#शिवकालीन_स्वराज्यातील_किल्ले_भाग_५
मल्हारगड / सोनोरी – Sonori / Malhargad Fort
{ पुणे जिल्हा }
किल्ल्याची ऊंची: २५० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: भुलेश्वर
श्रेणी: सोपी
तालुका: पुरंदर
जिल्हा: पुणे
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे.
पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ
रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी
डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग
म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत.
पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी
मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६०
या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’
म्हणूनही ओळखले जाते. मल्हारगड हे नाव किल्ल्याला कसे मिळाले यांच्या खूप
साऱ्या दंतकथा ऐकावयास मिळतात.
११०० मीटर लांबी असलेल्या दुहेरी
तटबंदीचा हा किल्ला दिवे घाटाच्या पूर्वेस अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे.
पुण्यापासून मल्हारगड अंतर सुमारे ३५ किलोमीटर आहे.
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.
इतिहास
मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे
आणि कृष्णराव पानसे यांनी केली. सन १७६३ ते १७६५ च्या कालावधीमध्ये
किल्ल्याचे बांधकाम झाले. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर
येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. इंग्रजांच्या
विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय
घेतला होता. किल्ल्याच्या पायथ्याला असेलेल्या सोनोरी गावात सरदार पानसेंचा
एक चिरेबंदी वाडा सुद्धा आहे. याच सोनोरी गावात श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर
मूर्ती असलेले सुबक मंदिर आहे. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि
आजुबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
सोनोरी गावातून थोडी चढाई नंतर आपण पूर्व दिशेच्या मुख्य प्रवेशद्वारा
पर्यंत पोहोचतो. प्रवेशद्वार सुस्थितीत असून एका विशाल दगडालाच बुरुजात
बांधून तयार केलेली रचना दिसते. आतील बाजूस मोठ्या देवड्या आणि पुढे
जाण्यासाठी निमुळती वाट आहे. आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता
बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक
विहीर आहे. साधारण त्रिकोणी आकाराची तटबंदी असलेल्या मल्हारगडात चौकोनी
आकाराचा विशेष रचना असलेला बालेकिल्ला आहे. संपूर्ण तटबंदीत वैशिष्ट्यपूर्ण
जंग्या आहेत.
बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे
गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला
लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. सह्याद्री
प्रतिष्ठानने घेतलेल्या काही मोहिमांमध्ये यातील सर्व गाळ काढून टाकण्यात
आला असून येत्या पावसाळ्यात यातील पाणी पिण्यायोग्य असेल. तसेच पुढे
किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या
बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा दिसतो. बुरुजाकडून उजवीकडे पुढे
गेल्यावर आपल्याला आणखी एक लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या
दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो.
गडाचा सर्वात प्रेक्षणीय भाग
बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यातील वास्तू पडल्या असून देखरेखे अभावी त्या
नष्ट होण्याचा धोका आहे. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. आकाराने मोठे
मंदिर रेखीव शिवलिंग असलेले सावळेश्वराचे आहे. तर लहान मंदिरात अश्वारूढ
मल्हारीची म्हल्सासोबतची मूर्ती लक्षवेधक आहे या मंदिरातील मूर्ती पाहून
जेजुरीची आठवण नक्कीच येते, कदाचित यामुळेच किल्ल्याचे नाव मल्हारगड पडले
असावे. खंडोबाच्या मूर्ती शेजारी खूप साऱ्या छोट्या मुर्त्या आपल्याला
पहावयास मिळतात. कळसासकट संपूर्ण दगडात बांधलेली हि दोन्ही मंदिरे मनमोहक
आहेत. गावकरी आणि काही सामाजित संस्थांनी मिळून दोनही मंदिरांच्या रंग
रंगोटीचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. पिवळा आणि नारंगी रंग दिलेली हि
मंदिरे सहज लक्ष वेधून घेतात. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे.
महादेव मंदिराच्या समोरील भिंतीच्या मागील बाजूस उत्तम स्थितीतील विहीर
आहे, जिचे पाणी पुण्यायोग्य आहे. पाणी काढण्यासाठी दोर सोबत असणे आवश्यक
आहे.
पूर्व दिशेच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला डोंगराच्या
टोकावर आल्यावर समोरच्या डोंगरावर डाव्याबाजूला असलेल्या विजेच्या टॉवर
शेजारी आणि उजव्या बाजूला खाली कातळात खोदलेले दोन टाके पहावयास मिळतात.
दोन्ही टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. गडाची फेरी पूर्ण करण्यासाठी एक तास
पुरतो.
किल्ल्यावरून कर्हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार वगैरे दिसतात.
गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा
पाहण्यासारखा आहे. वाड्यामध्ये चोरवाटा, भुयारे, पोलादी, सुळे मारलेले
लाकडी दरवाजे, कलापूर्ण खिडक्या, वैशिष्ट्यपूर्ण विहीर, अष्टकोनी हत्ती
तलाव. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व
लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण
म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात
घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.
गडावर जाण्याच्या वाटा
१.
पुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवे घाट संपल्यावर ४ किलोमीटर पुढे जाऊन
काळेवाडी फाटा लागतो, स्वतःचे वाहन असल्यास थेट गडाच्या दक्षिणेकडील
पडलेल्या बुरूजा पर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. काळेवाडी
गावातून जाणारा हा रस्ता फारसा परिचित नसला तरीही अतिशय सोपा आहे. रस्ता
थोडा कच्चा आहे; चार चाकी वाहन देखील सहज किल्ल्याच्या बुरुजापर्यंत जाते.
तेथून ५ मिनिटांच्या चढाईने किल्ल्यात प्रवेश करता येतो.
२. पुण्याहून
सासवड मार्गावर दिवे घाट संपल्या नंतर २ किलोमीटरवर झेंडेवाडी गावाचा फाटा
लागतो. येथून २ कि.मी. वर झेंडेवाडी हे गाव आहे. गाव पार करून आपल्याला
समोरच्या डोंगररांगामध्ये दिसणाऱ्या ‘ण’ आकाराच्या खिंडीत जावे लागते.
गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात. या खिंडीत
पोहोचल्याशिवाय मल्हारगडाचे दर्शन होत नाही. या खिंडीत गेल्यावर समोरच याच
डोंगररांगमध्ये असणारा मल्हारगड आपल्याला दिसतो. तटबंदींनी सजलेल्या
मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडीतून
किल्ल्यावर जाण्यास अर्धातास तर आपण उतरलेल्या झेंडेवाडीफाट्या पासून
खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.
३. सासवड
पासून ६ कि.मी. वर सोनोरी हे गाव आहे. या गावाला एस.टी. सासवडहून निघून
दिवसातून तीन वेळा म्हणजे स. १०, दु. २, आणि संध्या. ५ या वेळेत भेट देते.
सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. गडाकडे कूच
करण्याआधी सोनोरी गावात असणारा सहा बुरुजांनी युक्त असा पानसे यांचा वाडा
पाहण्यासारखा आहे. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा-पाऊण तास
लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी टॉवरच्या
बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.
राहण्याची सोय
फक्त ५-६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र
रहाण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावात किंवा
झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते. जेवणाची सोय गडावर नाही. गडावर
विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्यात एक बांधीव तळे व तीन विहिरी
आहेत मात्र इतर दोन विहिरींना अजिबात पाणी नाही व तळ्यातील पाणी फक्त
वापरण्यासाठी उपयुक्त आहे, पिण्यासाठी नाही.
हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.....
लेखन /माहिती संकलन - रमेश साहेबराव जाधव