Followers

Friday 10 July 2020

|| किल्ले श्री कमळगड ||




|| किल्ले श्री कमळगड ||
कमळगड (Kamalgad)
किल्ल्याची ऊंची : 4200 फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम
महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णानदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गडमाथ्याच्या सपाटीवरून आजुबाजूचा डोंगरदर्‍यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथात येतो. एरवी आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा-नवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्‍याही आहेत. हीच ती गेरूची किंवा कावेची विहीर, उंच अशा या ५० ते ५५ पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.
गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडे गवतात लपलेले चौथर्‍याचे अवशेष दिसतात. नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोयरिक कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. मूळ मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झाले. थोर संत कवी वामन पंडित यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.
१ महाबळेश्वरहून :-
महाबळेश्वरच्या केट्‌स पॉईंट वरून खाली येणार्‍या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोर्‍यात उतरले की, सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.
२ वाईहून
वाईहून नांदवणे गावी येण्यास सकाळी ९३० वाजता एसटी बस आहे. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.
वासोळ्याहून
उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोर्‍यातील असरे, रानोला, वासोळे या गावात वाईहून एसटी ने तासभरात पोहोचता येते. वासोळ्यावरुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यापैकी पहिली वाट सोपी पण थोडी दूरची आहे.
अ). वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्या दिशेने चढणीस सुरुवात केली असता, आपण साधारण एक ते दीड तासातच माचीजवळ येतो. वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसर्‍या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर "यू टर्न" घेऊन पाऊण तासा नंतर आपण किल्ल्याच्या मुख्य पहाडावर येतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच वर गेले की १५ ते २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र आपण मोकळ्या मैदानावर येतो. येथे धनगरांची वस्ती आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास ३ ते ३.३० तास लागतात.
ब) वासोळ्यावरुन १५ मिनिटे चालत तुपेवाडीला यावे. येथून शाळेच्या बाजुने पुढे जाणारा रस्ता धरायचा. पुढे ७ ते ८ मिनिटात दगडी बांध डावीकडे ठेवून जंगलात जाणारा रस्ता धरायचा. मधे काही ठिकाणी रस्त्याला फाटे फुटले आहेत. गावातून आलेला मुख्य रस्ता सोडायचा नाही. बांध गेल्यावर ५ ते ७ मिनिटात एका ठिकाणी रस्ता उजवीकडे वळतो आणि किल्ल्याची सोंड सुरु होते. या वाटेने दमछाक करणारा चढ आहे. पण तासाभरात आपण माचीवर पोचतो. येथून हाच रस्ता जंगलाच्या वाटेने थेट धनगर वाडीत घेऊन जातो. हा धनगरांचा नेहमीचा रस्ता आहे.
याच पठारावरून आपणास कमळगड पूर्णपणे दृष्टीपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे. बालेकिल्ला चढताना थोडे प्रस्तरारोहण करावे लागते. तिथे आता एक झाडाची फांदी बसवली आहे. त्याच्या सहाय्याने गडावर जाता येते.या वाटेने गडावर पोहोचण्यास २ ते २.३० तास लागतात.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच - सहा जण राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची व्यवस्था आपण स्वत…:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
नांदवणे मार्गे अडीच तास ,
वासोळ्या गावातून ३ ते ३.३० तास,
तुपेवाडीतून गडावर पोहोचण्यास २ ते २.३० तास

No comments:

Post a Comment