Vilas Koli| ऐतिहासिक वाडे व गढी .
आठशे खिडक्या नऊशे दारं म्हणीप्रमाणे वाड्याला भरपूर प्रमाणात खिडक्या आणि दरवाजे असतात. खिडकीला झरोके असेही म्हणतात. आज बघतो तशा खिडक्या पूर्वी वाड्याला नव्हत्या. दरवाज्याएवढी एकएक खिडकी असायची. खिडकीची रुंदी कमी आणि उंची जास्त असायची. खिडक्या दोन झडपाच्या असत, ते उघड झाप करता येत असे. त्यामधून बाहेरील दृश्य पाहता येते, बाहेरील व्यक्तीस आतले दृश्य दिसणार नाही, परंतु आतल्या व्यक्तीस मात्र बाहेरील दृश्य स्पष्ट दिसते हे खिडकीची वैशिट्य.
खिडकीला वरच्या बाजूला सूर्यप्रकाशासाठी साधारणत: एक फूट बाय एक फूटाची रंगीबेरंगी काचा लावलेल्या असत. त्यातून उजेड आत येतो. अशा काचांना टोमॅटो काचा म्हणतात. त्यामध्ये बाजरी नक्षीचे डिझाईन असते. अशा नक्षी मुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश आत येत नाही.
खिडक्याच्या दोन्ही बाजूने वेलबुट्टीचे आकर्षक नक्षीकाम केलेले असते. दोन खिडक्या दरम्यान उभे व आडवे लाकडी स्तंभ व त्यावर नक्षीकाम असते. अशा खिडक्यांना कलेचा आधार देऊन त्यांना वैशिष्ठ्यपूर्ण बनवत. त्यामुळे इमारतीचा भाग खिडक्या लक्ष वेधून घेतात.
खिडकीच्या खालच्या बाजूला सुरक्षेसाठी कठडा आणि वरच्या बाजूला महिरप/कमानी असतात. कमानीच्या खालच्या बाजूला द्राक्षाचा घड अथवा केळ फुलाचे सुंदर नक्षी असते. पोपट द्राक्षाच्या घडावर बसून द्राक्ष खात आहे. द्राक्ष व पोपट हे सुबत्तेचे प्रतीक आहेत. अशा खिडक्यांच्या झडपा बसवण्यासाठी हिंजेसचा वापर केलेला असतो. तसेच खिडकी बंद करण्यासाठी कडी कोयंडे असतात. कडीवर नागफनीची नक्षी असते. त्यामुळे कडी काढणे सोपे होते. खिडकीला चिकाचे पडदे लावतात. त्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश, हवा आत येत नाही.
आठशे खिडक्या नऊशे दारं म्हणीप्रमाणे वाड्यातील चुकून एखादी खिडकी अथवा दरवाजाची कडी लावायचे राहून गेले तरी ती खिडकी किंवा दरवाजा सहजासहजी उघडत नाही. असे दरवाजे, खिडक्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन्ही दारे बंद करताच त्याच्या खाचा एकमेकात चपखल बसतात आणि किती जोर लावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर त्या उघडत नाहीत. उलट दरवाजा घट्टच बसतो. अशी दारे उघडायची झाल्यास एक पुढे व दुसरे मागे उघडावे लागते. मगच ते उघडली जातात.
पूर्वी खिडकीच्या कामासाठी साग, शिसम अशा लाकडांचा उपयोग करत असत. भिंतीचे बांधकाम करत असतानाच दरवाजे व खिडक्यांच्या चौकटी (फ्रेम) बसवितात. या चौकटी कोणत्याही बाजूनें ढकलल्या असतां निघूं नयेत म्हणून बांधकामांत थोडीशी खोबण करून मजबुतीसाठी दोन्ही बाजूने भिंतीत गुताव केलेला असतो. चौकटी भिंतीत घातल्यामुळे त्यानां माती, चुना यांचा संपर्क असल्यामुळे लाकूड सडण्याचा संभव असतो. म्हणून चौकट बांधकामात उभी करण्यापूर्वी त्यांच्या दबून जाणाऱ्या भागाला तापविलेले डांबर लावत असत. खिडक्यांच्या चौकटी (फ्रेम) ३” x ३” चा पेक्षा बारीक असू नयेत.
विलास भि. कोळी
९७६३०८४४९९
२० मे २०२१
No comments:
Post a Comment