Followers

Sunday, 12 July 2020

#किल्ले_पारगड ⛳

#किल्ले_पारगड
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा नितांत सुंदर पारगड किल्ला डौलाने उभा आहे. घनदाट जंगलात उभा असलेला हा पारगड किल्ला आंबोली घाट व दोडामार्ग कोकणात उतरणाऱ्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याची उभारणी करण्यात आली. चंदगड पासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला. गडाच्या माथ्यावर पर्यंत गाडीरस्ता आहे.

गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केला आहे. या पाय वाटेवरच जुन्या दरवाजांचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालीन जांभ्या दगडात बांधलेल्या २०० पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गडावर प्रवेश करताच समोर त्या तोफा आणि डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो.

१८१ वर्षे पारगड अजिंक्य राहिला. शिवरायांनी हा किल्ला बांधून याची वास्तुशांती केली व गृहप्रवेश केला आणि इथल्या मावळ्यांना राजांनी आज्ञा दिली. 'चंद्र, सूर्य गगनी तळपताहेत तोवर गड जागता ठेवा!' आणि शिवरायांच्या माघारी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे ३४० वर्षे हा गड त्या शूर मावळ्यांच्या वारसांनी आजही जागता ठेवलाय.

पारगडास फेरफटका मारू लागलो, की गुणजल, महादेव, गडकऱ्यांचे वं फाटक, गणेश असे चार तलाव दिसतात. या बरोबरच गडावर शिवकालीन अशा १८ विहिरीही आहेत. पण त्यापैकी बऱ्याच बुजलेल्या आहेत. मालेकर, फडणीस, महादेव, माळवे, भांडे, झेंडे नावाचे बुरुज भेटू लागतात. गडाच्या उत्तरेकडील बाजूस महादेव मंदिर आहे. या मंदिराजवळून खालच्या दरीतले घनदाट जंगल पाहणाऱ्या खिळवून ठेवते. पारगडावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हनुमंतगडाचे दर्शन होते.

पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालसरे, शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार, गडावर झेंडा लावण्याचे काम असणारे बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे, शिवकालातले तोफखान्याचे प्रमुख विठोजी मावळ्यांचे वंशज कान्होब माळवे, घोडदळाच्या पथक प्रमुखाचे वंशज विनायक नांगरे गडकर्यांचे वंशज शांताराम शिंदे अजूनही राहतात.

सध्या तानाजींचे वंशज बाळकृष्ण मालुसरे बेळगावला राहतात. त्यांच्याकडे तानाजी मालुसरे यांची तलवार, सिंहगडावर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर शिवरायांनी आपल्या गळ्यातील समुद्र कवड्याची माळ, तानाजींच्या देहावर ठेवली होती ती कवड्याची माळ व मालुसरे घराण्याचा मूळ पुरुष रायबाजी बिन तानाजी मालुसरे यांची अस्सल वंशावळ अशा इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या वस्तू त्यांनी आपल्या प्राणापलीकडे जपून ठेवल्या आहेत. पारगडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवीसन १६७६ साली या गडाची निर्मिती केली असे आढळते. पारगडचा पहिला किल्लेदार म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायाजी मालुसरे यांची शिवरायांनी नेमणूक केली. काही दिवस स्वतः महाराज या गडावर मुक्कामास होते, असे गडकरी अभिमानाने सांगतात. पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला, पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर छुपे हल्ले करून त्यांना पुरते हैराण केले. शेवटी खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंताना कुमक घेऊन येण्यास सांगितले. पण गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. अखेर कंटाळून खवासखान रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मोघलांनी पारगडासमोर सपशेल हार पत्करली.
याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे. पुढे पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला.नंतर मराठा राज्य संपून इंग्रज अंमल गडावर चालू राहिला, तरीही गडावरील लोक गडावरच राहिले. इंग्रजांनी त्यांना मासिक तनखेवजा पगार सुरू केला. हा पगार बेळगाव मामलेदार कचेरीतून १९५४ पर्यंत त्यांना मिळत असे.

@Shubham_Hadgal

No comments:

Post a Comment