"जलदुर्ग"
लेखाची सुरवात वाचल्यावर तुम्हाला वाटलं असेल की मी महाराष्ट्रातल्या एखाद्या जलदुर्गाबद्दल काही लिहलं असेल. पण तसं नाहीये. आज आपण "जलदुर्ग" नावाच्या एका गिरिदुर्गची सफर करणार आहोत.
रायचूर जिल्ह्यातील लिंगसूर तालुक्यात लिंगसूरपासून जेमतेम २० किलोमीटर अंतरावर "जलदुर्ग" नावाचा किल्ला आहे. स्थानिक कन्नड भाषेत जलदुर्ग म्हणजे 'पाण्यावरील गड'. पण हा गड समुद्राच्या पाण्यात बांधलेला नसून तो नदीमुळे तयार झालेल्या बेटाच्या एका टोकावर बांधलेला आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून बागडत अवखळ वाहणाऱ्या कृष्णा नदीचा प्रवाह पुढे कर्नाटकात फारच विस्तीर्ण होत जातो. पश्चिमेकडून वाहत येणारा कृष्णा नदीचा प्रवाह लिंगसूर गावाजवळ एका बेटामुळे विभागला जातो. याच बेटावर अगदी मोक्याच्या ठिकाणी "जलदुर्ग" किल्ला आहे. नदीच्या प्रवाहामुळे बेटाच्या तिन्ही बाजूने तयार झालेल्या अजस्त्र दऱ्या आणि वाहून आलेले मोठ मोठाले दगड याचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी अचूक उपयोग केलेला दिसून येतो. दुहेरी तटबंदी, त्यात जवळपास सात दरवाजे, काही चौकोनी तर काही गोलाकार बुरुज, बालेकिल्ल्यात असणारे राजवाड्याचे अवशेष अश्या अनेक गोष्टी या किल्ल्यात पाहता येतात.
विजापुराच्या आदिलशाही राज्यकर्त्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. इंग्रजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग जेल म्हणजे कैद्यांना ठेवण्यासाठी केला गेला. त्यावेळी गुन्हेगारांना किल्ल्याच्या टोकावरून कृष्णेच्या खडकाळ पात्रात ढकलून देण्याची शिक्षा सुनावली जात असे. त्यावेळी या किल्ल्याला "जेलदुर्ग" म्हणत त्याचेच पुढे जलदुर्ग झाले असे देखील सांगितले जाते. रायचूर परिसरातील हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून सरत्या पावसाळ्यात म्हणजे सप्टेंबरनंतर चारीबाजूने वाहणारा कृष्णेचा खळाळता प्रवाह पाहण्यासाठी येथे अलोट गर्दी उसळते.
चला तर मग तुम्ही केव्हा भेट देताय या अनोख्या जलदुर्गाला?
- © विनीत दाते
No comments:
Post a Comment