महल-ए-गुलाला
बुलडाणा जिल्ह्यातील
जळगाव जामोद तालुक्यात सातपुडा पर्वतावर भिंगारा हे गाव वसले आहे. पहाडावर
असलेल्या या गावात जाण्याकरिता रस्ता नाही. घाटामध्ये अत्यंत खडतर
रस्त्यावरून गावात जावे लागते. गावात विद्युतपूरवठा नाही तसेच पिण्याच्या
पाण्याचीही भीषण टंचाई आहे. मात्र, या गावाला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा
लाभला आहे. या गावात एक महल असल्याची माहिती इतिहास संशोधक डॉ. शाम देवकर
यांनी दिली. आम्ही भिंगारा येथे हा महल बघायला गेलो असता मोगल काळातील खूपच
सुंदर बांधकाम असलेल्या या महलाची सध्या दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले.
याला महल- ए- गुलाला म्हणतात. महालाचे बांधकाम दगड व विटांमध्ये करण्यात
आले आहे. महालामध्ये तीन खोल्या आहेत. महालामध्ये असलेल्या दरवाजाच्या
चौकटी दगडाच्या आहेत. त्यावर सुद्धा कलाकृती केलेली आहे. अन्य बांधकाम
पडलेले आहे. महालाच्या बाह्य भिंतीवर व आतमध्ये सुंदर नक्षीकाम केले आहे.
तसेच मोठ- मोठ्या खिडक्या आहेत. या महालासमोरच राणी तलाव आहे. महालासमोर या
तलावाचे बांधकाम करण्यात आले आहे. महालामधून तलावाचे सुंदर दृष्य
निदर्शनास पडते. भिंगारा गावामध्ये आधी भिल राजे होते. भिल घराण्यातील
राजांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. या महलचे बांधकाम ३०० ते ३५०
वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या काळात करण्यात आले असावे. भिल राजा शाहबाज खान
यांच्या वंशातील व्यक्तीने हा महल बांधला असावा, अशी माहिती इतिहास संशोधक
डॉ. शाम देवकर यांनी दिली. डॉ. शाम देवकर यांनी सांगितले, की ब-हाणपूर,
जामोद, भिंगारा १८५४ मध्ये उत्तर व-हाडच्या डेप्यूटी कमीश्नरने
भिंगाºयाच्या भिल राजाला पत्र लिहीले होते. यात ठगांवर लक्ष ठेवण्याची
जबाबदारी देण्यात आली होती. तसेच येथे किताब खॉ नावाचा सरदार राहत होता व
त्याने हा महाल बांधला होता, असे स्थानिक नागरिक सांगतात. गावात सध्या
आढळत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या अवशेषावरून मुघल काळात या गावाला विशेष
महत्व होते, असे निदर्शनास येते. गावामध्ये एका मशीदीचे अवशेष बघायला
मिळतात. याला शाही मशीद म्हणतात. या मशीदीची पडझड झाली आहे.
ब-हाणपूरचा अशीरगड, जळगाव जामोद तालुक्यातील मैलगड या किल्ल्यांचा भिंगारा
गावाशी संबंध होता. अत्यंत उंचावर असल्यामुळे या ठिकाणी शत्रु येण्याची
शक्यता कमी होती. त्यामुळे निवासासाठी हे ठिकाण निवडले असावे. काळाच्या
ओघात या गावाचा इतिहास गडप झाला असून, हा इतिहास शोधण्याची गरज आहे.
विवेक चांदूरकर
9552847092
No comments:
Post a Comment