Followers

Friday, 29 May 2020

सातशे वर्षांहून अधिक असलेला वैभवशाली भुईकोट किल्ला नळदुर्ग किल्ला

नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रात असलेल्या भुईकोट किल्ल्यांपैकी सर्वात मोठा किल्ला. सोलापूर -हैदराबाद रस्त्यावर नळदुर्ग या गावांत हा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ल्याची माहिती मिळवत असताना नळ राजा आणि दमयंती राणीचा इतिहास सांगितला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला आणि त्याच्या नावावरुन या किल्ल्याचं नाव नळदुर्ग झालं.

नळदूर्ग हे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संस्मरणीय तर आहेच पण सध्या पर्यटकांना आकर्षित करणारे स्थान म्हणून सुध्दा प्रसिद्ध होत आहे. इतिहासात जर डोकावून पाहिलं तर या किल्ल्याची नोंद इ.स. ५६७ पासून सापडते.

चालुक्य राजा कीर्तीवर्मनने हा किल्ला नल राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता ही या किल्ल्याबाबतची पहिली नोंद आढळते. त्यानंतर या किल्ल्यावर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. पुढे बहमनीच्या काळात म्हणजे इ.स. १३५१ मध्ये नळदूर्ग किल्ला त्यांच्या ताब्यात आला. बहमनी च्या काळातच या किल्ल्याच्या मजबूती करणाचं बांधकाम करण्यात आले. 

बहामनी राज्यांच्या विघटनानंतर आदिलशाहीच्या भरभराटीच्या काळात म्हणजे इ.स. १४८२ मध्ये नळदुर्ग किल्ल्याचा समावेश  विजापुरच्या राज्यात आला. पुढे जाऊन औरंगजेबाने आदिलशाही नष्ट करून हा किल्ला मुघल साम्राज्यात घेतला.

इ.स. १७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकुन मराठा साम्राज्यात घेतला. इ.स. १७९९ मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला. त्यानुसार फ्रेंच सैनिकांऐवजी इंग्रजांचे सैनिक ठेवण्याचे ठरले. या तहाने इंग्रजांचे वर्चस्व हैद्राबादेत प्रस्थापित झाले.

दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे.

नळदुर्ग किल्ल्यावरील पहाण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत. आणि सध्या हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यावर आवर्जून पाहण्याजोगे म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार नळदुर्ग गावातून किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेने जात असताना खंदकावर उभारण्यात आलेल्या पुलावरून किल्ल्याकडे जाता येते. किल्ल्याच्या परिसरात आल्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर पुढे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला बुरुजामध्ये काही खोल्या आहेत. नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी ३ किमी लांबीची आहे. किल्ल्याच्या परिसरात तटबंदीवर शंभरपेक्षा जास्त बांधलेले बुरुज आहेत. या ठिकाणी बांधण्यात आलेले बुरुज वेगवेगळ्या आकारात आहेत.

त्यातील एका बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो बुरुज किल्ल्याच्या बाहेरील बाजूने पाहिल्यानंतर, हा बुरुज कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो. या बुरुजास “नऊ पाकळ्यांचा बुरुज” किंवा ‘नवबुरुज‘ असे म्हणतात. किल्ल्याच्या आतील बाजूने पाहिल्यानंतर, असे दिसते की, हा बुरुज दोन मजली आहे. किल्लेदार वाड्या जवळ हा बुरुज आहे.

नळदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील सर्वात आकर्षणाचे केंद्र म्हणजे ‘पाणी महाल’ पर्यटक खास आवर्जून या ठिकाणी येतात. किल्ल्यासाठी खंदक म्हणून बोरी नदीचा वापर करण्यात आलेला आहे. नदीचे पात्र वळवून किल्ल्यास खंदक तयार करण्यात आलेला आहे. या खंदकावरच दुसर्‍या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधलेला आहे.

या बंधार्‍याच्या एका बाजूला नळदुर्ग तर दुसर्‍या बाजूला किल्ल्याचा रणमंडळ आहे. या बंधार्‍याच्या आतमध्ये एक छोटा राजवाडा बांधलेला आहे.पावसाळ्यामध्ये पाणी महाल पाहण्यासाठी पर्यटक जास्त गर्दी करतात. पावसाळ्यामध्ये खंदकावरील बंधारा पूर्ण भरल्यानंतर पाणी ह्या बंधार्‍यावरुन वाहते, आणि याच वैशिष्ट्य म्हणजे हा बंधारा आतील बाजूस असलेल्या राजवाड्यामध्ये याचे पाणी जात नाही.

अत्यंत कोरीव दगडी बांधकाम आणि महालाच्या दोन्ही बाजूंनी कृत्रिम पद्धतीनं सोडण्यात आलेले दोन सांडवे. या दोन्ही सांडव्यातून पावसाळ्यात ६५ ते ७० फूट उंचीवरुन पाणी खाली कोसळतं. याला नर-मादी धबधबा म्हणतात. पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा आता वर्षभर वाहता राहण्याची व्यवस्था सुरु केली आहे.

नळदुर्गच्या किल्ल्याचा परिसर खूप मोठा असल्यामुळे, या किल्ल्याच्या परिसर पाहण्यासाठी खूप वेळ लागतो. सोलापूर पासून नळदुर्ग हा ५० किमी अंतरावर आहे. सोलापूर – हैदराबाद रस्त्यावरच नळदुर्ग गावात हा किल्ला आहे. तर तुळजापूर पासून नळदुर्ग ३५ किमी अंतरावर, तर उस्मानाबाद पासून ५० किमी अंतरावर आहे.

No comments:

Post a Comment