Followers

Tuesday 25 May 2021

#श्री_नृसिंह_प्रकट_दिन




 #श्री_नृसिंह_प्रकट_दिन

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ! अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम !!
ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येईल तेंव्हा तेंव्हा विष्णू या पृथ्वीवर अवतार रुपात येऊन अधर्म करणाऱ्या चा नाश करतात..
भगवान विष्णूचे चौवथे अवतार म्हणजे श्री नृसिंह हे होय.विष्णू देवाचे चार पासून बरेच अवतार सांगितले आहेत त्यात सर्वमान्य असे दहा अवतार विष्णू मूर्तीवर व इतर शिल्पशास्त्रात पहावयास मिळतात.
दुष्ट अशा हिरण्यकशपु चा वध हि कथा सर्वांना माहीत असेलच हिरण्यकश्यपू च्या भावाचा वध विष्णू ने केला असल्याने तो राग मनात धरून विष्णू भक्तांचा छळ त्याने सुरु केला त्यात स्वतःचा मुलगा हा विष्णू भक्त ( इथे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पूर्वी एकाच घरातील व्यक्ती वेगवेगळे पंथ व धर्म अनुयायी बनू शकत ) आहे असे कळल्यावर त्याला यातना तो देऊ लागला व यातच त्याचा मृत्यू झाला.
जो वर हिरण्यकश्यपू ला मिळाला होता त्याला छेद देत देवाने अर्धे शरीर पुरुषाचे व मुख हे सिंहाचे घेतले त्यामुळे या अवताराला नृसिंह अवतार या नावाने ओळखले जाते.
मंदिरावर या युद्धाची व वधाची शिल्पे कोरलेली किंव्हा शिल्पित केलेली दिसून येतात अंबेजोगाई जवळील धर्मापुरी येथील मंदिरावर अत्यंत कोरीव वध शिल्प पाहायला मिळते. तर हम्पी ला भव्य असे योग पट्ट शिल्पातील उग्र मूर्ती आहे.
जेंव्हा आपण नृसिंह मुर्ती पाहतो त्यात आपल्याला त्या उभ्या युद्ध खेळताना, चौकटी मध्ये मांडीवर हिरण्यकश्यपू च्या दोन्ही हाताने पोटातील आतड्या बाहेर काढताना , ( याच कथेवरून सावरकरांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हे प्रभो शिवाजी राजा हे गीत रचले ) तसेच लक्ष्मीला मांडी वर घेऊन अभय मुद्रे मध्ये, तर काही ठिकाणी योग मुद्रेत नरसिंह शिल्प पाहायला मिळतात.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने पाहिला गेले तर एकूण मुख्य अशा चार ठिकाणी नृसिंह मुर्ती पहायला मिळतात.
त्यातील एक म्हणजे श्री तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात स्थापन केलेली मूर्ती दुसरी म्हणजे उमरगा येथील महादेव मंदिराच्या बाहेरील देवकोष्टकात योग मुद्रेतील नृसिंह मूर्ती पाहण्यासारखी आहे.
तिसरी मुर्ती म्हणजे तेर येथील नृसिंह मंदिरातील मुर्ती होय हि खूप प्राचीन अशी उग्र मुद्रेतील मुर्ती आहे. तेर पासून अर्धा मैलावर आग्नेय दिशेस विटांनी बांधलेले हे मंदिर असून त्यात कमानी, नक्षीकाम केलेले दिसून येते हे मंदिर यादवकालीन आहे. गाभाऱ्यात पूर्वाभिमुख हि विष्णूची उग्र मुद्रेतील मुर्ती सध्या खूप झिजलेल्या अवस्थेत आहे.
वाशी ( जि. उबाद ) जवळील इंदापूर येथे तांदळा रुपात श्री नृसिंह पुजले जातात.
श्री. तुळजाभवानी मंदिराच्या नैऋत्य भागात श्रीलक्ष्मी-नृसिंह मंदिर आहे. एकाच ठिकाणी येणाऱ्या भक्त भाविकांचा कुलाचार व्हावा या व पंथापंथातील संघर्ष संपुष्टात यावा या हेतूने भारतभर मुख्य चार मठ व इतर देवदेवतांची स्थापन आद्य शंकराचार्य यांनी केली त्यातीलच हे मंदिर होय.
श्रीलक्ष्मी नरसिंह देवाची मुर्ती सव्वा दोन फूट उंच व रुंदी दीड फूट आहे. स्वयंभू मुकुट, कानात कुंडले, गळ्यात कंठी आहे हातात व पायात तोडे दंडात बाजूबंद आहेत मूर्ती पाषाणातील असून राखाडी, काळी, लाल रंगात आहे.मूर्तीमागे वर्तुळाकार प्रभावळ आहे ही मूर्ती अष्टभुजा आहे, मांडी वर हिरण्यकश्यपू दैत्याचे दोन्ही हातानी पोट फाडलेले आहे , हातात शंख , चक्र,गदा, आहे, उजव्या बाजूस वाहन गरुड आहे. मंदिरात नृसिंह शाळीग्राम, सुदर्शन शाळीग्राम असे अनेक शाळीग्राम आहेत या मूर्तीचे रूप सकाळी, दुपारी, व सायंकाळी वेगवेगळे दिसते. वैशाख महिन्यात देवाची जयंती साजरी केली जाते यावेळी प्रसाद म्हणून डाळ व आंब्याचे पन्हे दिले जाते.
मूर्तीस रोज पवमान पंचसूक्त, पुरुषसूक्त म्हणून अभिषेक केला जातो, चंदन लेप लावून मंगलारती केली जाते. मूर्तीशास्त्रानुसार आपल्याला सौम्य नरसिंह, उग्र नरसिंह, लक्ष्मी सोबत असणारा लक्ष्मी नृसिंह, खांबातून प्रकट होणारा स्थौन नरसिंह, गरुडावर आरूढ होणारा यानक नरसिंह इ. मुर्ती रुपात आपल्याला आढळून येतात.
श्री नृसिंह प्रकट दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्या...
© जयराज खोचरे
अध्यक्ष
इतिहास व पुरातत्व परिषद उस्मानाबाद जिल्हा.

No comments:

Post a Comment