Followers

Wednesday 22 July 2020

*#वीरगळ*






*
#वीरगळ*
postsaambhar :स्वप्नील महेंद्र जाधवराव
एखादा शूर योद्धा युद्धात मृत झाला तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिळा किंवा स्तंभ उभारले जातात ज्याला "वीरगळ" म्हणतात. साधारणतः तीन टप्प्यांत याची विभागणी केली जाते. सर्वात खालच्या भागात योद्धा शत्रूशी लढताना दाखवतात.(मोठ्या युद्धासाठी हत्ती,अंबारी,घोडे दाखवले जातात. पशुधन रक्षणासाठी युद्ध झाले असेल तर योद्ध्यापाठी पशु दाखवले जातात. काहीवेळा हिंस्र श्वापदांशी लढणारा योद्धा देखील दाखवला जातो.) त्याच्या वरच्या टप्प्यात शहीद योद्धा अप्सरांसह स्वर्गाकडे सहगमन करत असतो. तर सर्वात वरच्या भागात योद्धा स्वर्गात त्याच्या पुरोहितासोबत शिवलिंगाचे पुजन करताना दिसतो. वीर ज्या संप्रदायाचा असेल त्या देवतेची मुर्ती सर्वात वरच्या टप्प्यावर असते. यात प्रामुख्याने शिवलिंग, विष्णु, गणपती, देवी तर काही ठिकाणी जैन तिर्थंकर सुद्धा असतात. क्वचीत वीरगळींवर शिलालेखही कोरलेले असतात. वीरगळींचे गोधन वीरगळ, आत्मबलिदान निदर्शक वीरगळ असे अनेक प्रकार आहेत. अशा वीरगळ भुईंज मध्ये महालक्ष्मी मंदिर, मारुती मंदिर, विनायक मुरलीधर खरे यांचे घराजवळ अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. दुर्दैवाने एक वीरगळ तर नदीवरील महादेव मंदिरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी सपाट दगड म्हणून वापरली आहे. *#सतीशिळा* पतीच्या निधनानंतर जर पतिव्रता स्त्री सती गेली तर तिच्या पवित्र स्मृतीप्रीत्यर्थ जी शिळा उभारली जाते तिला सतीशिळा म्हणतात. या सतीशिळेवर कोपरापासून काटकोनात दुमडलेला बांगड्या भरलेला हात असतो. त्या कोनात दोन स्त्रिया नमस्कार मुद्रेत बसलेल्या असतात. भुईंजच्या कृष्णामाई घाटावर अशीच एक सतीशिळा आहे. पण गेल्यावर्षी झालेल्या घाटाच्या नुतनीकरणावेळी बांधकामात ही शिळा वापरली आहे. *#नागशिळा* अनेक अभ्यासकांच्या मते महाराष्ट्र ही प्राचिन नागभुमी आहे. आजही अनेक ठिकाणी नागपूजा केली जाते. भुईंजमध्ये घाटावर असणारी ही नागशिळा तशी अलिकडच्या काळातील आहे (?) गावकऱ्यांकडून नागपंचमीला नागाची पूजा याच ठिकाणी केली जाते. *#विष्णुशिल्प* कृष्णामाई घाटावरील बुरुजावर हे विष्णुशिल्प कोरलेले आहे. ह्या शिल्पातील विष्णुने हातांत शंख,चक्र आणि दंड (गदा ?) घेतलेले आहे तर एका हाताने काखेत महालक्ष्मीला उचलले आहे. विष्णुच्या उजव्या बाजूला गरुड तर डाव्या बाजूला हनुमान प्रार्थना मुद्रेत आहेत. *#गजलक्ष्मी_शिल्प* महालक्ष्मी मंदिरात हे गजलक्ष्मी शिल्प आहे. संपन्नतेचे प्रतिक म्हणून या शिल्पाकडे पाहिले जाते. दोन्ही बाजूला असलेले दोन हत्ती लक्ष्मीवर सोंड उंचावून कुंभातून अभिषेक करत आहेत. मधे दोन्ही हातात कमळ पुष्प घेतलेली लक्ष्मी पद्मासनात बसलेली आहे. मंदिरापाठीमागे स्वतंत्र मंदिरात असणारी ही मुर्ती नुतनीकरणावेळी दिपमाळेजवळ आणून ठेवली आहे. त्याचवेळी तिच्यावर सिमेंटचा थर चढवून तीचे प्राचिनत्व मोडीत काढले आहे. भुईंज ही प्राचिनतम नगरी आहे. मुख्य वसाहत असल्या कारणाने इथे नक्कीच अनेक युद्धं झाली असणार. त्याचेच प्रतिक म्हणून भुईंज मध्येही अशा अनेक वीरगळी आणि सतीशिळा पहायला मिळतात. पण सध्या या स्मृतीशिळांची अवस्था दयनीय झाली आहे. शिळा व त्या शूरांचा इतिहास धूळखात पडला आहे. ९५% गावकऱ्यांनी किंवा घाट-मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींनी कधीच ही शिल्प लक्षपूर्वक पाहिली नसतील हि एक मोठी शोकांतिका आहे. आपल्या शेजारचे किकली गाव महाराष्ट्रातील पहिले वीरगळींचे गाव म्हणून नावारुपाला आले आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आपणही ह्या वीरगळी जतन करून एक आदर्श निर्माण करु शकतो. #भुईंज. #शोध_प्रबंध Swapnil Jadhavrao

No comments:

Post a Comment