Followers

Friday, 7 May 2021

वाडा, गढी का पहावेत.

 वाडा, गढी का पहावेत.

पुढच्या पिढीला आपल्या मागच्या पिढ्यांनी काय संचित ठेवले हे दाखवायचे असेल तर पुरातन गढी, वाडे, भुईकोट, गड, किल्ले पाहिले पाहिजेत तरच महाराष्ट्राची थोरवी कळेल. ते आपले ऐतिहासिक वारसा आहेत तो जपला पाहीजे, समजून घेतला पाहिजे, भक्कम वाड्याप्रमाणे त्यातील माणसेही तसीच होती. त्यांनीच इतिहास घडवला आहे. हया वास्तू म्हणजे त्यांची स्मारके आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
वाड्याचे बांधकाम करताना जमिनीच्या पूर्ण जागेवर वाड्याचे बांधकाम करत. तुलना करायचीच म्हटली तर अलीकडील बंगले आणि जुने वाडे यांचे आराखडे बघितले तर परस्पर-संबंध अगदी उलट दिसतो. म्हणजे बंगल्याच्या आराखड्यात प्लॉटच्या साधारण मध्यभागी बांधकाम, समोर व्हरांडा आणि चारी बाजूने मोकळी जागा असते. त्याच्या बरोबर उलट, वाड्यात मध्यभागी मोकळी जागा म्हणजेच चौक आणि चौकाभोवती खोल्यांचे बांधकाम केलेले दिसते.
समृद्ध अशा शिल्पवैभवी महाराष्ट्रीयन वारशाकडे लक्ष गेलं की मन विचलित होत होते. त्यातूनच अभ्यास सुरु झाला. वाचन, निरीक्षण सुरु झाले. विविध व्याख्याने, शोज, वारसास्थळांना भेटी आणि सभासंमेलनातून हजेरी लावायला लागलो. अशा विषयात दिग्गज लोकांनी लिहिलेली ग्रंथसंपदा अभ्यासू लागलो. गडकिल्ले, गढ्या, वाडे, जुनी मंदिरे, जुन्या वास्तू पाहण्यासाठी कायकाय धडपडी केल्या याची जंत्री केली तर खूप मोठी होईल.
इतिहासाचा एक वाचक या नात्याने जे जे ठावे आपणाशी ! ते ते सांगावे दुसऱ्यासी ! शहाणे करून सोडावे सकळजण! या म्हणी प्रमाणे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कित्येक शतके वसा आणि वारसा जोपासणाऱ्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाड्याचे फार मोठे योगदान आहे.
इंजिनिअरिंगमध्ये जसं प्रत्येक रेषेला महत्वं असतं. तसं पूर्वीच्याकाळी इतिहासामध्ये बांधकामातील प्रत्येक घटक/ इलीमेंटसला महत्वं होतं. प्रत्येक घटक त्याचं काहीनाकाही महत्वं आणि उपयुक्तता त्याकाळी दर्शवत होता.
वाडे संस्कृती हळूहळू लोप पावत चालली असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच वाडे शिल्लक राहिले आहेत. मोठमोठे सरदार, जाहगिरदार, सावकार, व्यापारी यांनी तालेवार पध्दतीने वाडे बांधले. अशा वाड्यांच्या दगडविटा घडून गेलेल्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. कुठे तलवारीचा खणखणाट झाला असेल, कुठे खलबतं शिजली असतील. आपापल्या घराण्याच्या वैभवाची साक्ष देणारा, कलाकुसर व वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले वाडे महाराष्ट्राचे आकर्षण आहेत. वाडा,गढ्या हे राजवैभवाचे प्रतिक तर आहेच परंतु ते यशस्वी व्यवस्थापनाचा आणि कारभाराचा नमुना देखील आहेत.
आपण वाडे, गढ्या, किल्ले बघायला जात असतो. तिथे गेल्यावर काय पाहायचे आणि कशासाठी पाहायचं हेच नेमकं माहिती नसते. अशा वास्तू बांधण्यामागे एक उद्देश असतो. एखादे तत्त्वज्ञान असते, हेतू असतो. ते समजून घेतले की, वाडा पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या उत्साहाने पाहता येतो. विविध ईलीमेंट्स त्या विशिष्ट काळावर प्रकाश टाकत असतात. वाड्यात असलेल्या विविध गोष्टी कांही विचार करून निर्मिलेल्या असतात. विविध ईलीमेंट्स आपल्याला सतत मार्गदर्शन करीत असतात.
अनेक बारीकसारीक गोष्टी आपल्याला वाडा कसा पाहावा हे शिकवतात. आपल्या बुद्धीला चालना देतात. कलाकारांच्या कलांना वाव देतात. मग ते कलाकार गवंडी असोत, स्थपती असोत, वास्तुविशारद असोत, मूर्तिकार असोत, रंगारी असोत, लाकूडकाम करणारे सुतार असोत किंवा दगडकाम करणारे बेलदार. असे कुणीही असले तरी त्यांनी निर्मिलेली कला मनसोक्त पहावीत, अभ्यासावीत असे मनोमन वाटते.
प्रत्येक ठिकाणचे वाडा, गढ्या बांधण्यामागील उद्देश वेगवेगळे असतात. एखाद्या गावातील वाडा, गढ्या बांधण्यामागे गावाला एकत्रित ठेवणे हा ही उद्देश असू शकतो. वाडा म्हणजे गावखेड्याची शान, वाड्याची भव्यताच त्या मालकाची श्रीमंती दाखवतं असते. रुंद, उंच व जाडजूड भिंती, दर्शनी भागातून डोकावणारी नक्षीदार लाकडी पडवी ही वाड्याची पाहिली झलक. वाड्याच्या आतल्या भव्य मोकळ्या जागेतलं तुळशी वृदांवन, लाकडी कामानं प्रसन्नता वाढवणारं आतलं लाकूड काम. लाकडी देवघर, दिवाणखान्यातील लोड गाद्याचां बैठकीचा साज, छताला लटकवलेली लाकडी-काचेची झुंबरं, नक्षीदार लाकूडकाम, अघळपघळ स्वयंपाक घर, शयनकक्ष सारी कशी शाही व्यवस्था. वाडा म्हणजे नुसती चहलपहल उस्तव आनंदाला उधाण. गाईच्या शेणाने सारवलेल्या सडासारवणाच्या गंधात रांगोळीच देखणेपण. वाडा म्हणजे अन्नपूर्णेचा सदैव वास आणि दुष्काळात गावाला घासं देणारं ठिकाण. अख्या गावाचं राजकारण, अर्थकारण चालवणारा गावाची आन-बान-शान असलेला. तहसीलदार, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, पटवारी, असे कितीतरी अधिकारी याचं आदरतिथ्य सांभाळणारा म्हणजे वाडा.
वाडा आणि वाड्याच्या भवतालची बारकाईने पाहणी केली की आपल्या लक्षात येईल की वाड्याच्या आजूबाजूने आंब्याची, नारळाची, जांभळाची, केळीची अशा अनेक फळांची बाग. तसेच जास्वंदी,चाफा, जाईजुई, रातराणी, पारिजातक, गुलाब वगैरे फुलांनी नटलेली फुलबाग देखील वाड्याइतकीच रमणीय आणि वाड्याला शोभा देणारे व त्या त्या ऋतूत फळे, फुले देणारे. म्हणजे इथे पर्यावरणाचा देखील विचार केलेला दिसतो.
वाडा हा स्थापत्यकला म्हणून बघायला हवं. ते बघतांना त्यातील प्रत्येक घटक न घटक बघायला हवे. ते घटक व त्यांचे कार्य समजून घ्यायला हवे. ते उगाचच केलेले नाहीत. त्यामागे काहीतरी कार्यभाव आहेत. मग तो दरवाजा असुद्या, त्यावरील सूर्यचंद्र असुद्या. लाकडावरील कोरीवकाम असुद्या. दगडावरील कोरीवकाम असुद्या. वाड्यातील स्तंभ, त्या स्तंभावर कोरलेले काम हे सगळं बघणे. मी फक्त वाडा किंवा गढी पाहून आलो एवढे नसून ते समजावून घ्यायचा ते त्या ठिकाणी असणेचं कारण समजून घ्यायचं. त्यात आपल्या पूर्वजांचं राहणं, त्यातले बारकावे, सुरक्षितता आणि निसर्गाचे संवर्धन भरपूर गोष्टी वाडा पहायला गेल्यावर आपल्याला समजतात. आपण गड किल्ले किंवा ऐतिहासिक वास्तू बघायला जातो त्यावेळी तेथील लिहीलेल्या पाट्या, मार्गदर्शक किंवा जे आपल्या ऐकविण्यात आहे त्यावरच आपण त्याचा अंदाज बांधत असतो.
मी वाडा-गढ्या पाहिल्या असं म्हणतो परंतु आपण त्यात कायकाय पाहिले हे सांगता येत नाही. नुसतचं वास्तू बघणं किवां आपण तिथं जावून आलो. फोटो/व्हिडीओद्वारे सिद्ध करणे नसून त्यापलीकडे कांही असते. म्हणजे तो कसा बांधला, मटेरियल कुठले वापरले, किती काळापासून ते टिकून आहे. ते टिकवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय तंत्रज्ञान वापरले, ज्याच्या रचनेने भल्याभल्या संशोधकांना विचारात टाकल, ज्याच्या भव्यतेची कल्पना आजही आपण करू शकत नाही. असे दुसरे वाडे बांधणे तर सोडाच पण आज जे आहे ते समजून घेण्याची मानसिकता आपली नाही. ह्याहून दुसरी शोकांतिका काय असणार आहे.
शाळेतून आलेल्या कित्येक सहलीतील मुलांना एकाही शिक्षकाने ह्यातली एकही गोष्ट सांगितली नसेल हे मी पैजेवर सांगू शकतो. कारण आपण फक्त आकार दिलेले दगड पुढल्या पिढीला दाखवतो की हे आमच्या पूर्वजांनी बांधले आहे. पण ते बांधताना त्यात जे तंत्रज्ञान वापरल गेलं ह्याबद्दल आमचीच पिढी अनभिज्ञ आहे. तर आम्ही पुढल्या पिढीला काय सांगणार.
पुढल्या वेळी कुठलाही वाडा बघायला जाल तेव्हां त्याचं रूप बघून एकदा विचार करा की मला जर कोणी हे बांधायला सांगितल तर. त्याची उत्तरे जरूर शोधा. की आपले पूर्वज, विज्ञान आणि तंत्रज्ञानात किती पुढे होते हे लक्षात येईल.
जोपर्यंत लोकांना हे सर्व ऊलगडून सांगत नाहीत. तोपर्यंत त्या व्यक्तीला याविषयी आवड निर्माण होत नाही. अशी माहिती प्रथम जाणून घेतली आणि आपल्या आसपास असलेल्या स्थळांना या निमित्ताने भेट देऊन त्यावरील कलाकुसर पाहिली. ते निर्माण करण्यामागची कारणे समजून घेतली तर ते बघण्याची मज्जा आणि पर्यटन अधिक समृद्ध, संपन्न होईल यात तिळमात्र ही शंका नाही.

No comments:

Post a Comment