Followers

Friday 7 May 2021

माळवद म्हणजे काय ?

 

माळवद म्हणजे काय ?

पूर्वीच्या वाडा बांधकामातील महत्वाचा घटक म्हणजे माळवद किंवा धाबें कसे बनवत असत हे बऱ्याच जणांना माहीत नसते तसेच सध्याच्या काळात घरामध्ये थंडाव्यासाठी फ्रीज आणि उबदार वातावरणासाठी हिटरचा वापर केला जातो. मात्र आपल्या पूर्वजांनी पारंपरिक ज्ञानातून विकसित केलेली माळवदासारखी उपयुक्त पद्धत बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून हा लेखन प्रपंच.
काळाप्रमाणे आपण मराठी भाषेतील शब्द विसरत चाललो आहोत. त्या शब्दाच्या बदल्यात आपण त्याला पर्यायी दुसरे शब्द वापरतो आणि आपल्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेचा समावेश करतो. माळवद हा मराठी भाषेतील ऐतिहासिक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ “मातीच्या घराची गच्ची किंवा माळवद किंवा धाबें ” असे सुद्धा म्हणू शकतो. घरातील वातावरण नियंत्रीत ठेवण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे माळवद. पूर्वीच्या काळी माळवदाचा वरील भाग हौदासारखा करत असत. घराच्या माथ्यावर चारी बाजूंनी फूटदीड फूट उंचीच्या भिंती असत. त्या भिंतीवर मोठमोठे लाकडी ओंडके आधारासाठी आडवे टाकले जात. लाकडाचे ओंडके म्हणजे तुळ्या. आडव्या लाकडी तुळ्यावर फळ्यांचे तुकडे उभ्या पट्ट्या लावल्या जात. त्या पट्यावर पळसाची पाने, सागाची पाने, गवत टाकून त्यावर पांढऱ्या मातीच्या विटा-भेंडे अंथरत. (पांढरी माती कशी तयार करत असत हे आपण मागील लेखात पाहिले आहे) मग त्यावर ६ ते ९ इंचाचा पांढऱ्या मातीचा थर देऊन पाणी मारून चोप दिला जाई. नंतर दुसरा थर देऊन असाच चोप दिला जाई. असे चोप देण्याचे काम चालू असतांनाच एका पिंपात ३ शेर गुळ व २ शेर बेलफळाचा गर कालवून ते पाणी वरचेवर शिंपित असत. त्यात पोकळ सांधा कोठेही राहणार नाही याची काळजी घेत असत. असा चोप दिल्यामुळे वरचा पृष्ठभाग कठीण व गुळगुळीत होतो. २० फूटास १ फूट इतका ढाळ त्याच्या वरच्या पृष्ठभागास येईल अशा बेताने घालत असत.
पांढरी माती पाणी धरून ठेवत नसल्यामुळे पावसाळ्यात माळवदातून पाणी खाली झिरपत नसे. माळवदावर साठलेले पाणी निघून जाण्याकरता पन्हाळी लावलेली असे. त्यास पाणीपट्टी म्हणतं असत. वरचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी व पाणी मध्ये सोकले जाऊ नये, लिकेज होऊ नये म्हणून पांढऱ्या मातीमध्ये वरच्या थरात गुळ, काकवी, चुना, डिंक, अशा मिश्रणाचा वापर करून घोटाई करत असत. व त्या घोटाईवर जवसाचे पाणी मारले जाई त्यामुळे ते गुळगुळीत होई. अतिशय उष्णता किंवा थंडी यांच्या योगानें त्यांची लांबी कमीजास्ती झाल्यामुळे (अंकुचन- प्रसरण पावल्यामुळे) तडा पडण्याचा संभव असतो. पण अशा तडा बेलतेलात कळीचा चुना व रेती किंवा गुळचुना व रेती यांच्या मिश्रणाने भरून काढल्या असता त्यातून पाणी उतरण्याचा संभव रहात नाही. माळवद तयार करण्यामागे घरातील वातावरण नियंत्रीत राहावे हा उद्देश असे. माती आणि लाकूड दोन्ही घटक उष्णता रोधक असल्याकारणाने उष्णतेस अटकाव होई आणि माळवद असलेल्या घरातील वातावरण नियंत्रीत राही. त्यामुळे माळवदाखालील घरामध्ये वातावरण उन्हाळ्यात थंडगार तर हिवाळ्यात उबदार राहत असे.
पूर्वी बांधकामात सिमेंट वापरले जात नव्हतं. त्याला पर्याय होता पांढरी माती. ही माती चिवट असायची. उन, वारा,पाऊस, धरणीकंप यांचा तडाखा सोसून गेली तीनचारशे वर्षे झाली तरी पांढऱ्या मातीच्या भिंती, बुरुज, माळवद आजही सुस्थितीत आहेत. आत्ताच्या सिमेंटलाही मागे टाकेल अशी ही पांढरी चिवट माती यावर संशोधन व्हायला पाहिजे.
विलास भि. कोळी
४ एप्रिल २०२१

No comments:

Post a Comment