Followers
Friday, 10 July 2020
| किल्ले श्री टकमक ||
| किल्ले श्री टकमक ||
टकमक गड (Takmak)
किल्ल्याची ऊंची : 2000 फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : ठाणे
श्रेणी : मध्यम
ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात, सकवार गावाच्या मागे टकमक किल्ला आपल्या अंगाखांद्यावर पुरातन अवशेष बाळगत आजही उभा आहे. गडाचा डोंगर नैसर्गिकरीत्या मुख्य डोंगररांगेपासून वेगळा झालेला आहे, तसेच गडाभोवती असलेल्या दाट जंगलाने त्याच्या दुर्गमतेत भरच टाकलेली आहे. अशा दुर्गम स्थानी १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी करण्यात आली होती. माहिम (महकावती) या राजधानी पासून घाटावर जाणार्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी , त्याचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
गर्द झाडीने घेरलेला हा टकमक किल्ला आजही अनेक गुपिते आपल्या उरात बाळगुन आहे. इतिहासाच्या कागदपत्रात उल्लेख असलेले पूर्वेला असलेले प्रवेशव्दार, प्रवेशव्दारा जवळील भूयार, पायथ्यापासून व किल्ल्यावरून प्रवेशव्दारापाशी येणारा मार्ग शोधण्याचे (खुला करण्याचे) आव्हान ट्रेकर्स समोर आहे.
२००७ पासून सातत्याने प्रयन्त करून किल्ले वसई मोहिमेच्या श्रीदत्त राऊत यांनी किल्ल्यावरचे अवशेष शोधून त्यातील एक पाण्याचे टाके स्वच्छ करून पिण्यायोग्य केलेले आहे. किल्ल्यावर एकूण १३ टाकी असून इतर गाढले गेलेले अवशेष शोधून काढण्याचे काम आपल्या सर्वांपुढे आहे.
सकवार गावातून गडावर जाण्याचा मार्ग दाखवणारे बाण जागोजागी ऑईलपेंटने रंगवलेले आहेत. त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त ट्रेकर्सनी टकमक गडाला भेट द्यावी.
इतिहास :
बिंबदेव राजाचा पुत्र, राजा भीमदेवाने १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी केली. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला. छ. शिवाजी महाराजांनी कोहज- अशेरी या गडांबरोबर हा गड ही जिंकला असावा. शिवाजी महाराजां नंतर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला.
चिमाजी आप्पांनी वसईची मोहिम काढल्यावर टकमक गडाला महत्व आले. मराठ्यांनी १७३२ मध्ये टकमक गड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. परंतु मराठे आणि पोर्तुगिज यांच्यात झालेल्या तहाप्रमाणे हा गड परत पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला.
८ एप्रिल १७३७ रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. टकमक गडाच्या बेगमीसाठी पेशव्यांनी २५ गावे नेमुन दिली.
वसई मोहिमे नंतर किल्ल्याचे महत्व कमी होत गेले. १८ व्या शतकात इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला. त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावरील टाकी आणि जाण्याचे मार्ग यांची नासधूस करून किल्ला पुन्हा वसणार नाही याची काळजी घेतली.
पहाण्याची ठिकाणे :
सकवार गावातून आपल्याला टकमक गडाचे दक्षिण टोक (नाक), त्याच्या पुढे उजव्या बाजूस "घोडा किंवा खुट्टा" नावाने ओळखला जाणारा छोटा सुळका(पिनॅकल) व त्यापुढे पसरलेले पठार व डोंगराची धार दिसते. डोंगराच्या धारेवरून आपण पठारावर पोहोचतो. पुढे घोड्याला वळसा घालून पश्चिमेकडील तटबंदी वरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो. घोड्याच्या पुढे कातळात खोदलेल्या पायर्या पाहायला मिळतात.
टकमक गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी वरून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूची वाट गडाच्या दक्षिण टोकावर जाते. हेच टोक पायथ्याच्या सकवार गावातून आपल्याला दिसत असते. या टोकावरून आजूबाजूचा विस्तिर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. पूर्वीच्या काळी येथे टेहळणीची चौकी असावी. किल्ल्याच दक्षिण टोक पाहून परत तटबंदीपाशी येऊन पुढे गेल्यावर जोड टाकी पाहायला मिळतात. हि दोन्ही टाकी वसई मोहिमेच्या श्रीदत्त राऊत यांनी साफ केलेली आहेत. यातील पहील्या (उजव्या) बाजूकडील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्यांच्या बाजूला कातळात कोरलेले खड्डे व चर दिसतात. पूर्वीच्या काळी येथे घरे असावीत. घरांचे खांब पुरण्यासाठी कातळात खड्डे केलेले होते. तर पाण्याचा निचरा होण्यासाठी चर बनवण्यात आले होते.
टाकी पाहून टाक्यांच्या समोरच्या बाजूस खाली उतरणार्या पायवाटेने जातांना दोनही बाजूला वास्तूंचे चौथरे कारवीच्या दाट झुडपात लपलेले दिसतात. पुढे पायवाटेला उजव्या बाजूला फाटा फुटतो. येथे दोन बांगडी तोफा पाहायला मिळतात. तोफा पाहून परत पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर दोन वाटा फुटतात. एक वाट डाव्या बाजूला डोंगराच्या कड्याकडे जाते, तर दुसरी वाट सरळ किल्ल्याच्या उत्तरेकडील पठारावर जाते.
डाव्या बाजूच्या वाटेने खाली उतरल्यावर २ जोड टाकी दिसतात. त्यांच्यावरच्या बाजूस एक पुरातन टाके पाहायला मिळते. पुढे गेल्यावर ३ टाक्यांचे २ समुह पाहायला मिळतात. हि सर्व टाकी इंग्रजांच्या काळात नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य नाही. शेवटच्या टाक्याच्या पुढे जाऊन निसरड्या वाटेने खाली उतरल्यावर तटबंदीचे दगड विखुरलेले दिसतात. येथे टकमक गडाचे उत्तर टोक आहे. या टोकावरून समोरच्या डोंगरावरील टेहळणीची जागा दिसते.
याच ठिकाणी मराठे व पोर्तुगिज यांच्यात झालेल्या युध्दात मराठ्यांनी भूयारामार्गे प्रवेशव्दारापर्यंत पळ काढला होता. ते भूयार आणि प्रवेशव्दार आज अज्ञात आहे. प्रवेशव्दाराकडे जाणारा मार्ग जंगलामुळे नष्ट झालेला आहे. पण प्रवेशव्दाराकडे जाणार्या वाटेवर २ पाण्याची टाकी पाहायला मिळतात.
टकमक गडाचा हा भाग पाहून पुन्हा मुख्य पायवाटेपाशी येऊन किल्ल्याच्या सर्वोच्च पठारावर जातांना उजव्या बाजूला पाण्याचे एक टाक दिसत. पुढे पठाराच्या उत्तर टोकावरील कातळात २ फूट व्यासाचे व २ फूट खोल २ खड्डे कोरलेले पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या टोकावर बसून टेहळणी करणार्या टेहळ्यांना पाणी पिण्यासाठी जागा सोडून जावे लागू नये म्हणून हि योजना करण्यात आली होती. हे खड्डे ठराविक वेळाने जवळाच्या पाण्याच्या टाक्यातून पखालींनी पाणी आणून भरले जात असत. टकमक गडावरून दक्षिणेला कामण गडाची डोंगररांग दिसते. पश्चिमेला समुद्राला मिळणारी वैतरणा नदी दिसते तर पूर्वेला वांदरी तलाव दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर (हायवे) मुंबई पासून ८४ किमी अंतरावर सकवार गावाचा फाटा आहे. या फाट्यावर वाघाड गुरुकुल, सकवार असा मोठा फलक लावलेला आहे. महामार्गा वरून उजवीकडे वळून ५०० मीटर अंतरावर सकवार हे टकमक गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावाच्या मागे टकमक गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. सकवार गावातून आपल्याला टकमक गडाचे दक्षिणे कडील टोक (नाक) त्याच्या पुढे उजव्या बाजूस "घोडा किंवा खुट्टा" नावाने ओळखला जाणारा छोटा सुळका(पिनॅकल) व त्यापुढे पसरलेले पठार व डोंगराची धार दिसते. डोंगराच्या दक्षिणे कडील धारेवरून आपण पठारावर पोहोचतो.
त्यासाठी प्रथम सकवार गावाच्या मागिल शेतांमध्ये जावे. येथून आपल्याला डोंगराच्या पायथ्याकडील जंगलतील दोन ताडाची उंच झाडे दिसतात. (या जंगलात हीच ताडाची दोन झाडे आहेत.) यापैकी डाव्या बाजूच्या ताडाच्या झाडांच्या रोखाने चालल्यावर ५ मिनिटात एक ओढा लागतो. तो ओलांडून ओढा उजवीकडे ठेऊन पुढे जावे. साधारण ५ मिनिटांनी परत ओढा समोर येतो. तो ओलांडल्यावर कुंपण लागते. कुंपणा पलिकडे ताडाचे डाव्या बाजूचे झाड लागते. हि पायवाट पकडून सरळ गेल्यावर आपण गडाच्या डोंगराला भिडतो. सकवार गावातून गडाच्या पायथ्या पर्यंत पोचायला अर्धा तास लागतो. नंतर एक तासाची गर्द जंगलातील खडी चढण चढून आपण डोंगराच्या पठारावर पोहोचतो. पठारावरून चढ उतार पार करत उघड्या माळावरून एका तासात घोड्यापर्यंत पोहोचतो. पुढे घोड्याला वळसा घालून वर चढत जाऊन पश्चिमेकडील तटबंदी वरून आपला टकमक गडावर प्रवेश होतो. सकवार गावातून टकमक गडावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.
सकवार गावात जाण्यासाठी :-
पश्चिम रेल्वे वरील वसई किंवा विरार स्थानकात उतरावे. येथून ६ आसनी शेअर रिक्षाने १० किमी वरील मुंबई - अहमदाबाद महामार्ग गाठावा. महामार्गावरून सकवार गावातील"रामकृष्ण मठला" जाण्यासाठी ६ आसनी शेअर रिक्षा मिळतात. मठा जवळ उतरून सकवार गावात चालत जावे. (वसई ते सकवार - २३ किमी व विरार ते सकवार - २२ किमी आहे.) वसईहून सकवारला जाणे सोयिस्कर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:… करावी.
पाण्याची सोय :
गडावरील पहिल्या टाक्यात बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सकवार गावातून टकमक गडावर जाण्यास ३ ते ४ तास लागतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment