मुळा नदिच्या खोऱ्यात सह्याद्रीच्या बालाघाट व घनचक्कर या दोन उपरांगा पसरलेल्या आहेत. या रांगेत हरिश्चंद्रगड हा बलाढ्य किल्ला आहे, तर कुंजरगड, भैरोबा दुर्ग, कलाडगड, भैरवगड व पाबरगड त्याचे पहारेकरी आहेत. या दुर्गांची भ्रमंती करायची म्हणजे छातीचा भाता तपासल्या सारखे आहे. समुद्र सपाटी पासून ११४९ मीटर उंचीचा भैरवगड हा गिरीदुर्ग घनचक्कर डोंगर रांगेवर वसला आहे. भैरवगडाला ‘शिरपुंजाचा भैरवगड’ असेही म्हणतात. गड भटकंतीसाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे बोटा - कोतुळ - राजूर गाठायचे. राजूर वरून माणिक ओझर मार्गे शिरपुंजे गावात यायचे. गावठाणातून रोड गडाच्या पायथ्याशी जातो. पायथ्याला गडाची कमान व काही पायऱ्या लागतात. येथे वनखात्याने विसाव्या साठी लोखंडी छत्र्या उभारलेल्या आहेत. येथून पुढे खड्या चढाईने व नागमोडी वळणे घेत भैरवगड व घनचक्कर यांच्या मधील खिंडीत जायचे. मधे दोन ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या लागतात व काही ठिकाणी रोलिंग बसविलेले आहे. खिंडीतून अंगावर येणाऱ्या पायऱ्या चढून गडप्रवेश होतो. याच बाजूस गडाची तटबंदी व पडका दरवाजा आहे. खिंडीत वाऱ्याचा प्रवाह येवढा जोरात असतो की साधे उभे रहाणे सुद्धा कठिण होते.
तुटक्या तटबंदीतून गडावर प्रवेश केला की समोर अर्ध
वर्तुळाकारात चार टाकी आहेत. याच्या डावीकडील टेकडात गुहेतील पाणीटाके आहे.
पिण्यासाठी योग्य असलेले पाणी बाराही महीने उपलब्ध असते. या टाक्याच्या
बरोबर समोर दुसरे टेकाड आहे. या दोन्ही टेकाडा मधील घळीत पाण्याची
चौरसाकृती चार टाकी व भैरवनाथाची गुहा आहे. या दोन गुहे पैकी एक मुक्कामा
साठी योग्य असून, दुसऱ्या गुहेत साधारण सहा ते सात फूट कातळकोरीव, अश्वारूढ
भैरवनाथाची अखंड मुर्ती आहे. या गुहेपासून कड्यात खाली अजून एक गुहा आहे.
तीच्या पर्यंत जाणाऱ्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. भैरवनाथाच्या गुहेकडे पाठ
केलीकी समोरील टेकाडावर एक प्रशस्त गुहा असून तीचा प्रवेश मार्ग खूपच छोटा
आहे. शेजारी पाण्याची चार टाकी आहेत. या टाक्यांच्या अगदी डोक्यावर गुहा
लेणे आहे. यात शंकराची पिंड असून पाणी आहे. गुहेच्या खांबावर नक्षीकाम
केलेले आहे. भगवान शमकराचे दर्शन घेउन टेकडीच्या माथ्यावर असलेल्या
वेताळाचे दर्शन घ्यायचे. वेताळा पासून पुढे पाण्याची चार टाकी आहेत. पुनः
मागे फिरून घनचक्कर कडील बाजूस असलेली पाण्याची वेगवेगळी चार टाकी पहायची.
भैरवगडाचे एक वैशिठ्य आहे, ते म्हणजे या गडावर पादत्राणे चालत नाहीत. येथे
दर रविवारी भाविकांची गर्दी असते. अनवाणी पायानेच भाविक गडफेरी करतात.
भैरवगडावरून कलाडगड, भैरोबा दुर्ग, कुंजरगड, हरिश्चंद्रगड असा मनमोहक परिसर
दिसतो.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment