Followers

Saturday 25 July 2020

सज्जनगड











सज्जनगड :
postsaambhar :yogesh bhorkar
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या नैर्‌ऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंच आहे, तर पठारापासून १००० फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे.
सज्जनगड या किल्ल्याला आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९,पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
१८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नैरससातारा' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

सज्जनगडावरील वास्तू व पहाण्यासारखी ठिकाणे :
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामीयांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामीयांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे.
शके १६०३ माघ नवमी (सन १६८२) रोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात.
गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार'असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे.दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशीदवजा
इमारत आहे, तर समोरच आंगलाई देवीचे मंदिर आहे.
मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात.
गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात.

No comments:

Post a Comment