. त्यापैकी हनुमंती, नारसिंही व सुररवी हे पवित्रे हिंदु सैनिकांचे; तर अलिमद्द सारखे मुस्लिम सैनिकांचे पवित्रे प्रसिद्ध होते. मराठा तलवार आणि फिरंग या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत.
शिवाजी महाराजंची जी भवानी तलवार आहे ती एक फिरंग आहे. फिरंग तलवारीचे पाते हे सरळ असते आणि ती हलकी असते. याउलट मराठा तलवारीचे पाते हे वक्र असते. कालांतराने शास्त्र शास्त्रात प्रगती होवून मराठा मुठीच्या तलवारी उपयोगात आणल्या गेल्या. तलवारीचे वजन संतुलित असणे हे देखील त्या काळी महत्वाचे होते. त्यासाठी मुठीच्या खाली जर आपण बोटावर तलवार तोललीत तर तलवारीचे पाते आणि मुठ यांचे वजन सारखे असावे असा कयास असे.
प्राचीन आदिशक्ती देवी व तलवार, खड्ग यांच्या विविध अंगी पौराणिक मुर्त्या आजही अभ्यासकांना आव्हान आहेत. यांत महिषासुर मर्दिनी, कालिका देवी, आई वज्रेयोगिनी वज्रेश्वरी, चंडिका इत्यादी देवी अवतार विविध शस्त्र युक्त आवेशात पाहून आजही ज्ञानाचे भांडार खुले होते. महिषासुर मर्दिनीच्या हाती असणारी भक्कम तलवार तिचे पाते आजही त्याच गर्जना देत राक्षसांचा संहार करील असे वाटते. यात तलवार आणि ढाल चैतन्य निर्माण करते. देवी सोबतच लढणाऱ्या असुर देवता व त्याच्या हातातील लहान तलवारी प्रकार अभ्यासक अभ्यासू शकतात. पौराणिक कथा व त्यातील शस्त्रे नामे हा अत्यंत चिकित्सक विषय असून आजही त्यातील काही संस्कृत परिभाषा जपणारे शस्त्र शब्द अबोल आहेत. यातच १७ व्या शतकात मराठयांनी जेजुरी खंडोबा, महालक्ष्मी इत्यादी देवस्थानास वाहिलेल्या तलवारी अमूल आणि देखण्या आहेत. कुण्या एका काळी दृष्ट असुरांचा संहार करणारी तलावर, रणनीतीचा पराक्रम गाजवणारी तलवार, तर कधी नवस पूर्ती करणारी तलवार, तर कधी जुन्या स्पर्धा खेळांत वापरण्यात येणारी तलवार आपली जिज्ञासा वाढवते !! १८ व्या शतकात ब्रिटिश राजवटीत अनेक तलवारी शस्त्रे यावर बंधने आली. पुढे ही बंधने समाजात इतकी ठोस मुरली की, यांचा वापर कसा करायचा याचेही विस्मरण झाले. काही जिज्ञासु अभ्यासकांनी, कलाकारांनी, विद्यार्थ्यांनी, गुरूंनी काही राज्यात याचे शिक्षण सराव अबाधित ठेवला यामुळे या प्राचीन अमूल्य ठेव्याचे अस्तित्व जिवंत राहिले. आजवर मुक्त भटकंती व संकलन माध्यमातून "तलवार" या शस्त्र देवतेचे स्मरण करावे म्हणून हा छोटेखानी प्रयत्न.
*#संदर्भ तपशील :
१ मराठी विश्वकोष खंड
२ प्राचीन युद्धकला युध्दविद्या लेख
३ युद्धनीती व युद्धतंत्र : श्रीदत्त राऊत सर
४ ट्रेक क्षितिज संस्था २०१० शस्त्र संकल्पना आणि विकास
५ श्री गिरीज जाधव सर लेखमाला
६ छायाचित्रे : श्रीदत्त सर संकलन
७ शिवशौर्य ट्रेकर्स शस्त्र प्रदर्शन छायाचित्र टिटवाळा
८ श्री प्रतापशस्त्रागार
९ आदिशक्ती वज्रेयोगिनी वज्रेश्वरी
१० विकीपीडिया !
*सर्वांचे #आभार*

No comments:

Post a Comment