*पालघर जिल्ह्यातील किल्ले अशेरीगड*
सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या भागात आपण पाहूया उत्तर कोकणातील एक महत्वाचा डोंगरी किल्ला म्हणजेच पालघर जिल्ह्याची शान असणारा किल्ले अशेरी.
उंची - ५१२ मी. समुद्रसपाटीपासून,
मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाताना मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून डाव्याबाजूला अशेरी किल्ला आहे. *महामार्गावर मनोर ह्या महत्वाच्या गावापुढेच साधारण 4 ते 5 किमी अंतरावर डावीकडे खोडकोना फाटा आहे. (हा फाटा महामार्गावर चटकन सापडत नाही), महामार्गावर पालघर वनविभागाचा लोखंडी हिरव्या रंगाचा महितीफलक शोधत जावे म्हणजे त्यालगतचा छोटासा रस्ता पटकन सापडतो.* खोडकोना फाट्यावरून गाव सुमारे एक कि.मी. आत आहे. ओढ्यावरचा पुल ओलांडुन आम्ही गावात पोहचलो. आमची चारचाकी गावात ठेवून अकरा नंबरची बस पकडली गावकऱ्यांनी दाखवलेल्या दिशेला वर खिंडीतुन वर जाण्याची वाट होती. बरेच अंतर चालून व चढाई करून आमचा ग्रुप वर खिंडीत पोहोचला. वाटेवरच्या दाट झाडीमुळे मस्त सावली होती त्यामुळे ही चढाची वाट थोडी सोपी झाली होती, येथेच पाठच्या बाजूला असणाऱ्या बुर्हाणपुर गावातून (मुघलांचे मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर वेगळे) येणारी पाऊलवाट वर येऊन मिळ्ते. दोन डोंगरांच्यामध्ये खिंडीतअसल्याने येथे मस्त वारा वहात होता थोडीफार विश्रांती घेऊन आम्ही पुर्वेकडची वाट पकडून अशेरीच्या माथ्याकडे निघालो. छोटासा तीव्र चढ चढून वर पोहोचल्यावर आधी एक लाकडी खांब व त्यावर कोरलेले वाघाचे शिल्प दिसले, हे शिल्प म्हणजे येथल्या स्थानिक आदिवासी समाजाचा पवित्र वाघोबा देव आहे. प्राचीन काळाचा वारसा सांगत हे अनादी कालचे अनार्य दैवत डोंगर उतारावर ऐतिहासिक काळापासून असावे. येथून पुढे खडकात कोरून काढलेल्या कातळ कोरीव पायर्या होत्या.
कातळकडा डावीकडे ठेऊन काळजीपूर्वक चढाई करत एका उंच गोल डोंगर कड्याला वळसा घातल्यानंतर आम्ही दोन अतिप्रचंड खडकांच्या मध्ये असणाऱ्या एका उध्वस्त तुटक्या कड्याजवळ पोहोचलो तेथेच थोड्या सपाटीवरून दरीतील सुंदर सदाहरित जंगलाचे व त्यातून जाणाऱ्या अहमदाबाद महामार्गाचे सुंदर चित्र दिसत होते. इथली चढायची वाट उध्वस्त झाल्याने पुर्वी केवळ अनुभवी गिर्यारोहकच वर जाऊ शकत.
मात्र आता हि लोखंडी शिडी बसविल्याने ही वाट अगदी सोपी झालीआहे. शिडी संपल्यावर अजून थोड्या दगडी पायऱ्या चढल्यावर कातळ कोरीव मार्गाने आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. समोरच एका भल्यामोठ्या दगडी चिऱ्यावर पोर्तुगीज राजचिन्ह कोरून काढलेलं दिसले. कोणेएकेकाळी येथल्या महाद्वारावर ह्याची स्थापना केली गेली असावी. कालौघात दरवाजा मोडला चौकट उध्वस्त झाली पण हे फिरंगी राजमुकुटाचे चिन्ह तेव्हडे गतवैभवाची आठवण देत येथे आजही पहावयास मिळते.
भोळे भाबडे आदिवासी याचीहि पुजा करतात. येथून आपला किल्ल्यात प्रवेश होतो.
अशेरीगड चा किल्ला प्राचीन काळापासून तेव्हाच्या सत्ताधीशांनी ह्याचे भुराजकीय महत्व ओळखून विकसित केला होता.उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व असताना,भोज राजा द्वितीय ह्याने दुर्ग बांधलेला आहे असे बऱ्याच इतिहास कारांचे मत आहे कदाचित हा त्याहूनही प्राचीन असावा. ह्या किल्ल्याचे वय किमान 800 वर्षेतरी नक्कीच असावे ह्यावर सर्व इतिहासकारांचे एकमत आहे.
*ह्याचा प्रचिनत्वाचा पुरावा म्हणजे चढाईच्या मार्गात असणाऱ्या कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या व राजमुकुटाचे फिरंगी राजचिन्ह असणाऱ्या दगडाच्या अगदी बाजूला थोड्याश्याच वर असणाऱ्या दगडी पाण्याच्या टाक्यातील प्राचीन ब्राम्ही लिपीमधील लेख. ही दुर्ग वैशिष्ट्य केवळ प्रचिन सातवाहन व राष्ट्रकूट कालीन किल्ल्यात आढळून येतात. ब्राम्ही भाषेतील लेखामुळे ह्याचे प्रचिनत्व नक्कीच सिद्ध होते. पुढे चौदाव्या शतकात माहिमच्या बिंब राजाने अशेरीगड डोंगरकोळी आदिवासी लोकापासून जिंकून घेतला.*
अशेरीभोवती आजही सागवानाच्या झाडांचे आफाट जंगल आहे. हि सागवानाची झाडे पुर्वी इमारती व जहाज बांधणी साठी उपयोगी असल्याने इथली झाडे कापून त्याचा व्यापार डहाणू व तारापूर बंदरांशी चालत असे या व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी अशेरी गडाची निर्मीति झाली असावी असा अंदाज बांधता येतो. आणि ह्या बंदरातून जव्हार मार्गे नाशिक कडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावरचा एक पहारेकरी म्हणून देखील ह्या किल्ल्याचे अस्तित्व असावे असे वाटते.
*Bombay presidency Thane District Gazetteer* मधील नोंदीनुसार युरोपातून आलेल्या पोर्तुगीजांनी गोव्यात आपले स्थान भक्कम करून उत्तरेतील वसई पण 1534 साली ताब्यात घेतली. 1540 साली सायवान, फिरंगीपाडा, कांबे हा भाग कब्जात आणला, 1556 साली मनोर व अशेरीगड चा विस्तीर्ण भाग देखील ह्या फिरणग्यांनी स्वतःच्या नियंत्रणात आणला. तेव्हा ह्या आजच्या पालघर जिल्ह्यात असणाऱ्या ह्या सर्व भागाची सत्ता गुजरातच्या सुलतानांच्या कडे होती पण त्यांचे व मोगलांचे युद्ध सुरू असल्याचा फायदा उचलत पोर्तुगीजांनी ह्या भागात हातपाय पसरले.
गुजरातच्या सुलतानांना त्यांच्या सुभेदारांना तत्कालीन नवे तंत्रज्ञान म्हणजेच तोफा बंदुका दारुगोळा पुरवून त्याबदल्यात व्यापाराचे हक्क व हा उत्तर कोकणचा किनारी प्रदेश फिरंगी व्यापत गेले. 1556 साली गुजरातच्या सुलतानाचा स्थानिक जहागीरदार खोजा अहमद कडून पोर्तुगीजांनी हा किल्ला चक्क विकत घेतल्याची नोंद पोर्तुगीज दप्तरात सापडते.
*1556 पासून पोर्तुगीजांच्या उत्तर फिरंगाणं प्रदेशाचा अशेरीगड हा एक परगणा झाला ह्या परगण्यात 38 गावे व 6 चर्च पॅरिश असल्याचे उल्लेख आढळतात.*
हा सगळा इतिहास आठवत आम्ही किल्ल्याच्या उध्वस्त अश्या दुसऱ्या दरवाजाच्या पायाचे केवळ तळखडे बघत आत प्रवेश केला. नुकताच पावसाळा सरल्याने खूप गवताच्या व वाढलेल्या झाडांच्या साम्राज्यातुन छोट्या पायवाटेने आम्ही किल्ल्यात शिरलो.
किल्ल्याच्या आतील उंच पठारावरून दूरपर्यंतचा प्रदेश दिसत होता.उत्तर फिरंगाणच्या (वसई प्रांताच्या) उत्तर पूर्वेला व पूर्व दिशेला असणाऱ्या रामनगरकर व जव्हारकर डोंगरकोळी संस्थान पासून त्याचबरोबर दक्षिणेकडे असणाऱ्या कल्याण भागातील अहमदनगर च्या निजामी सत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी व तिकडून होणारी संभवनीय आक्रमणे रोखण्यासाठी अशेरी हे एक मोक्याचे बळकट असे लष्करी ठाणे आहे हे हुशार पोर्तुगीजांनी झटकन ओळखले. ह्याचसाठी त्यांनी किल्ल्यावर तीन तोफांची नेमणूक केली किल्ल्याला नवी तटबंदी बांधवून घेतली.किल्यावर येणाऱ्या अनेक पायवाटा मोडून केवळ दोन वाटा ठेवून तिकडे एकापाठोपाठ एक अशी दोन महाद्वार बांधून पक्का बंदोबस्त केला. सोळाव्या शतकात शिवकाळापूर्वी गडावर सैनिक, स्त्री, पुरुष, मुले व कैदी असा सुमारे सातशे लोकांची वस्ती होती व ह्या सर्व लोकांसाठी घरे, वाडे , खुले चर्च आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
*पुढे 1634 च्या एका फिरंगी नोंदी नुसार गडावर पुढीलप्रमाणे शिबंदी च्या सरंजामाची व्यवस्था सापडते*
01 किल्लेदार (commander)
01 पाद्री
01 डॉक्टर
55 अधिकारी ( लष्करी, महसुली इतर खात्यांचे)
75 ख्रिश्चन धनुर्धारी देशी
कुलीन पोर्तुगीज द्वाररक्षक ( चार फिरंगी गोऱ्या कुटुंबाकडे ही जवाबदारी होती असा उल्लेख आहे)
डोंगरकोळी स्थानिक सैन्याची छोटी टोळी
01 फिरंगी पोलीस निरीक्षक व त्याचे छोटे पोलीस दल
02 फिरंगी धनुर्धारी
*ह्या खेरीज बाजारबूणगे लोकांत पुढील भरती असे*
01 दुभाषी
01 धोबी
06 वाजंत्री ( ताशे वाले)
03 वाजंत्री (किल्लेदाराच्या अधिकारात)
01 ट्रमपेट वाजवणारा (किल्लेदाराच्या अधिकारात)
01 छत्री धरणारा (किल्लेदाराच्या अधिकारात)
01 कारकून(किल्लेदाराच्या अधिकारात)
01 घोड्याचे नाल बसवणारा (किल्लेदाराच्या अधिकारात)
रानातील वाट वळत वळत थोड्या सपाटीवर आली तेथे काही घरांच्या पायाचे अवशेष गर्द रानात कसेबसे आपले अस्तिव टिकवून उभे होते. ते पाहून पुढे त्याच एकमेव पाउलवाटेचा मागोवा घेत एका गुहेजवळ येऊन पोहोचलो.
ह्या गुहेवर प्राचीन कलाकारांची कलाकुसर व नवीन काळात हल्लीच बसवलेल्या संगमरवरी फरश्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या तिकडे बसून पुढचा इतिहास डोळ्यासमोर सरकू लागला.
छत्रपती शिवरायांच्या काळात इ.स. 1657 मधे मराठ्यानी कल्याण भिवंडी घेतले. त्यावेळी महाराजांचे सरदार दादोजी व सखो क्रुष्ण लोहोकरे या दोघांनी ह्या भागात लुटालूट करून पोर्तुगीजाना शरण यायला भाग पाडले. परंतु तेव्हा त्यांची मुख्य लढाई कल्याण प्रांतातील आदिलशहाविरुध्द होती.
पोर्तुगीज दप्तरात "त्याने ( शिवाजी महाराजानी ) आमच्या उत्तर फिरंगाण प्रांतातील मुलुखाला उपद्रव दिला" इतकाच उल्लेख व्हाईसरायने पोर्तुगीज राजाला 1658 सालात पाठविलेल्या पत्रात केला आहे. अशेरीगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात येऊ शकला नाही. पुढे छत्रपती संभाजी महाराजानी 1683 मध्ये
पोर्तुगीजाविरुध्द मोहिम उघडुन अशेरी ताब्यात घेतला,पण लगेच पोर्तुगीजांनी परत तो मिळवीला. मराठेसुद्धा तेव्हढेच चिवटपणे लढत होते, त्यांनी 1684 मध्ये परत आक्रमण करून अशेरी जिंकला, अर्थात ऑक्टोबर 1687मधे परत अशेरीवर पोर्तुगीज अंमल सुरु झाला. येथून पुढे किल्ल्यावर इ स 1737 पर्यंत जवळपास 50 वर्षे शांतता होती. आणजुर कर नाईकांच्या पाठपुराव्यामुळे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार चिमाजी अप्पा फिरंगी अत्याचारातून वसई प्रांत मुक्त करण्यासाठी मराठा फौजा घेऊन आक्रमण करतात. 26March,1737 रोजी चिमाजी अप्पा स्वतः ठाणे (सष्टीचा कोट) जिंकतात पुढे मराठा फौजेच्या छोट्या तुकड्या वांद्रे, वसावे, अर्नाळा, सोपारे, आगाशी जिंकण्यासाठी रवाना होतात. मांडवी कोट ,टकमक किल्ला, सायवान चे ठाणे, मनोर, तांदुळवाडी किल्ला हा सर्व प्रदेश मराठा फौजा पहिल्या धडकेत जिंकून घेतात. 1737 च्या ऑक्टोबर महिन्यात वैतरणा खाडीच्या उत्तरेकडील भागातील केळवे, माहीम, शिरगाव, तारापूर च्या किनारी भुईकोट किल्ल्याना मराठा फौजांचे वेढे पडतात. डोंगरी युद्धात बळजोर असणारे मराठे सगरकिनारी मोकळ्या मैदानात फिरंगी तोफा बंदुकासमोर थोडे हतबल ठरतात.बऱ्याच मोठ्या प्रदेशात मराठा फौजा विभागल्या गेल्याने व मराठ्यांकडे तोफा बंदुका दारूगोळ्याची भयानक कमतरता असल्याने ह्यावेळी मात्र फिरंगी वरचढ ठरवून फिरंगी सेनापती मार्शल ऑफ द फिल्ड पेद्रो डिमेलो ( मराठी उच्चार - पेद्रु दमेल) आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा बंदुकानी युक्त कवायती फौजेच्या तुकडीने आणि विपुल दारूगोळ्याच्या सहाय्याने मराठा वेढे उधळून लावतो. ह्याच दरम्यान मोहिमेच्या सुरवातीपासून मार्च 1737 पासून एक मराठा तुकडी अशेरीगडाची नाकेबंदी करून शह देयच्या प्रयत्नात असते. त्यांच्या संबंधीच्या काही नोंदी पेशवे दफ्टतरात सापडतात.
"समान सलसीन 3 जमादीलावल(19AUG1737) दफाते परगणे आशेर येथील कमविशी रा.पंताजी मोरेश्वर ह्यास दिधली"
ह्यावरून समजते की परगण्यातील सर्व गावे मराठा ताब्यात आल्याने करसंकलन अधिकारी मराठा सरकारातून नेमले गेले पण मुख्य किल्ला मात्र अजून ताब्यात आला नव्हता.
किल्ल्यावरील गुहेच्या बाहेरील अंगणात हा सर्व इतिहास मी माझ्या बरोबर आलेल्या ट्रेकर मित्रांना सांगितला. गुहेत देखील येथील स्थानिक आदिवासी देवता व इतर मूर्ती सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तसविर लावली होती.
ह्या छोट्याश्या गुहेची कोरीव सजावट करण्याचा प्राचीन प्रयत्न आजही गुहेच्या तोंडाशी असणाऱ्या अर्धवट खांबावर कीर्तीमुखांच्या स्वरूपात आपले अस्तिव राखून होता. लेण्याच्या समोरच पहिल्यापासून असणारी एक तोफ व हिल्लीच गडाच्या साफसफाई व ऐतिहासिक वास्तूची निगा राखताना तळ्यातील गाळ उपसतांना अजून दोन छोट्या तोफा मांडून ठेवल्या होत्या.
त्यापाहुन 1737 सालच्या फिरंगी मराठा युद्धाच्या नोंदी मी परत मित्रासमोर उलगडून सांगू लागलो.
मराठा फौजेतील हरी सदाशिव सुरणीस, पंताजी मोरेश्वर कमविसदार व जव्हारच्या संस्थांन तर्फे भगवंतराव असे तीन सरदार अशेरीगड मोहिमेसाठी मोर्चेबंद होते.
त्याच्या काही नोंदी पेशवे दप्तरातून मिळतात
*"अशेरीस राजश्री हरिपंत होते तेथे जव्हारकर यांजकडील भगवंतराऊ होते. त्यांस ते स्वामींचे सेवेमध्ये एकनिष्ठ आहेत. जव्हारकरांचा फीतवा (आहे) म्हणोन स्वामीपासी वर्तमान गेले यांजकरिता ते बहुत श्रमी जाहले त्यांचा शोध मनास आणीता राजश्री हरिपंत ह्यांनी त्यांचे एकनिष्ठतेचे वर्तमान सांगितले. मोर्चेही बिकट कड्याला लावले आहेत. तेथे पंताजी मोरेश्वराची भेट घेतली त्याचेही मोर्चे बरेसे कड्यास लागले आहे. अर्ध्या कोसवरून पाणी मोर्चेकरी पितात."*
(जव्हार संस्थानातुन गपचूप फिरंग्यांना मदत मिळते अशी अफवा लष्करात उठली होती ती खोटी आहे हे पत्रलेखक चिमाजी अप्पांना पुण्यात कळवत आहे)
पण असा वेढा जरी असला तरी अशेरीगडाचा विस्तार मोठा असल्याने व मराठा फौजेची संख्या खूप कमी असल्याने मोर्चे व चौक्या खुप दूर दूर होत्या व त्यात मराठा फौज ह्या प्रदेशात नवखी असल्याने फिरंगी फौजा तारापूर वरून जंगलातील रान वाटांनी गपचूप मराठा मोर्चे व चौक्या टाळून अशेरीवर रसद पोचवीत होत्या त्याचीही नोंद सापडते
*"आशिरकर दाणागल्याने समानपूर आहे,तारापुराच्या उपरालियाचा भरवसाही त्याला आहे.त्यामुळे अशेरकराने आजपावेतो धीर धरीला आहे.पोटाची बेगमी पोखती असता व तारापुरास शह बैसला नसता आशिरकर एकायेक तहास येतो ऐसें नाही पण तारापुरास देखील शह देयचा तो कसा?
मातबर सामानाखेरीज शह पावे यैसा जागा तारापूर नाही"*
आणि ह्या पत्रातील उल्लेखाप्रमाणेच मराठा फौजेची ही कमतरता हेरून *फिरंगी सेनापती मार्शल ऑफ द फिल्ड पेद्रो डिमेलो* ( *मराठी उच्चार-पेद्रु दमेल* ) आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा बंदुकानी युक्त कवायती फौजेच्या तुकडीने 26DEC 1737 रोजी शिरगाव किल्ल्याचा मराठा वेढा उधळून लावतो व अशेरी भागात येतो त्याचबरोबर 1600 फिरंगी सैन्याची तुकडी असते ही बातमी मल्हार हरी हा मराठा सरदार मांडवी- वज्रेश्वरी च्या ठाणेदारास कळवून सैन्याची मदत मागतो पण मंडवीचे ठाण्यातच पुरेशी फौज नसल्याने ठाणेदार वासुदेव जोशी 14JAN 1738 रोजी अंबाजी पुरंदरे ह्या तेथून खानदेश च्या मोहिमेवर रवाना होणाऱ्या सरदाराला मदतीस बोलावतो.
त्या पत्रातील नोंदी देखील खूप मार्मिक आहेत.
*"तारापुराहून गनीम तीन कोस पुढे आला आहे, माहीम शिरगावच्या प्रसंगाने हावभरू होऊन जेथे त्येथे उपराळा करतो.त्यास बरा नतीजा द्यावा लागेल.त्याचे उपमर्दास राजश्री मल्हार हरी व राजश्री विठ्ठल विश्वनाथ त्येथे आहेत ते नतीजा देतील.परंतु येक वेळ गनीमांस बरीशी जरब द्यावी लागते हा अर्थ चित्तास आणून तुम्हास लिहिले आहे.तरी पत्रदर्शनी तुम्ही अवघे राऊत सडे घेऊन अशेरीखाली राजश्री मल्हार हरी व राजश्री विठ्ठल विश्वनाथ ह्यांस सामील होऊन तंबी करोन कापून काढणे. गनीम खुष्कीस आला आहे असा कधी यावा नाही. ह्याप्रसंगी गनीम कापून काढायचा माना आहे, हे जाणोन तुम्हास लिहिले..."*
पण पुरंदऱ्यांची फौज पोहोचण्या आधीच फिरंगी फौजेचे आक्रमण अशेरीच्या पायथ्याशी असलेल्या मराठा फौजेवर झाले 15JAN1738 रोजी फिरंगी फौजेने सुट्ट्या मराठी चौक्यांवर आणि जंगलात विखुरलेल्या मोर्चावर एकवटून मारा केला व मराठा वेढा उधळून लावला. अशेरीची ही पहिली लढाई मराठे हरले पण वसईचे युद्ध मात्र सुरूच होते एक वर्षाने खुद्द चिमाजी अप्पा भलीमोठी मराठा फौज घेऊन तारापूर भागावर चालून आले. मराठा फौजा 8JAN1739 रोजी माहीम घेतात 10JAN1739 रोजी केळवे जिंकतात आणि 24JAN1739 तारापूरचा किल्ला ताब्यात घेतात. तारापूर जिंकल्यावर लगेच हरिपंत 4000 पायदळ व 500 घोडदळ घेऊन अशेरीवर परत आक्रमण करतो.ह्यावेळी मात्र अशेरीवरील फिरंगी फौज फारसा विरोध करत नाहीत मराठा विजयाच्या खबरा त्यांना मिळाल्याच असतात. वसई मुख्यालयातून मदत येईल ही आशा पण मावळली असते त्यामुळे हरिपंतांशी बोलणी/ वाटाघाटी करोन अवघ्या तीन दिवसात अशेरी किल्ला मराठा फौजेसमोर शरणागती पत्करतो.
3/4 FEB 1739 रोजी अशेरीगडावर भगवे निशाण चढते.
कदाचित ह्या तीन तोफा त्या युद्धाच्या साक्षीदार असतील हे जाणवून आम्हा मित्रांच्या अंगावर काटाच येतो.
लेणे बघून थोडे आग्नेय कोपऱ्याकडे आम्ही गेलो तेथे एक घळ दिसते. ह्या घळीतून आपण थेट खोडकोना गावात किंवा हायवेवर उतरू शकतो. पण हा मार्ग खूपच धोकादायक असल्याने हे धाडस न केलेलेचांगले. येथल्या उंच कड्यावरून खाली दिमाखदार वळणे घेत गेलेल्या चौपदरी महामार्गावरची गाड्यांची वर्द्ळ दुरून खुपच छान दिसते.सर्वोच्च माथ्याकडे गेल्यावर काही घराचे चौथरे दिसले जे गवतात पार दडून गेले होते. येथे थोडावेळ थांबून मी किल्ल्याच्या इतिहासातल्या शेवटच्या प्रकरणाकडे आलो, 1739 पासून ते 1817 पर्यंत जवळपास 75 वर्षे हा किल्ला मराठा स्वराज्याचा भाग होता.पुढे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजी फौजा अशेरीगड सहज ताब्यात घेतात व हा किल्ला कायमचा इतिहासाच्या पानात जमा होतो.1818 साली कॅप्टन डिकन्सन च्या नेतृत्वाखाली किल्याचा कड्याजवळील 40 फुटाचा दगडी पायर्यांचा मार्ग सुरुंग लावून उध्वस्त केला जातो व पुन्हा हा किल्ला परत वसू शकणार नाही ह्याची खात्री करत इंग्रजी सत्तेचे पाश ह्या प्रदेशात आवळले जातात.
अश्या ह्या सुंदर अशेरीच्या माथ्यावर दोन तलाव देखील आहेत. पण ह्यातील पाणी वापर नसल्याने पिण्यायोग्य राहिले नाही.अशेरीगडावरून सर्वत्र हिरवागार आणि विस्तृतअसा परिसर दिसतो. उत्तरेला महालक्ष्मी सुळका व सेगवाकिल्ला, ईशान्येला गंभीरगड व सूर्या नदी, पश्चिमेला पिंजाळ नदीचे पात्र, आग्नेयेला कोहोज किल्ला,दक्षिणेला टकमक किल्ला व वैतरणा नदी तर नैक्रुत्येला काळदुर्ग दिसतो.अशारितीने पूर्ण किल्ला बघून परतीच्या वेळी किल्ल्यावरील टाक्यांमध्ये असणाऱ्या मधुर पाण्याचा आस्वाद घेऊन आम्ही खोडकोना गावात उतरलो. मागे वळुन बघितल्यावर मावळतीच्या किरणात न्हाउन निघणारा अशेरी आम्हाला निरोप देत होता.
(कृपया सदर माहिती सहयाद्री नेचर ट्रेल्स व लेखक/ छायाचित्रकाराच्या नावानिशी शेयर करावी ही विनंती)
लेखाचे हक्क सह्याद्री नेचर ट्रेल्स कडे सुरक्षित
माहिती संकलन व लेखन - तेजस खांडाळेकर
छायाचित्रे - अभाषेक साळगावकर