Followers

Friday 10 July 2020

|| किल्ले श्री हडसर (पर्वतगड)||





|| किल्ले श्री हडसर (पर्वतगड)||
नाव हड्सर
उंची४६८० फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी.
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव हडसर,जुन्नर
डोंगररांग सह्याद्रीस
ध्याची अवस्था चांगली
हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. हडसर हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड,शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.
इतिहास
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते. दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती ,गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूरपाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे. येथून थोडे पुढे कातळात खोदलेली प्रशस्त गुहा आहे.मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर दिसतो. समोरच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड,जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.
जाण्याच्या वाटा
या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची व दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या कोरून बांधून काढलेली आहे.कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडायापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे

No comments:

Post a Comment