#आज आपण #सोंडाई #किल्ल्यावर लेख लिहतो आहोत.अगदी आमच्या घरापासून जेमतेम 10 ते 11 किमी अंतरावर असलेला सोंडाई किल्ला.
#महाराष्ट्र मधील #रायगड जिल्ह्याचं विशेष वैशिष्ट्य की अनेक दुर्ग आपली विशेषतः दाखवते. हे कदाचित इतर जिल्ह्यात खूपच कमी पाहायला मिळते.अगदी सागरी दुर्गापासून ते डोंगरी दुर्गापर्यतच्या या प्रवासातील दिसणारं दुर्ग वास्तूस्थापत्य हे खरोखरीच पाहण्यासारखं आहे आणि आज आपण आपल्या या अभ्यास मोहिमेत सोंडाई किल्ला पाहणार आहोत.
#सोंडाई किल्ल्यावर येण्याचा मार्ग :-
जुना मुबंई पुणे हायवे वरून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी गाठायची आणि पुढील प्रवास निसर्गाच्या कुशीत सर करायचा.आता इकडे याल कसे.जर कधी पनवेल वरून आलात तर चौक कर्जत फाटा वरून साधारण तीन किमी मुख्य कर्जत रस्त्यावर डाव्या बाजूला बोरगाव सोंडेवाडी कडे जायला डांबरी रस्ता झाला आहे.सद्या इकडे विकास कामे जोरात सुरू आहेत.या मुख्य रस्त्यावर बोरगाव फाट्यावर उतरायचं आणि इथून दहा सीट इको रिक्षा उपलब्ध आहेत ते थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या सोंडेवाडी इथे यायचं. कोणी जर मुबंई वरून येणारा असेल तर थेट पनवेल रेल्वे स्टेशन आणि तिथून अंदाजे २२ किमी चौक कर्जत फाटा.
#पुणे मार्गे येत असेल कर्जत रेल्वे स्टेशन वर येऊन तिथून सोंडेवाडी ला येण्यासाठी रिक्षा ची सुविधा आहे.
*********
#सोंडाई #दुर्ग :- देवी सोंडाई मातेच्या नावावरून सुप्रसिद्ध असलेला सोंडाई दुर्ग.अगदी एका दिवसांत होणारा हा निसर्गरम्य किल्ला आहे.जर आपण या रस्त्यावरून जात असाल तर हा किल्ला नक्की पाहा आणि हो एकदा पाहाल तर पुन्हा पुन्हा याल.तिन्ही ऋतूत हा किल्ला आपले निसर्गरम्य रूप दाखवतो.
#मोर्बे धरणाच्या अगदी शेजारी वसलेला #बोरगाव हा गाव लागतो.पुढे जसा आपण जातो तसे सोंडाई किल्ल्यावरील भगवा ध्वज आपल्याला खुणावतो.समोर दिसणाऱ्या माथेरानच्या डोंगररांगा आणि याहीपेक्षा मोर्बे धरणाचा विस्तीर्ण भाग आपल्या नजरेस दिसतो आणि थोडं का होईना आपण एक दोन फोटो घ्यायला थांबतो.बोरगाव सोडलं की रस्त्यावरून येताना वाघेश्वर गाव लागतो,इथपर्यंत यायला दोन ते तीन मिनिटांचा घाट रस्ता लागतो,स्वतः ची वाहन असेल तर सावकाश चालवा.पण घाट रस्ता सोंडाई दुर्ग वर आणखी भर टाकतो.जस जस आपण जवळपास येतो तेव्हा मन प्रसन्न होते.घाट रस्ता संपला की वाघेश्वर गाव लागते.रस्त्यावर श्री पप्पू झोरे यांचं घरं लागते. झोरे येथील ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत.त्यांचा मोबाईल नंबर ( 9689567917 ) दिला आहे.
#इथे तुम्ही आपल्या जेवणाची ऑर्डर देऊ शकता.शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही जेवणाची ऑर्डर तुम्ही देऊ शकता.शाकाहारी थाळी साधारण १३० रुपये आणि मांसाहार थाळी १७० रुपयांत.अगदी चुलीवर तयार केलेले घरगुती जेवण मिळते.किल्ला पाहायला जाण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी ऑर्डर देऊ शकता.
#इथे राहण्याची आणि जेवणाची,पार्किंग अशी तिन्ही प्रकारे तुमची उत्तम सोय होऊ शकते.सह्याद्रीच्या कुशीत जेव्हा जेव्हा गडकिल्ले पाहायला याल तेव्हा तेव्हा या सह्याद्रीच्या मायेच्या माणसांकडून मुद्दाम जेवण घ्या,दोन पैसे त्यांना मिळतील आणि एक प्रकारे आपल्या हातून शिवकार्य सुद्धा घडेल.
#विशेष म्हणजे याच सोंडाई दुर्ग वर आपला शिवकार्य ट्रेकर्स खालापूर रायगड महाराष्ट्र राज्य हा दुर्गसवर्धन ग्रुप गेली चार वर्षे हुन अधिक शिवकार्य करीत आहे. अभ्यास मोहीमेला व श्रमदान मोहिमेला जात असताना जेवणाची ऑर्डर देऊन गेलो.पप्पू झोरे यांचा लहान भाऊ कु.बबन झोरे हा आपला माजी विद्यार्थी आहे.अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत आपलं शिक्षण एम कॉम चं शिक्षण पूर्ण करून पॉवर लिप्ट स्पर्धेत भारतातून सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक जिंकले आहे.नुकतीच त्याची आंतरराष्ट्रीय पॉवर लिप्ट स्पर्धेत भारत देशाचे नेतृत्व करायला निवड झाली आहे.म्हणून या गोल्डमेडलिस्ट ला भेटायला विसरू नका.बबन झोरे यांचे मोठे बंधू चंदर झोरे हा सुद्धा आपला माजी विद्यार्थी आहे.एकंदरीत झोरे यांचं संपूर्ण कुटुंब प्रेमळ आहे.आम्ही नेहमीच आपल्या अभ्यास मोहिमेत सांगत आलो आहोत की ही सह्याद्रीची माणसं आपल्याला मायेची ऊब देतात.
#वाघेश्वर वरून १ किमी अंतरावर सोंडेवाडी लागते हे सोंडाई किल्याचं पायथ्याशी असलेले मुख्य गाव.आदिवासी बांधव येथे मोठया प्रमाणात वास्तव्य करतात.या बांधवाना कुठेतरी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून इथे दुचाकी आणि चार चाकी साठी पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.किल्ल्यावर जाईपर्यंत मध्ये आदिवासी माता भगिनी यांची लहान लहान दुकाने आहेत.या ठिकाणी लिंबू सरबत,काकडी,आणि आणखी काही दुकाने आहेत.फक्त एक लक्षात ठेवा काहीही खरेदी कराल तर कचरा इतस्ततः न टाकता आपल्या बॅग मध्ये ठेवून घरी आल्यावर त्याची विल्हेवाट लावा.
#वरती उल्लेख केला आहे की सोंडाई दुर्ग वर शिवकार्य ट्रेकर्स खालापूर रायगड महाराष्ट्र राज्य हा दुर्गसंवर्धन ग्रुप गेली चार वर्षे हुन अधिक काळ सोंडाई दुर्ग वर श्रमदान मोहीम राबवत आहे.अलीकडेच संपूर्ण किल्ला पायथ्यापासून ते माथ्यापर्यत स्वच्छ करण्यात आला होता.यानंतर काही ठिकाणी पायऱ्या आणि योग्य त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
#सोंडेवाडी या ठिकाणी वाहन पार्किंग केल्यानंतर उजव्या बाजूला थोडी चढण लागते.चढण संपली की एक पठार लागते.याच पठारावर दिवाळीत लक्ष्मीपूजन सोहळ्याच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते.सोंडाई किल्ल्यावर देवी सोंडाई मातेचे स्थान असल्याने येथील स्थानिक बांधवामध्ये मध्ये विशेष श्रद्धेचं स्थान आहे.या यात्रेला महाराष्ट्रातील अनेक गावातून भक्तगण येत असतात.अनेक लहान लहान मोठी दुकाने,रंगीबेरंगी आनंदी लमय वातावरण यावेळी पाहायला मिळते.
सोंडाई दुर्ग ची पहिली पायरी :- पठारावर आल्यावर पहिलीच देवी सोंडाई मातेची पहिली पायरी लागते.इथे शिवकार्य ट्रेकर्स ची सूचना फलक सुद्धा आहे.देवी सोंडाई माते की जय. मातेच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन पुढील ट्रेक ला सुरुवात करतात.ट्रेक जरी जास्त मोठा नसला तरी पुरेपूर ट्रेकिंग चा आनंद देणारा असा ट्रेक आहे.वेडी वाकडी वळणे घेणारी चढण,मध्येच सपाटी यामुळे मन प्रसन्न होते पावसाळ्यात हा ट्रेक करताना सोसाट्याचा वारा असतो आणि पाऊस सुरू झाला की सर्व धुक्यात जाते आणि येथील निसर्गरम्य वर्णन करणं म्हणजे निशब्द...
मध्ये मध्ये काही कातळ टप्पे आहेत येथून पावसाळ्यात थोडं जपून.
#देवी #सोंडाई च्या पहिल्या पायरीपासून अंदाजे ३० मिनिटांच्या प्रवासानंतर सोंडाई किल्याच्या अगदी आपण समीप येतो.
इथे आल्यावर येथील स्थानिक बांधवांनी काही झाडे लावली आहेत ती नजरेस दिसतात.डाव्या बाजूला कातळात खोदलेली दोन पाण्याची जोडटाकं आहेत.
या टाक्यांत १२ महीने पाणी असते. उन्हाळ्यात मात्र टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोरी लागते.पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे टाकं खूप खोल आहे,म्हणून थोडी सावधानता बाळगावी.आणि पाणी स्वच्छ ठेवा.
येथून थोडं पुढे आलो की या ठिकाणाहून सोंडाईच्या शेजारील सोंडाई पेक्षा उंच डोंगर दिसतो.या डोंगरावर मुख्य डोंगरापासून वेगळा उभा असलेला खडक आपले लक्ष वेधून घेतो.आणि याच ठिकाणी सोंडाई किल्याच्या वैभवात भर टाकणारी पहिली लोखंडी शिडी लागते.खरं म्हटलं तर सोंडाई किल्याच वैभव म्हणजे ही शिडी आहे.येथील स्थानिक बांधवांनी ही लोखंडी शिडी उभी केली आहे.या शिडीवरून एकाच वेळी गर्दी करू नका.
गर्दी न करता सावकाश जावे.पहिली शिडी संपली की दुसरी शिडी सुरू होते,यापूर्वी एका कपारीत काही खोबणी कोरलेल्या आहेत त्याचा आधार घेत, बाबूंच्या साहाय्याने तयार केलेल्या शिडी चा वापर करावा लागत. पण आता येथील स्थानिक बांधवांच्या पुढाकाराने किल्यावर अवघड जागी लोखंडी शिडी तयार करण्यात आल्या आहेत म्हणून किल्ल्यावर जाणं खूपच सोयीस्कर झाले आहे.
ही दुसरी शिडी संपली की पाण्याचं एक मोठं टाक लागतं त्याच्या शेजारीच एक आणखी लहान टाक आहे.यातील पहिलं टाक सोंडाई किल्ल्याचं दुर्ग रूप चं पुरावा देतो. पहिल्या पाण्याच्या टाक्यात २ दगडी खांब कोरलेले आहेत. या खांबटाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.येत्या पुढील काळात या टाक्यातील पाणी नक्कीच पिण्यायोग्य होईल यासाठी येथील स्थानिक बांधव आणि शिवकार्य ट्रेकर्स ने कंबर कसली आहे.दुसर टाक लहान आहे.पहिल्या टाक्यात मे महिन्यापर्यंत पाणी असते तर लहान टाक्यात पाणी नसते.पहिलं टाक उंचीला अंदाजे 20 फूट आणि रुंदीला दहा फूट असावे.
टाक पाहून झालं की परत बाजूला रेलिंग च्या साहाय्याने वरती यायचं.परत एक नवीन बसविलेली शिडी लागते.ही शिडी सर केली आपण सोंडाई गडमाथ्यावर येऊन पोहोचतो.
गडमाथ्यावर येण्याच्या अगोदरच आपली पादत्राणे काढून वर जावे लागते.गडावर सोंडाई देवीचे स्थान असल्यामूळे हा गावकर्यांच्या श्रध्देचा भाग आहे आणि आपण याचा मान ठेवावा.
गडमाथ्यावर काय पाहाल
गडमाथा लहानसा आहे. आहे.वरती आल्यावर सर्व प्रथम एका लोखंडी पाईपला लावलेल्या फडकत्या भगव्या झेंड्यांचं दर्शन होते. येथे एका झाडाखाली दोन दगडात कोरलेल्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती सोंडाई देवीची आहे.बाजूलाच बसण्यासाठी एक लोखंडी बाकडा आहे.गडमाथ्यावरून माथेराच्या डोंगर रांगा, समोर दिसणारा मोर्बे व वावर्ले धरण दिसतो.याशिवाय किल्ले माणिकगड,कर्नाळा,इर्शालगड, विकटगड,कोथलीगड व आजूबाजूचा विस्तिर्ण परिसर अगदी स्पष्ट दिसतो.
देवी सोंडाई मातेच्या दर्शनाला नवरात्रीला विशेष गर्दी होत असते.पावसाळ्यात येथील निसर्ग भरात असतो.गडावर जरी जास्त फारसं अवशेष नसतील तरी येथील लोखंडी शिडी,शिडीच्या पायथ्याशी असलेल्या कातळात खोदलेल्या पाण्याच्या दोन टाक्या आणि दुसऱ्या शिडी च्या वरती असणारा सर्वात मोठा कातळात खोदलेला पाण्याचं टाक आणि त्याच्यात असलेले दगडाकृती कोरलेले दोन खांब आणि शेजारी असलेले लहान टाक सोंडाई किल्ल्याबद्दल बरचसं सांगून जातो.
बहुतेक या किल्ल्याचा विस्तार पाहता याचा वापर टेहळणीसाठी होत असावा.माथेरान च्या डोंगर रांगात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याला आवर्जून भेट द्यावी एवढं मात्र शंभर टक्के म्हणेल,येथील आल्हाददायक उत्तम हवा आपल्याला नेहमीच प्रसन्न ठेवते.देवी सोंडाई मातेला वंदन करून आपण लवकरच नवीन ट्रेकिंग अभ्यास मोहिमेत भेटू.
सह्याद्रीचा दुर्गसेवक
सोंडाई किल्ला अभ्यास मोहीम 2021
श्री रोहिदास राघो ठोंबरे
।। जय शिवराय ।।
--------------
फोटोग्राफी/शूटिंग : Rohidas Thombare and all Shivkary Trekkers Teams
.
.
आपल्या दुर्ग अभ्यास मोहिमेचे लेख वाचण्यासाठी आणि प्रत्यक्ष पाहण्यासाठी कोणत्याही सोशल मीडियावर क्लीक करून नेहमी सोबत रहा.
Subscribe this Channel and press the bell icon button.
Instagram ID
Username:
rohidas_thombare_5641
।। जय शिवराय ।।
No comments:
Post a Comment