Followers

Friday 10 July 2020

|| किल्ले श्री गुमतारा ||



|| किल्ले श्री गुमतारा ||
गुमतारा किल्ला.
श्रेणी: (चढाई)मध्यम
जिल्हा: ठाणे
तालुका: भिवंडी
उंची: १९४९फुट (मीटर ५८५)
प्रस्तावना:-
गुमतारा नामक किल्ला हा सध्या संशोधक व बऱ्याच दुर्गयात्री पासून दुर्लक्षित आहे. इतिहासाची पाने उलगडणारी व गडकिल्यांच्या वाटा भ्रमंती करणारे येथे सहसा फार कमी भेट देतात. घोटवड दुगाड या गावाच्या जवळ असलेल्या गहन जंगलात हा किल्ला असून पायथ्याच्या गावाजवळ झालेल्या लढायांचा उल्लेख ऐतिहासिक कागद पत्रात सापडतो. किल्ल्याच्या पायथ्याशी लढाई झाल्याचे आढळते. तसेच संभाजी महाराजांच्या काळात या परिसराचा उल्लेख सापडतो.
गुमतारा किल्ला वसई ते वज्रेश्वरी रस्त्यावर वज्रेश्वरी मंदिरा पासून ४ किमी अंतरावर असलेल्या घोटवड गावाजवळ(खाली किल्यावर जाणाऱ्या आणखी वाटा दिल्या आहेत) एक उत्तुंग डोंगर आहे. त्या डोंगरावर गुमतारा किल्ला आहे. हा किल्ला टकमक किल्ल्याच्या दक्षिणेस २४ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्यास घोटवडा, दुगाड किल्ला व गोतारा या नावाने सुद्धा संबोधले जाते. पेशवे काळात या किल्ल्यास गुमतारा असे म्हणत.
गुमतारा किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगारेश्वर जंगल दिसते. तसेच किल्ल्याच्या दुष्टीक्षेपात कामणदुर्ग, टकमक व आशेरी किल्ले दिसतात. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून भिवंडीचा परिसर दिसतो. त्याकाळात या किल्ल्यावरून या परिसरावर लक्ष ठेवण्यात आले असावे. सध्या हा किल्ला दुर्लक्षित असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. घोटवड पासून ४ कि.मी. अंतरावर प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिराकडे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटकांनी देवीचे दर्शन घेऊन या दुर्लक्षित किल्यास भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो
भौगोलिक दृष्ट्या महत्व :
भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला गहन जंगलात आहे. किल्ल्याच्या १९४९ फुट एवढ्या उंचीवरून दिसणारे परिसर हे फार निसर्गरम्य आहे. या किल्ल्याच्या २४ किमी उत्तरेस टकमक गड,१६.९ किमी पूर्वेस माहुली गड, १२.८७ किमी दक्षिणेस कामाणदुर्ग आहे. समुद्री सपाटी पासून किल्याची उंची ५८५ मी. आहे. सभोलतालच्या उंच कड्यामुळे त्याला नैसर्गिक बळकटी प्राप्त झाली आहे. याची चढण मध्यम श्रेणीची आहे.
गुमतारा किल्याच्या घेऱ्यातील गावे :
घोटवड, दुगाड, भिवाळी (उसगाव धरण), पिराची वाडी, तिल्हेर गाव, मोहिली गाव व वेढे वाडी ही गांव इतिहासाची साक्ष देत या किल्ल्याच्या कुशीत आहे
किल्याचे स्वरूप:
ज्या टेकडीवर हा किल्ला बांधला आहे ती स्वत सिद्धच अतिशय अवघड आहे.ज्या ठिकाणी शत्रूवर चढून येण्याची भीती होती तेथे तटबंदी घालून निट बंदोबस्त केलेला होता. परंतु १८१८ मध्ये ह्या तटबंदीच्या पुष्कळ ठिकाणी दगडांच्या राशी पडलेल्या होत्या. किल्ल्याचा दरवाजा टेकडीच्या माथ्यापासून ४०० फुट उंचीवर एका अरुंद व एक सारख्या तुटक गेलेल्या अश्या व्हालीच्या (खिंड)(निसरडी उतरती बाजू) तोंडाशी होता. हल्ली या ठिकाणी मात्र थोडा तटबंदीचा अवशेष भाग दुष्टीस पडतो. या दावाज्याच्या शेजारी खडकांत खोदलेली ७ पाण्याची टाकी आहेत. पूर्वी गडकरी लोकांस या पाण्याचा पुरवठा या टाक्यातून होत असे.
इतिहास:
हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. या किल्ल्याच्या परिसराचा प्रथम उल्लेख इ.स.१६८९ मध्ये आढळतो.
इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्याचे समजताच नाशिकचा मुघल सुभेदार मातबरखान नाशिकहून माहुलीवर चालून गेला आणि दोन तीन महिन्यात नाना युक्त्या करून त्याने मराठ्याच्या ताब्यातील माहुली, भिवंडी ,दुगाड, मलंगगड व शेवटी कल्याण हि सर्व ठिकाणे एका मागून एक कब्जात आणली.
गोतार हा उल्लेख पूर्वीच्या भिवंडी तालुक्याच्या नकाशात ही आहे तसेच याचा उल्लेख About twelve kilometres north of bhivandi rising gently form the west is the hill of Dyahiri (525 metres) across a saddle-back ridge lies
the OLD MARATHA FORT OF GOTARA (584 metres). असा आला आहे.
मार्चच्या सुरवातीत फिरंगणावरची मसलत मुऋर झाली. काही सहकारी चिमणाजी भिवराव, रामचंद्र हरी, कृष्णाजी केशव वैगरे सरदाराना त्यांनी साष्टी वसईकडे रवाना केले. त्याप्रमाणे १६ दिवसांनी म्हणजेच १६ मार्च १७३७ रोजी गुडीपाढवा करून दुसऱ्या दिवशी १७ मार्च १७३७ गुरुवारी रात्री त्यांनी स्वत: फिरंगणावर कूच केली. मराठयांच्या फौजेचे मुख्य दोन टोळ्या केल्या होत्या एक शंकराजी केशव फडक्याच्या हाताखाली व दुसरी खंडोजी माणकरांच्या हाताखाली, एकाच वेळी साष्टी व वसईवर हल्ला करण्याचा बेत ठरला. या दोन फौजेपैकी ठाण्यास जाणाऱ्या फौजेची बिनी खंडोजी माणकर व होनाजी बलकवडे, शंकराजी केशव वगैरे लोकांवर सोपवली होती.
साष्टीवर जाणाऱ्या फौजेने राजमाची (राजमाची किल्ला) खाली दब्यास बसावे व वसईत जाणाऱ्या फौजेने माहुली किल्याच्या रानात दब्यास बसावे असे ठरले व ठरल्या दिवशी गंगाजी नाईक याने आपले दोघे भाऊ व त्यांच्याबरोबर फकीर महंमद जमादार, धाकनाक परवारी व शिवाय १५० लोक आणि कोळी देऊन त्यास राजमाचीहून बावा मलंगच्या (मलंगगड) वाडीस रवाना केले व स्व:त आपली टोळी घेऊन तो घोटवड्याखालील कोशिंबड्यावर(कोशिंबडे गाव५) गेला.
आता वसईत पाठवलेली फौज माहुलीच्या रानात दब्यास बसली होती. २४ मार्च १७३७ रोजी गुरुवारी ती टोळी त्या रानातून बाहेर निघाली व पहाटेस २५ मार्च १७३७ रोजी घोटवड्याच्या रानांत आली. तो सबंध दिवस त्यांनी तेथे रानातच घालविला दिवस उन्हाळयाचे व प्रदेश अतिशय गर्मीचा त्या रानात पाण्याचा टिपूसही मिळण्याची मारामार त्यामुळे पाण्यावाचून हैराण होऊन त्या टोळीतले दोन चार लोक मेलेही. त्याच रात्री म्हणजेच शुक्रवारी लोक पुढच्या पल्यास निघाले ते पहाटे तुंगार कामणच्या रानात येऊन राहिले. तुंगार पासून पुढे त्यानी राजवळी येथे मुक्काम करून नंतर वसईच्या मोहिमेतील पहिला मोर्चा त्यांनी बहाद्दूरपूर येथे लावला. पुढे ही टोळी वसईच्या लढाईत सहभागी होऊन त्यांनी वसईवर विजय मिळविला.
या किल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुगाड या गावी इ.स.१७८० (८ ते १२डिसेंबर) मध्ये मराठा सरदार रामचंद गणेश व इंग्रज सेनापती कर्नल हार्टले यांच्यात झालेल्या लढाईत रामचंद्र गणेश हरी ठार झाले व मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. तरी ब्रिटीश सैन्यातील लेफ्ट.ड्र्यू, लेफ्ट.कूपर, लेफ्ट.कोवन आणि लेफ्ट.पिअरसन हे सुद्धा ठार झाले होते.
मराठ्यांना मदत करणारा पोर्तुगीज अधिकारी सिग्रीअर नरोन्हा हा जबर जखमी झाल होता. रामचंद्र गणेश वीस हजाराची फौज घेऊन ब्रिटीशांवर चाल करून आला होता. दुगाड परिसरात या लढाईत वापरण्यात आलेले तोफा व दगडी तोफगोळे आढळतात.
किल्याकडे जाणारे रस्ते :
किल्ल्यावर पोहचण्यासाठी ४ वाटा आहेत.
१.एक वाट प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरा पासून १ किमी अंतरावर असलेल्या भिवाळी गावापासून हायवे जवळ उसगाव धरणातून जाते. येथून किल्ल्यावर पोहचण्यासाठी ३ तास लागतात.
२.दुसरी वाट ही घोटवडा(घोट्गाव) मधील गोठण पाडा गावातून जाते येथून किल्ल्यावर पोहचण्यासाठी अडीच ते ३ तास लागतात.(सह्याद्री प्रतिष्ठानने मुख्य हायवे पासून घोटवड(घोट्गाव) गोठण पाडा गावातून किल्यावर जाणाऱ्या वाटेवर दिशा दर्शक दाखवले आहेत.)
३.तिसरी वाट ही दुगाड गावातून पिराची वाडी येथून जाते येथून अडीच ते तीन तास लागतात. हि वाट थोडी अवघड व निसरडी आहे.
४.चौथी वाट भिवंडी वाडा रोड वरील दुगाड फाट्यापासून ५ किमी अंतरावर मोहिली गाव आहे.येथून किल्ल्यावर पोहचण्यास साधारण दीड ते दोन तास लागतात. या वाटेवर गावापासून दिशा दर्शक फलक लावलेले आहेत
एस टी बस प्रवास
१.वज्रेश्वरी मंदिर – वज्रेश्वरी वरून रिक्षा उपलब्द आहेत.मोहिली गावात जाण्यासाठी सैतानी पूल –घोटगाव– वेढे पाडा- वेढे गाव- दुगाड- मोहिली गाव.
२.मुंबई – पश्चिम रेल्वेने वसई किवा विरार रेल्वे स्थानक गाठावे येथून अर्धा पाऊन तासाने बस वज्रेश्वरी मंदिराकडे जाणारे बस आहेत बसने १ तासात तुम्ही वज्रेश्वरी मंदिर येथे उतरावे व तेथून रिक्ष्याने मोहिली गावात पोहचता येते.
किवा वसई विरार वरून –कल्याण भिवंडीला जाणाऱ्या बस मार्गे दुगाद फाटा वर उतरून तेथून ५ किमी अंतरावर मोहिली गावात जाता येते.

No comments:

Post a Comment