Followers

Sunday 2 May 2021

*_श्रीमान रायगड_*

 


*_श्रीमान रायगड_*
रायगड हा नंदादीपाच्या डोंगरावर जितका विस्तीर्ण पसरला आहे तितकाच विस्तीर्ण शिवभक्तांच्या हृदयात वसलेला आहे किल्ले रायगड हे बघण्याचं नाही तर जगण्याचं ठिकाण आहे साक्षात महाराज...हो ! साक्षात महाराज येथे वास्तव्यास होते.त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं स्वराज्य वृद्धीस व आकारात आणलं ते येथूनच आणि अंतसमयी पंचतत्वातही याच तीर्थावर विलीन झाले...
रायगड जगताना नेहमीच रोमांचित व्हायला होतं. तेथे चालताना अचानक विचार येतो, महाराज याच वाटेनं कधी चालले असतील,महाराजांची पायधूळ येथील वाटेवर पडली असेल. येथून जाताना महाराज काय बरं बोलत गेले असतील? ते बोल परत ऐकायला मिळतील का; या भाबड्या आशेने भटका जीव राजसदर ते जगदीश्वराच्या दिवसातून शंभर फेऱ्या करत बसतो शिवइतिहासाचं वेड लागल्यासारखं होतं वाघ दरवाज्याच्या चिरांशी मन बोलू लागतं, पंतसचिवांच्या वाड्यात कुणीतरी भेटून काहीतरी सांगेल अशी अपेक्षा करू लागतं, राजसदरेवर कुणीतरी गारद दिल्याचा भास होतो. महाराजांच्या महालाच्या काल्पनिक आरश्याला मन विचारू लागतं की महाराजांचं रूप कसं होतं? त्या दगडांकडून उत्तरांची वेडी अपेक्षा करू लागतं...अगदी प्रत्येकवेळी ! हे कदाचित एकमेव असं वेड आहे ज्याचा इलाज हा 'ते वेड लागण्याचं कारणच' आहे...
रायगडावर प्रचंड ऊर्जा आहे 'Energy can neither be created nor destroyed' या विज्ञानातील सिद्धांताची व इतिहासाची सांगड घालून पाहिली तर राजांच्या देहातील प्रचंड ऊर्जा ही रायगडाच्या मातीत आणि सभोवतालच्या आसमंतात सामावली आहे त्या मातीत गेल्यानंतर आणि त्या आसमंतात श्वास घेतल्या नंतर झुकलेल्या माना ताठ होतात, खचलेल्या मनाला उभारी मिळते, स्वैर झालेल्या वर्तनाला योग्य दिशा मिळते हा शिवभक्तांचा अनुभव या 'ऊर्जा थीअरी' ने सिद्ध होतो यात शंका नाही. हा ऊर्जेचा स्रोत इतका प्रचंड आहे की तीनशेचाळीस वर्षांनंतरही तो तितकाच आहे व कधीही तो लोप पावणं अशक्यच !..
कदाचित रायगडाला प्रकाशित करणाऱ्या त्या सूर्याचंही रोज गर्वहरण शिवतीर्थावरील प्रचंड ऊर्जेने होत असावं म्हणून तो राजांस मुजरा घालून प्रायश्चित्तासाठी पुन्हा मावळतीला जात असावा !...
- डॉ ज्ञानेश्वर गुंजाळ..
- - ➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment