वैभव महाराष्ट्राचे!
मांडकी गावात असलेला
एक अपरिचित गिरीदुर्ग माणिकदुर्ग! पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी सर यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. प्राचीन काळी पालशेत बंदरात उतरलेला माल घाटमार्गाने कऱ्हाडच्या बाजारपेठेत जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी माणिकदुर्गची योजना करण्यात आली असावी. विजयनगरच्या साम्राज्यात माणिकदुर्ग हा किल्ला होता. पवर नामक व्याक्तीच्या ताब्यात होता. माणिकदुर्ग भटकंतीसाठी चिपळूण मधून महामार्गावरील सावर्डे गाठायचे, पुढचा प्रवास सावर्डे रेल्वे स्टेशन पासून पुढे मांडकी गाव व तेथून दुर्गाचे रान! माणिकदुर्गाची चौकशी केली असता. किल्ला नाही असे स्पष्टपणे सांगीतले जाते. पण चौकशी करण्याचे सोडायचे नाही, मार्ग मिळतोच! गावातच हनुमंताचे मंदिर आहे, मंदिर खुपच विशाल आहे. मंदिरा बाहेर खुप मोठी पडवी आहे. रहाण्याची सोय होते. गावातील गणेश मादगे व प्रमोद मादगे हे दोघेही गडाबद्दल माहीती देतात, तसेच माणिकदुर्ग जंगलाने वेढलेला असल्यामुळे त्यांना सोबतीला घेऊन जाणेच योग्य ठरते.दुर्गाचे रान गावातून गडाच्या दिशेने गेल्यावर एक कच्चा रोड डोंगराकडे जातो. त्या रोडने पुढे गेल्यावर रस्ता संपतो, तेथे दोन वाटा फुटतात. त्यातील डावीकडील वाट एका ओढ्यात उतरते. त्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर वाट पांदीतून जाते. वाटेच्या दोन्ही बाजूस दगडी कंपाऊंड आहेत. तशीच वाट डोंगर धारेवर चढते, तेथे कारवी कमी आहे. धारेवर चढून उजवीकडे वळून वाट चढणीला लागलो. पुढे वाट डोंगर टोकावरून दोन विरूध्द बाजूस जाते. जीथे दोन वाटा फुटतात तेथेच माणिकदुर्गाचे एक टोक आहे. आपण उजवीकडील वाट पकडून चालावे. वाटेच्या डाव्या बाजूस डोंगर कड्यावर दोन कोरडी गुहा पाणीटाकी आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्यातील दुसऱ्या टाक्याच्या कमानीवर यक्ष प्रतीमा कोरलेल्या आहेत. त्यांची खुपच झीज झालेली आहे. त्या मुळे मुर्ती निट ओळखता येत नाहीत. तसेच त्या टाक्याच्या पुढे कातळात कोरलेले शिवलिंग पहायला मिळते. महादेवाचे दर्शन करून पुढे निघावे. टाकी पाहून पुढे तिरप्या चढाईने माणिकदुर्गाच्या माथ्यावर पोहोचावे.
गडाच्या माथ्यावर खुप झाडी आहे, तसेच गडावर गवत
खुपच वाढले असते. एका ठिकाणी घसरगुंडी करून सुकाई देवीच्या मंदिरा पाशी
पोहोचावे. मंदिराचे बांधकाम नव्याने केलेले आहे. मंदिरात देवीची मुर्ती
आहे. तसा मंदिराचा आकार खुपच लहान आहे. देवीचे दर्शन घेवून तसेच पुढे
निघावे. मंदिर हे गडाच्या दुसऱ्या टोकावर आहे. पुढील डोंगर रांगा पाहून
पुन्हा मागे फिरावे. आल्या वाटेने थोडे मागे जावून जेथे घसरगुंडी केली
होती, तो भाग खोलगट आहे. त्यातूनच डावीकडे वळून कड्यामधे काहीशा अवघड
ठिकाणी असलेल्या गुहेची वाट काढत निघावे. सोबत आधारासाठी दोर ठेवणे
महत्वाचे! गवत वाढल्यामुळे कडा किती तिरपा आहे हे जाणवत नाही. आता गडाचा
कातळ आपल्या उजव्या हाताला असतो. म्हणजे या गुहा व पाणीटाकी गडाच्या एकाच
बाजूस अाहेत. एका सरळ रेषेत तीन गुहा आहेत. पहिला थोडी मोठी, तर दुसरी
अगदीच लहान आणि तीसरी खुपच मोठी आहे. तीसऱ्या गुहेत एक खांबही आहे, अगदी
लेण्यात असतो तसा! पण पडझडीमुळे त्यावरील नक्षीकाम नाहीसे झाले आहे. तेथून
उजवीकडील सरळ जाणारी वाट पकडून जाताना लागलेल्या वाटनाक्यानर पोहोचावे.
साधारणपणे ५७८ मीटर समुद्र सपाटीपासून उंचावर असलेला हा गड दुर्गेचा डोंगर
या नावानेही ओळखला जातो.
किल्ले माणिकदुर्ग, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment