Followers

Friday 10 July 2020

| किल्ले श्री पारसिक ||

| किल्ले श्री पारसिक ||
परकीय सत्तेला पहिला हादरा देणारा पारसिक किल्ला काळाच्या उदरात गडप
स्वातंत्र्यपूर्व काळात युरोपियन राष्ट्राच्या वाढत्या साम्राज्यशाहीला आशियामध्ये पहिली धडक मराठेशाहीने दिली. त्या मराठेशाहीचा गौरवशाली स्फूर्तीदायक इतिहासाची साक्ष देणारा पारसिकचा किल्ला नामशेष होऊन या किल्ल्याला सध्या हागणदारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या या पारसिक टेकडी परिसरात ठाणे महानगर पालिका उद्यानाची निर्मिती करीत आहे. स्मृतीवन म्हणून हे उद्यान विकसित करताना ठामपाने ऐतिहासिक क्षणांना देखील उजळणी देऊन पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठेवा ठेवावा, अशी मागणी इतिहासप्रेमी करीत आहेत.
ओल्ड ठाणे गॅझेटिअरमध्ये असलेल्या माहितीनुसार, पाचीन काळी मुंब्रा खाडीमार्गे कल्याणला व्यापारी वाहतूक होत होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोर्तुगीजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. तटबंदीची उंची 3.5 ते 6 मीटर असल्याचा उल्लेख आहे. खाडीच्या बाजूला तोफखान्यात सहा तोफा त्या ठिकाणी होत्या. पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर होती. त्याच्या खुणा आजदेखील येथे पहायला मिळतात. 1683 साली मुघलांनी पोर्तुगीजांकडे या परिसरात धान्यांच्या गलबतांना जाण्यास अनुमती मिळावी, यासाठी विनंती केली होती. त्यानुसार पोर्तुगीजांनी मुघल सैन्यास उत्तर कोकणात जाण्यासाठी आपल्या प्रदेशाचा वापर करण्यास परवानगी दिली. ही गोष्ट संभाजी महाराजांना समजताच त्यांनी मराठी आरमाराला मुंब्रा खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी पारसिक टेकडीवर किल्ला बांधण्याचे आदेश दिले. यामुळे कल्याण व भिवंडीकडे जाणार्या गलबतांवर लक्ष ठेवण्यास सोयीचे होणार होते.
पोर्तुगीजांना ही बातमी समजताच त्यांनी मुंब्रा खाडी नजीक मेढेकोट बांधला व पारसिक टेकडीची जागा ताब्यात घेतली व तेथे दगडांचा भक्कम किल्ला बांधला. या पारसिक कि ल्याबाबत मुघलांनी पोर्तुगीजांबरोबर सख्य केल्यामुळे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर हल्ले चढवण्यास सुरूवात केली. भिवंडी जवळील अंजूर गावात मराठा आणि पोर्तुगीजांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यावेळी  त्यावेळी पारसिक किल्ल्यावरील 25 पोर्तुगीज सशस्त्र सैनिकांना मराठय़ांचा पाडाव करण्यासाठी रवाना करण्यात आले होते.  मात्र, मराठा सैन्याने पोर्तुगीजांना पळता भुई थोडी केली. 19 पोर्तुगीज सैनिकांना मराठय़ांनी कंठस्नान घातले तर सहा सैनिक पळून जाण्यात यशस्वी झाले. पुढे 1737 मध्ये चिमाजी आप्पाने उत्तर कोकणात पोर्तुगीजांविरुद्ध युद्ध पुकारले. अंताजी रघुनाथ कावळे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते. पोर्तुगीजांचा पाडाव करून पारसिक किल्ल्यावर ताबा मिळविला. आप्पाजी हरी यांच्याकडे किल्ल्याची सूत्रे सोपविली. पुढे ठाणे किल्लादेखील चिमाजी आप्पाने जिंकून पेशवाईत सामील केला. एकंदर इतिहास पडताळल्यास पोर्तुगीजांना पहिला धक्का देण्यात पारसिक किल्ल्याने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
मात्र, मराठय़ांच्या गौरवशाली पराक्रमाची साक्ष देणारा हा पारसिक किल्ला सध्या अतिक्रमणांचे अन् दुरवस्थेचे धक्के सहन करीत आहे. सध्या टेकडीच्या स्वरुपात अस्तित्वात असणार्या या किल्ल्याचे सर्व अवशेष दिसेनासे झाले असून येथील दगडांचा वापर करून झोपडीधारकांनी जोते बांधले आहेत. तर या भागात असणारी सार्वजनिक शौचालयाची संख्या अपुरी असल्यामुळे या किल्ल्याच्या अवशेषांना चक्क हागणदारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  त्याशिवाय, गर्दुल्ले आणि उघडय़ावर मद्यपान करणार्यांसाठी किल्ल्याचे अवशेष म्हणजे नंदनवनच ठरले आहे. पुरातत्व खाते किंवा पोलीस दल यांना या अवशेषांबद्दल फारसे गांभीर्य नसल्यामुळेच या किल्ल्याचे अवशेषही नामशेष होऊ लागले असून अनैतिक कृत्यांसाठी त्याचा वापर होत आहे. काही महिन्यांपूर्वी या टेकडीलगतच्या बंगल्यामध्ये एका अर्भकालाही टाकण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्र संघाच्या हेरीटेज मार्गदर्शक प्रणालीनुसार, ऐतिहासिक वारसा असणार्या कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी संबंधित देशाच्या सरकारची आहे. मात्र, परकीय सत्तेला पहिला हादरा ज्या वास्तूमधून दिला गेला. त्या वास्तूचे महत्त्वच या देशाच्या शासनकर्त्यांना नसल्यामुळे ही वास्तू काळाच्या उदरात गडप होऊ लागली आहे, अशी प्रतिक्रिया ठाण्यातील इतिहासप्रेमी व्यक्त करू लागले आहेत.
छायाचित्र उपलब्ध नाहीत

No comments:

Post a Comment