Followers

Saturday, 11 April 2020

वीरसतीगळ

सुनिल आनंदा सणस

प्रत्यक्ष किल्ल्या बरोबर, किल्ल्या खालचे गाव, किल्ल्या पर्यंत जाणारे रस्ते यावर अनेक ऐतिहासिक खुणा, अवशेष विखुरलेले असतात . किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात देवळात किंवा पारावर अनेकदा वीरगळ, समाध्या, सतीचे हात, तुळशी वृंदावन, छत्री इतिहासाचे साक्षिदार इत्यादी पाहायला मिळतात. युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणुन वीरगळ उभारले जात असत. या स्मारकांमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत असे. त्या वीरांबरोबर सती गेलेल्या स्त्रीयांसाठी सतीचा हात उभारला जात असे. तर मातब्बर सरदार, राज घराण्यातील लोक यांच्या समाध्या व स्त्रीयांसाठी तुळशी वृंदावन उभारले जाई.
वीरांबरोबर सती जाणार्‍या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा बनवल्या जात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळ्णार्‍या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगड्या असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या स्त्रीच्या मुलांच्या प्रतिमा असाव्यात. या हाताची रचना आशिर्वाद देणार्‍या हाताप्रमाणे असते. तसेच सतीशिळा देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत . त्यामुळे सतीशिळेची शेंदुर लाऊन पूजा केल्याचे बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळते. वीरगळी प्रमाणे एक, दोन किंवा तीन शिल्प चौकटीत सतीशिळा कोरलेली असते. त्यात खालच्या चौकटीत चितेवर बसलेली स्त्री, चितेच्या बाजूला उभी असलेली स्त्री किंवा नवर्‍याच डोक मांडीवर ठेऊन चितेवर बसलेली स्त्री, वाघावर , घोड्यावर बसलेली स्त्री कोरलेली असते. दुसर्‍या चौकटीत नवरा बायको हातात हात घालून उभे राहीलेले दाखवलेले असतात. पहिल्या किंवा दुसर्‍या चौकटीत उजव्या बाजूला सतीचा कोपरापासूनचा हात दाखवलेला असतो. तिसर्‍या चौकटीत नवरा बायको पिंडीची पूजा करतांना दाखवलेले असतात. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले असतात. वीराबरोबर त्याच्या दोन किंवा तीन पत्नी सती जात असत. त्यांचे प्रतिक म्हणून कोपरात वाकवलेले दोन किंवा तीन हात दाखवलेले असतात. काही वीरगळामध्ये वीराची पत्नी आणि सतीचा हातही दाखवलेला असतो. त्याला
वीरसतीगळ असे म्हणतात. ही वीराची आणि सती या दोघांची एकच स्मृतीशिळा असते.

No comments:

Post a Comment