महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाने प्रभावित झालेला तत्कालीन कवी कवींद्र गोविंद्र याने अत्यंत वीररसप्रधान असे त्यांच्या पराक्रमाचे ओवीबद्ध वर्णन लिहून ठेवले आहे. त्यातील काही भाग पुढील प्रमाणे :
तुळजा प्रसन्न झाली । पातशाही हाती आली ।
जयलक्ष्मी माळ घाली । शिवाजीस आदरे ॥
दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी ।
ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ॥
जाणा तुम्ही आजि साची । आज्ञा झाली शंकराची ।
सर्व सेना दिल्लीशाची । अतंकास वोपली ॥
मानहानी दिल्लींद्राची । सभा हासते इंद्राची ।
आजि काल कवींद्राची । सर्व चिंता हारली ॥
रामराणी भद्रकाली । रणरंगी कृद्ध झाली ।
प्रलयाची वेळ झाली । मुगल हो सांभाळा ॥
वसे रत्नसिंहासनी । भोसल्यांचा शिरोमणी ।
शिवराज चिंतामणी । दिनमणि उदये ॥
महाराणी ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र आणि राज्यकारभाराचे क्षेत्र या दोन्हींवर आपली पकड इतक्या योग्य रीतीने ठेवली की तत्कालीन मुस्लिम इतिहासकारांनाही यासंबंधी त्यांची प्रशंसा करावी लागली. औरंगजेबाच्या छावणीत असलेल्या काफीखानाने महाराणी ताराबाई यांच्या कर्तुत्वासंबंधी पुढील प्रमाणे म्हटले आहे :
“राजारामाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या प्रमुख कारभाऱ्यांनी ताराबाईंना राजपुत्राची मार्गदर्शक म्हणून नेमले. ताराबाई राजारामाची बायको आणि राजपुत्र शिवाजीची आई होती. ती अतिशय बुद्धिमान आणि चतुर स्त्री होती. तिने पतीच्या हयातीतच आपली लष्करी आणि मुलकी कारभारातील चुणूक दाखवली होती. तिला सैन्याचे डावपेच समजत असत आणि राज्यकारभाराची सूत्रेही हलवता येत असत. तिने या दोन्ही क्षेत्रात जे चातुर्य दाखवले, जो पराक्रम केला आणि कर्तबगारी निदर्शनास आणून दिली; तिच्यातून एकीकडे मोगलांशी टक्कर देण्याची तिचे सामर्थ्य वाढत होते आणि दुसरीकडे मराठ्यांची सत्ताक्षेत्रही विस्तारत होते.”
आणि हे सर्व महाराणी ताराबाईंनी फारच थोड्या अवधीत घडवून आणले. त्यामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढू लागला आणि त्याबरोबरच औरंगजेबची चिंताही वाढू लागली. छत्रपती राजाराम महाराजांचा आकस्मित आणि अकाली अस्त झाल्यामुळे औरंगजेबाला जो आनंद झाला होता तोही तितकाच झपाट्याने ओसरू लागला.
संदर्भ - स.मा.गर्गे, करवीर रियासत
चित्रकार : बाबुराव पेंटर
स्त्रोत : श्री छत्रपती शाहू संग्रहालय, न्यू पॅलेस, कोल्हापूर
साभार
मराठा रियासत या पृष्ठावरून..
No comments:
Post a Comment