Followers

Friday, 7 May 2021

#VidarbhaDarshan - प्राचीन शिव मंदिर, जुगाद, यवतमाळ
























 #VidarbhaDarshan - प्राचीन शिव मंदिर, जुगाद, यवतमाळ

विदर्भात ठिकठिकाणी प्राचीन मंदिरं आढळतात. असं एखादंही गाव नसेल की, जिथं एखादी प्राचीन प्रतिमा नाही. मंदिर भलेही जिर्णोद्धार झालेलं असो. असा हा प्राचीन वारसा कोणत्याही ओळखीशिवाय विखुरला असतो सर्वत्रच. विदर्भ तर त्याला अपवाद नाहीच, कारण अनादी काळापासून विदर्भानं भोगलंय.. भोगलंय म्हणण्यापेक्षा अनुभवलंय अनेक राजवंशांचं राज्य. या प्रत्येक राजवंशानं विदर्भ शिल्पसमृद्ध केलाय. वैभवशाली मंदिरं तर उभारलीच, पण अनेक दुर्मिळ प्रतिमासुद्धा घडवल्या. मंदिरांची भव्यता अशी की, भव्य हा शब्द ती भव्यता व्यक्त करायला अपुरा पडावा.
विदर्भात ज्या राजवंशांनी ही समृद्धी उभी केली त्यातला एक प्रमुख राजवंश म्हणजे यादव राजवंश. यादवांचं राज्य अत्यंत वैभवी आणि यादव राजांनी हे वैभव नक्षीवंत दगडांच्या स्वरूपात काळाच्या माथ्यावर अंकित करून ठेवलंय. सार्वभौम सर्वभक्षी काळानं भलेही गिळंकृत केला असेल यादव राजवंश, त्या राजवंशाचं राज्यही, पण त्यांनी उभे केलेले हे दगड मात्र अजूनही त्यांचं नाव घेतात आणि घ्यायला लावतात. असं देखणं शिल्प आणि अशी देखणी नक्षी जी काळानं प्रयत्न करूनही याला नष्ट करता आली नाही किंवा काळच मोहवला असेल, अशा या शिल्पांसमोर म्हणूनच क्षतीग्रस्त होऊनही मूळ वैभवाला कुठलाही धक्का न लागता ही शिल्प उभी आहेत अजूनही. आता मात्र ती थकलीत, आता ती काळाला आव्हान देत नाहीत तर त्याची करुणा भाकतायत.
विदर्भात चंद्रपूर-घुग्गुस मार्गावर एक गाव लहान पांढरकवडा नावाचं. त्या गावातून आत गेलं की, वढ-जुगाद नावाचं एक गाव. साधारणपणे या गावाला ‘वढा’ असं म्हणतात, पण गावं मात्र दोन. एक वढा आणि दुसरं जुगाद. दोन्ही जोडगावं, पण मध्ये प्रचंड नदी. नदी काय दोन महाकाय नद्यांचा संगम. एकीकडे वढा आणि संगमापलीकडे जुगाद. विदर्भातला हा महत्त्वाचा आणि अतिप्रचंड संगम. एक नदी वर्धा म्हणजे वरदा आणि दुसरी पैनगंगा. या दोन नद्यांचा संगम. नजर पोहचेल तिथवर केवळ पाणीच. विदर्भाला जलसमृद्ध करणाऱ्या या लोकमाता. वढय़ाला तर सहजच पोहोचता येतं, पण नद्यांना पाणी असेल तर मात्र जुगादला पोहोचायला खूप मोठा वळसा घ्यावा लागतो.
वढय़ातही प्राचीन मंदिरांचे अवशेष दिसतात, पण या दोन्ही गावात श्रीमंत मात्र जुगाद. या संगमावर यादवराजांनी अथवा त्यांच्या मांडलिकांनी मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. हे संगमस्थान पवित्र. पवित्र स्नानाचं महत्त्व तेवढचं विशेष. या संगमस्थानी स्नान करून मंदिराच्या अधिष्ठानाच्या छायेत दानधर्म करावा, अशी रीत.
आज जुगादमध्ये अत्यंत नक्षीवंत असं प्रचंड मोठं शिवमंदिर उभं आहे. जे पाहता क्षणीच हेमाडपंथी मंदिर स्थापत्यशैलीची साक्ष देतं, पण आता त्यालाही जे हजारो वर्षांपासून उभं आहे मंदिर त्यालाही चार दोन तिरप्या ‘सिमेंट पिलर्स’चा आधार दिला गेला आहे आणि पाहता क्षणीच तो आधार त्या मंदिराच्या मजबुतीपुढे केविलवाणा वाटतो. मंदिरानं अजूनही तो आधार आपलासा केला नाही किंवा त्यावर भरवसाही ठेवला नाही. अजून तरी मंदिराला त्या आधाराची त्या ‘सिमेंट’च्या कुबडय़ांची गरज पडलेली नाहीय. हे मंदिर महत्त्वाचं यासाठी की, हे प्रचंड तर आहेच, शिल्पवैभवी तर आहेच, पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट या मंदिरानं जपून ठेवलीय ती म्हणजे यादवराजाचा एक अपूर्व शिलालेख.. जो ऊन्ह-पाऊस यांच्या या हजारो वर्षांच्या माऱ्यात पूर्णत: झिजून गेलाय आणि जो वाचणं किंवा जेवढी अक्षरं शिल्लक आहेत त्यावरून त्याचा अन्वय लावणं सर्वथा कठीणच, पण हा एकमेव पुरावा आणि महत्त्व या मंदिराचं. आणि विशेष म्हणजे, झिजून जरी गेला असेल शिलालेख तरी प्राणपणानं जपलाय या मंदिरानं. हे या मंदिराचं विशेष.
जुगादमध्ये हे मंदिर आज आहे, पण विषय आहे तो आज नसलेल्या मंदिराचा. संगम ओलांडून जसं आपण जुगादमध्ये पोहोचतो तसं आधी उल्लेख केलेल्या मंदिरापर्यंत जाण्याआधीच एका अत्यंत प्राचीन मंदिराचे अवशेष दिसतात. पूर्णत: उद्ध्वस्त फक्त पीठ म्हणजे जोता आणि गर्भगृह-गाभाऱ्याची जागा जी आसपास पडलेल्या दगडांनी ओळखता येते. हे पडलेले दगडही एवढे नक्षीवंत की, कोणा कलावंताला काय प्रेरणा झाली असेल हे घडवण्याची आणि घडवूनही आपल्या नावाचा साधा उल्लेखही न ठेवता जो हा कलावंत नामानिराळा झाला असेल त्याची त्याच्या कलेवरची ही निष्ठाच आहे की, जिला काळही हरवू शकला नाही आजपर्यंत. मंदिर म्हणजे फक्त एक जोता तोही एका बाजूचा आणि गर्भगृहाचे पूर्ण पडलेले दगड. एकही दगड उभा नाही आणि जेवढा अवकाश-आकार असेल मंदिराचा तेवढय़ात वाढलेली झुडपं, पण अवशेषच सांगतात की, केवढं मोठं आणि वैभवी-कलापूर्ण शिल्पांनी नटलेलं असेल हे मंदिर. दुसरं म्हणजे, आधी ज्याचा उल्लेख आलाय ते मंदिर या मंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर. शिल्पवैभव आणि बांधणीची पद्धत पाहिली तर हे मंदिर म्हणजे हे उद्ध्वस्त झालेलं मंदिर आणि आज लौकिकार्थानं नसलेलं मंदिर हे अधिक प्राचीन ठरतं.
संगमाचं पवित्र स्थान आणि त्या ठिकाणी त्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या राजाला मंदिरं बांधावी, असं वाटणं स्वाभाविकच. जे शाबूत मंदिर आज या ठिकाणी आहे त्यावरून हे सहज लक्षात येतं. यादव राजांचा आणि त्यांच्या अथवा त्यांच्या मांडलिकांचा विदर्भावरच्या राज्याचा काळ लक्षात घेतला तर तो साधारणपणे इ.स. १००० ते इ.स. १४०० असा गृहित धरता येतो. यादव काळात जी मंदिरं प्रत्यक्ष यादव राजांनी, त्यांच्या मांडलिकांनी-मंत्रिगणांनी बांधली ती ‘हेमाडपंथी’ या शैलीची मंदिरं म्हणवली जातात. ‘हेमाद्री’ अथवा हेमाडपंत हा यादव राजांकडे ‘श्रीकरणाधिप’ अर्थात मुख्य सचिव होता. यानंच मंदिर बांधणीची म्हणजे दगडावर दगड ठेवून कुठल्याही जोडाशिवाय बांधकाम करण्याची पद्धत अंमलात आणली, असं समजलं जातं. दगडावर दगड ठेवणं हे तेवढं सोपं मात्र नाहीच, कारण तिथं विचार करावा लागतो सर्वात खालच्या दगडाचा जो सहन करणार आहे सर्व वजन वरच्या सर्व दगडांचे. त्यामुळे ही पद्धत अत्यंत शास्त्रशुद्ध आहे आणि त्याचा पुरावा म्हणजे आज विदर्भात असलेली शेकडो मंदिरं. जुगादमध्ये हे जे मंदिर आहे त्याचा जोता आणि वरचे तीन थर शिल्लक आहेत. सर्वात खालच्या थरानंतर वरचा पहिला थर आहे तो म्हणजे गजधर. त्या वरच्या थरावर नक्षी आहे. प्रत्येक दगडावर ती सिंहाकृतींची. त्यावर दगडांचा आणखी एक थर. नंतर.. नंतर मात्र काहीच नाही. एका नक्षीवंत प्रचंड मोठय़ा खूप शिल्पवैभवानं समृद्ध असलेल्या पण, आता एवढा एकाच बाजूचा जोता शिल्लक असलेल्या एका नसलेल्या मंदिराची ही कहाणी.
(लेख - लोकसत्ता)
(फोटो - अनिल दिक्षीत)

No comments:

Post a Comment