Followers

Friday 10 July 2020

|| किल्ले गोरखगड ||

खास ट्रेकर्स साठी खास






|| किल्ले गोरखगड ||
ठाणे आणि पुणे जिल्ह्य़ाच्या सीमेवर सह्याद्रीची रांग खूपच अजस्र वाटते. माळशेज, नाणेघाट, अहुपे घाट येथील बुलंद, अभेद्य, कराल कातळसुळके गगनाला भिडलेले आहेत. या डोंगररांगेतून, निसर्गरम्य वातावरणातून फिरताना एक वेगळीचे अनुभूती येते. आडवाटेचा अहुपे घाट म्हणजे निसर्गाचे अद्भुत लेणे. या घाटात आले की, दोन गगनस्पर्शी सुळके प्रत्येक सह्य़प्रेमीला साद घालतात.. मच्छिंद्रगड नि गोरखगड.
गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नाही. पण अजस्र्र सुळक्यांमुळे गिर्यारोहकांसाठी ते नेहमीच आकर्षण ठरलेले आहेत. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या नाथ संप्रदयातील गुरू-शिष्यांच्या नावावरून या सुळक्यांना ही नावे देण्यातली आली आहेत, हे एव्हाना लक्षात आले. गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून त्याचे नाव गोरखगड, अशी आख्यायिका आहे.
गोरखडला जाण्यासाठी मुरबाड तालुक्यातील देहरी या गावात येणे आवश्यक आहे. या गावातून एक जंगलवाट गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाजापाशी घेऊन जाते. तासाभराच्या या पायवाटेवरून जाताना घनदाट जंगलातील भ्रमंती घडते. या पायवाटेवर एका ठिकाणी राज्य सरकारच्या वनविभागाचा बोर्ड लक्ष वेधून घेतो. या बोर्डवर गोरखगडाची थोडक्यात माहिती आहे. गोरखगडाच्या पायथ्याशी गोरखनाथाचे सुंदर मंदिर आहे. प्रवेशद्वारातून वर चढून गेल्यास पाण्याची टाक लागतात. त्यापुढील चढणीच्या वाटेवरून थोडे पुढे गेल्यास काही पायऱ्या लागतात. त्या खाली उतरल्यावर एका अतिविशाल गुहेसमोर येऊन उभे ठाकतो. या गुहेच्या दुसऱ्या बाजूला भयाण दरी असून त्या दरीत झुकलेले चाफ्याचे दोन डेरेदार वृक्ष अप्रतिम सौंदर्याचा दाखला देतात. याच गुहेतून समोर दिसणारा मच्छिंद्रगड निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवितो. गुहेच्या थोडे पुढे गेल्यावर पाण्याची आणखी काही टांक लागतात. मात्र या टांकामधील पाणी पिण्यायोग्य आणि चविष्ट आहे.
गोरखगडाचा माथा चढाईसाठी अवघड असला तरी तो चढल्याशिवाय येथील निसर्गसौंदर्याचा अनुभवच घेता येणार नाही. गुहेच्या उजव्या बाजूने असणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. वर निर्जनस्थळी महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्याशिवाय गोरक्षनाथाची समाधी आणि पुरातन शिलालेख आहे. माथ्यावर दूरवर नजर टाकेल तिथे सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगा, घनदाट जंगल दिसते. मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाट, अहुपे घाट यांचे सहजसुंदर दर्शन होते.
गोरखगड म्हणजे निसर्गाचे अद्भुत लेणे. या गडाविषयीचा इतिहास फारसा माहीत नाही. पण आजूबाजूच्या परिसरावर टेहळणी करण्यासाठी त्याचा बहुतेक उपयोग केला जात असावा. गगनस्पर्शी सुळके, घनदाट जंगल, खोल दऱ्या, खिंड, अनुभवायचे असतील तर गोरखगडला आवश्यक भेट द्या. इतिहासाची आवड आणि साहस व जिद्द यांची भूक भागविण्यासाठी हे एक अप्रतिम ठिकाण आहे.
गोरखगड, मुरबाड कसे जाल?
*कल्याणहून मुरबाडला जाण्यासाठी एसटी बस आहे. मुरबाडहून म्हसा-देहरी फाटय़ावरून खासगी जीप वा एसटी बस देहरी येथे जाण्यासाठी सुटतात. देहरीहून गोरखगडकडे जाण्यासाठी पायवाट आहे.
*ठाणे स्थानकाजवळून मीरा-भाईंदर, बोरिवलीकडे जाणाऱ्या टीएमटी बस, एसटी गायमुखवरून जातात. नागला बंदराजवळ उतरून या मंदिराकडे जाता येते.

No comments:

Post a Comment