|| किल्ले श्री कामनदुर्ग ||
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठाणे जिल्ह्यात अनेक गड-दुर्ग आहेत. शहापूर जिल्ह्यातील उत्तुंग माहुली गड, कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला, ठाणे शहराजवळील घोडबंदर किल्ला, वसई तालुक्यातील कामनदुर्ग.. अशी जिल्ह्यातील गड-किल्ल्यांची खूपच मोठी यादी होईल. वसईजवळील कामनदुर्ग तर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्ला. आजही अंगाखांद्यावर प्राचीनत्वाच्या खुणा बाळगत उभा आहे. उल्हास नदी व वसईच्या खाडी क्षेत्रात असलेल्या किल्ल्यावर चढण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन तास लागतात. घनदाट जंगल, कडय़ात खोदलेल्या पायऱ्या, काळय़ा पाषाणातील चढ-उतार यामुळे हा किल्ला दुर्गप्रेमींचे खास आकर्षण.
वसई-भिवंडी रस्त्यावर कामन गाव आहे. या गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर बेलकुंडी गाव आहे. या गावातून कामनदुर्गकडे जाता येते. या किल्ल्याच्या निर्मितीमागे इतिहास आहे. पूर्वीच्या काळी कल्याण-वसई यांच्यात उल्हास नदीतून व्यापार चालत असे. वसई येथून अनेक जहाजे उल्हास नदीतून कल्याणकडे रवाना होत. या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिसरातील टेहळणी करण्यासाठी पोर्तुगीजांनी कामनदुर्गची निर्मिती केली. संभाजी महाराजांनी १६८३मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पोर्तुगीजांनी पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला, पण किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने त्यांनी त्याचा ताबा सोडला होता. त्यानंतर किल्ला ओस पडल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात.
या किल्ल्यावर इतिहासाच्या कोणत्याच खुणा पाहायला मिळत नाहीत. अन्य किल्ल्यांवर असलेले बुरूज, तटबंदी असे कोणतेही इतिहासकालीन अवशेष या किल्ल्यावर नाहीत. किल्ल्यावर चढताना मध्ये भग्नावस्थेतील प्रवेशद्वार लागते आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. किल्ल्यावर खडकात कोरलेले पाण्याचे काही टाक आहेत. किल्ल्यावर पाण्याची सोय व्हावी यासाठी हे टाक बांधण्यात आले होते. मात्र या टाकमध्ये पाणी नसते. किल्ल्यावर गेल्यावर मात्र थंडगार हवेचा झोत लागतो आणि मन प्रसन्न होते.
किल्ल्यावरून या परिसराचे चहूबाजूने विहंगम दृश्य खूपच मनमोहक दिसते. तुंगारेश्वराची डोंगररांग, परिसरातील अन्य काही किल्ले, वसईची खाडी, उल्हास नदी आदींचे दर्शन खूपच रमणीय वाटते. गडावर काही वेळ काढल्यानंतर किल्ला उतरताना वेळ आणि थकवा कधी निघून जातो हे समजतही नाही.
किल्ला कामनदुर्ग
कसे जाल?
* वसई-भिवंडी रस्त्यावर कामन हे गाव लागते. या गावातून काही अंतरावर बेलकुंडी गाव आहे. या गावातून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे.
* दिवा-वसई रेल्वेमार्गावर कामन रोड नावाचे
स्थानक आहे. या स्थानकावर उतरून कामन गावात जाता येते.
शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे, त्यानंतर साधारण २२०० फूट उंच असलेला कामनदुर्ग हा द्वितीय क्रमांकाचा जिल्ह्यातील उंच किल्ला आहे.
No comments:
Post a Comment