छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा दरारा.
छत्रपती शाहू महाराज यांचा प्रधानांवर पुष्कळ दरारा असे. त्यांच्या हातून महाराजांच्या मर्जीविरुद्ध कांहीं गोष्ट घडली तर महाराजांस फार राग येत असे, व मग प्रधानांना त्यांच्या पुढे नाकदुऱ्या काढितां काढितां पुरे वाट होत असे. बाजीराव, बाळाजी बाजीराव, चिमाजी आपा, सदाशिवरावभाऊ वगैरेंवर शाहूमहाराजांची गैरमर्जी झाल्याबद्दलचीं पत्रे केव्हां केव्हां दृष्टीस पडतात. तीं पाहून शाहू महाराजांच्या रागाची कल्पना करितां येते. अशा मासल्याचे एक पत्र येथें देतो. या पत्रामध्यें, प्रधानांनी , कोल्हापूरच्या संभाजी महाराजांविरुद्ध लढाई करणाऱ्या राणोजी घोरपडे व भगवंतराव रामचंद्र या दोन सरदारांस सैन्याची कुमक दिली, म्हणून शाहू महाराज यांनी, चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी आपा ह्यांची चांगली कानउघडणी केली आहे.
"राजमान्य राजश्री चिमणाजी बल्लाळ यांस आज्ञा केली ऐसी जेः- चिरंजीव राजश्री संभाजी राजे यांसी राणोजी घोरपडे व भगवंतराव रामचंद्र यांणी अमर्यादा केली. त्यांचे पारिपत्य चिरंजीव राजश्री करीत असतां, तुह्मीं आपणांकडील पांच सातशें राऊत घोरपडे यांचे मदतीस पाठविले आहेत, ही गोष्ट उत्तम की काय ? स्वामींचा व चिरंजीव राजश्रींचा द्वैतार्थ नसतां, घोरपडे यांचे कुमकेस तुम्ही फौज पाठवून, चिरंजीव राजश्री यांकडील प्रांतास उपसर्ग करावा, ही गोष्ट कार्याची नाहीं हल्लीं हे आज्ञापत्र सादर केलें असे. तरी पत्रदर्शनी आपणाकडील फौज माघारी आणविणे, तेणेकडून चिरंजीव राजेश्रीचे चित्तांत कोणे गोष्टीचा विपर्यास न ये, तो अर्थ करणे. त्या प्रांतें लोकांचे कबिले आहेत, तेच लोक गेले, ह्मणून उत्तर लिहून पाठवाल, तरी ते गोष्टी कार्याची नाहीं. चिरंजीव राजश्रीचें पत्र स्वामींस आलें तें बजिन्नस पाठविलें आहे, त्यावरून कळेल. चिरंजीव राजश्री यांनी इतकें लिहिलें असतां, फौजेविषयीं पर्याय लावून लिहाल, तरी सर्वार्थी न लिहिणें. पत्र पावतां क्षण जी फौज गेली असेल, त्यांस पत्रे पाठवून माघारी आणवणे. त्यास उजूर एकंदर न करणें. याविषयींची आज्ञा राजश्री दादोबा यांस केली आहे. ते लिहितील त्यावरून कळेल. "तुम्ही सुज्ञ असतां लोकांच्या सांगण्यावर घोरपडे यांचे कुमकेस फौज, आम्हास न विचारतां पाठविली, हें उचित न केलें. तर देखतपत्र फौजेस बोलावणे. राजश्रीचे (संभाजी) महाराजांचे) व आमचे सख्य आहे हे जाणतच आहां. जर फौज बोलवीत नाहीं, तर आम्ही चित्तांत नाखुष होऊं. तर पत्रदर्शनीं बोलवा. नाहींतर आम्ही त्याचे साहित्य सर्वस्वीं करूं लागतों ही तुम्ही जाणतच आहां. बहुत काय लिहिणें, सुज्ञ असा.""
No comments:
Post a Comment