Followers
Friday, 10 July 2020
||किल्ले श्री आसावा (आसवगड) ||
||किल्ले श्री आसावा (आसवगड) ||
किल्ल्याची ऊंची : 2400 m
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर
श्रेणी : मध्यम
ठाणे जिल्ह्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. ठाण्यातील पूरातन किल्ला चढण्यास सोपा असून गर्द रानातून जाणार्या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो.
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची तटबंदी दगड एकमेकांवर रचून बनवलेली आहे. गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. त्यापैकी मोठ्या टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्या बनवलेल्या आहेत. कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.
हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्याही पहायला मिळतात.
प्रवेशव्दार पाहून किल्ल्यात शिरल्यावर समोरच एक भिंत दिसते, ती एका बांधीव टाक्याचीच भिंत आहे. हे टाकं लहान असून त्याची रचना मोठया टाक्याप्रमाणेच एका बाजूला कातळ व तीन बाजूंनी दगडी भिंत अशी केलेली आढळते. या टाक्याच्या एका बाजूला असलेल्या कातळात पन्हाळी (चर) खोदलेला आहे. या चरातून येणारे पाणी टाक्याला लागून बांधलेल्या छोट्या हौदात पडेल आणि तो हौद भरल्यावर ते पाणी टाक्यात पडेल अशी योजना केलेली आहे. या रचनेमुळे गाळ हौदात जमा होऊन स्वच्छ पाणीच टाक्यात पडेल. या टाक्या जवळील कातळात काही पायर्या कोरलेल्या आहेत.
याशिवाय किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली गुहा व टाकं आहे. ते पहाण्यासाठी मोठ्या टाक्या जवळून खाली उतरून किल्ल्याच्या दक्षिण टोकाला वळसा घालून पूर्वेकडे (बारीपाडा गावाच्या दिशेला) जावे लागते. गुहा पाहील्यावर आपली गडफेरी संपते. गुहे जवळून खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. पण ती फारशी वापरात नसल्याने वाटाड्या बरोबर असेल तरच या वाटेने उतरावे.
गडावरून दक्षिणेला पालघरचा देवकोप तलाव दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
रेल्वेने :-
बोईसर हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे स्थानक आहे. आसावा किल्ला पहाण्यासाठी बोईसर हे जवळचे स्थानक आहे. मुंबई सेंट्रलहून सुटणार्या काही पॅसेंजर गाड्या बोईसरला थांबतात. तसेच विरार - डहाणू या दर तासाला सुटणार्या गाड्या बोईसरला थांबतात. डोंबिवलीहून सकाळी ५.३३ सुटणारी डोंबिवली- डहाणू गाडी मध्य रेल्वेवरील सर्वांसाठी सोईची आहे. आसावा किल्ला बोईसर पूर्वेला आहे, पण किल्ल्यावर जाण्यासाठी बसेस ( ठाणे , कल्याण मार्गे जाणार्या सर्व बसेस वारंगडे गावात थांबतात) व टमटम (१० आसनी रिक्षा नवापूर फाट्यावर मिळतात) पश्चिमेला मिळतात. बोईसर पासून किल्ल्याच्या पायथ्याचे वारंगडे गाव ८ किमीवर आहे.
रस्त्याने :-
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर मुंबई पासून ९२ किमीवर बोईसरला जाणारा चिल्हार फाटा आहे. या फाट्यावरून बोईसरला जाताना १० किमीवर वारंगडे हे गाव आहे.
वारंगडे गावात विराज फॅक्टरी आहे. वारंगडे गावातून विराज फॅक्टरीकडे जातांना फॅक्टरीच्या अगोदर उजव्याबाजूस (बोईसरहून चिल्हार फाट्याकडे जातांना) बारीपाडा गावाकडे जाणारा रस्ता जातो. (या रस्त्याच्या सुरुवातीला एक मोबाईलचा टॉवर आहे). या फॅक्टरीच्या कंम्पॉऊंडला लागून जाणारा रस्ता ८५० मीटरवरील किल्ल्याच्या पायथ्याच्या बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होण्यापूर्वीच आंगणवाडीची बैठी इमारत डाव्या बाजूला दिसते. या इमारतीच्या बरोबर समोर (म्हणजेच वारंगडे - बारीपाडा रस्त्याच्या उजव्याबाजूस) एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. पावसाळ्यात एक छोटा ओहळ ओलांडून जावे लागते. या कच्च्या रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर डोंगर व रस्ता यांच्या मधून आडवा जाणारा नाला लागतो. या नाल्यावर ३ पूल आहेत. येथून गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत.
१) पहिला पूल पार करून सरळ चालत गेल्यास आपण आसावा किल्ला व त्याला लागून असलेला डोंगर या मधील खिंडीतून गडावर जातो. पुढे ही वाट मुख्य वाटेला मिळते. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते. वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. या वाटेने साधारणत: पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.
२) पहिला पूल पार करून डाव्या बाजूस चालत गेल्यास आपण आसावा किल्ल्याच्या डोंगरजवळ पोहोचतो. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते व किल्ल्याखाली असलेल्या गुहे जवळून गडावर जाते. ही वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. पावसाळ्यात ही वाट टाळावी. या वाटेने साधारणत: पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.
३) पहिल्या पूलापाशी आल्यावर तो पूल न ओलांडता उजव्या बाजूचा कच्चा रस्ता पकडावा. थोड्या अंतरावर दुसरा पूल लागतो. त्यापुढे तिसरा पूल आहे. हा तिसरा पूल पार केल्यावर समोरच्या टेकडीवर जाणारी पायवाट दिसते. हि किल्ल्यावर जाणारी राजवाट आहे. किल्ल्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला वळसा घालून ही वाट हळूहळू चढत किल्ल्याच्या डोंगरावर जाते. हि वाट दाट झाडीतून जात असल्याने थकवा जाणवत नाही.किल्ल्याच्या डोंगरावर आल्यावर मात्र वाट खड्या चढणीची आहे. या वाटेने साधारण १ ते १.५ तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. हि वाट मळलेली व रूंद असल्यामुळे या वाटेने गडावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
पाण्याची सोय :
फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १.३० (दिड) तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :जून ते मार्च
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment