Followers

Monday, 18 May 2020

मराठ्यांची शस्त्रास्त्रे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात कशी पोचली?

Maratha Arms, Armour & Artillery






मराठ्यांची शस्त्रास्त्रे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात कशी पोचली?

हा प्रश्न आमच्या अनेक मित्रांनी या पेजच्या माध्यमातून आम्हाला विचारला, म्हणून हा लेखन प्रपंच.

मुळात, हा प्रश्नच अयोग्य ठरतो.

का? तर त्याचे कारण असे हे संग्रहालय मुळात अस्तित्वात नव्हते त्यामुळे मराठ्यांची शास्त्रात्रे संग्रहालयात पोचली नसून, मुळात हे संग्रहालयच या आपल्या शस्त्रास्त्रांमुळे उभे राहिले!

ऐकून आश्चर्य वाटले? होय, हे जगप्रसिद्ध आणि जगातील प्रमुख संग्रहालयांपैकी एक असलेले व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय आपल्या शास्त्रास्त्रांच्या जोरावर उभे राहिले.

१८व्या शतकाच्या अखेरीस भारतातल्या अनेक संस्थानिकांनी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे संरक्षण घेत त्यांचे मांडलिकत्व पत्करले. १८१८ साली तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर मराठ्यांचे अनेक किल्ले आणि ठाणी ताब्यात घेत इंग्रजांनी भारताचा ताबा मिळवला. पण, तरीही अनेक टोळ्या आणि काही संस्थानिक स्वातंत्र्यासाठी धडपडत होत्या. शीख, कोल्हापूर गडकरी आणि सावंतवाडी १८४० च्या दशकपर्यंत लढले.

मराठे कधीही उठाव करू शकतात आणि सत्ता पालट करण्याची त्यांची क्षमता जाणून, इंग्रजांनी ह्यावर काय तोडगा काढावा यावर खल सुरू केला. दरम्यान, अमेरिका, फ्रान्स आणि अन्य देशांनी आपापल्या देशातील शस्त्रे आणि इतर राजेशाही साहित्यांची प्रदर्शने भरवली होती. ब्रिटन मधेही असे प्रदर्शन भरवावे, शिवाय इंग्रजांचे राज्य जगातील अर्ध्या-अधिक देशांवर होते त्यामुळे ते अधिक भव्य होईल यावर एकमत झाले.

इंग्लंडचा राजा प्रिन्स अल्बर्ट याला ब्रिटनच्या खासदारांनी भारतातील परिस्थितीची माहिती दिली. तेव्हा, या प्रदर्शनाच्या निमित्ताने भारताची अस्मिता असलेली शस्त्रास्त्रे आणि इतर राजशाही साजोसामान लंडनला आणले जावे असे ठरले. याने दोन हेतू पूर्णत्वास जाणार होते. एक, जगासमोर ब्रिटनच्या साम्राज्यातील संपदा जगाला दिपवून टाकणार होती, दुसरे, भारतीय आणि विशेष करून मराठ्यांची शास्त्रात्रे दूर करून त्यांना निःशस्त्र करता येणार होते.

१८५१ साली लंडनच्या हाईड पार्क येथे भव्य प्रदर्शन भरावण्यासाठी अवाढव्य काचेचा महाल उभारण्यात आला. यात, ब्रिटनच्या साम्राज्यातील २८ देशांचे जिन्नस मांडण्यात आले. यात सर्वात मोठे दालन होते ते भारतासाठी! आणि या भारतीय दालनात अर्धीअधिक व्याप्ती होती ती मराठ्यांच्या शास्त्रास्त्रांची! या प्रदर्शनात सर्वाधिक गर्दी झाली ती पण याच दालनात.

१ मे १८५१ रोजी प्रदर्शनीचे उदघाटन राणी व्हिक्टोरियाच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनीला चार्ल्स डिकेन्स, चार्ल्स डार्विन, लॉर्ड टेंनिसन, विलियम ठाकरे आणि सॅम्युएल कॉल्ट या दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. विमान सेवा नसणाऱ्या त्या जमान्यात जगभरातील ६० लाख लोकांनी या प्रदर्शनीत सहभागी झाले होते. साधारण ३ महिने चालवण्याचा बेत असलेले हे प्रदर्शन तब्बल साडेपाच महिने चालले.

ब्रिटन हे "एक राजा, एक साम्राज्य" अशी नवी व्यवस्था जगात आणत आहे आणि त्याचा मुकुटमणी आहे भारत, असे या प्रदर्शनातून जगासमोर विचार मांडण्यात आला. या प्रदर्शनाला अनेक देशांच्या पाहुण्यांनी आणि पत्रकारांनाही हजेरी लावली होती. "इंग्रजांचे साम्राज्य सर्वात मोठे, वैभवशाली आणि बलशाली असून, भारत हा त्याचा मुकुटमणी आहे. औद्योगिक क्रांती युरोपात येण्याआधीही भारतात धातूशास्त्र, वस्त्रोद्योग आणि कलाकुसर पारंपरिक असून देखील प्रगत आहे" अशा प्रकारची टिप्पणी रशियाच्या पत्रकारांनी केली होती.

या प्रदर्शनाचे यश पाहून प्रिन्स अल्बर्टला ही प्रदर्शनी स्थायी स्वरूपात कायम करण्याची इच्छा झाली. यातून, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाची निर्मिती झाली. केंसिंगटन स्कुल ऑफ आर्ट ही उभे राहिले. ही प्रदर्शनी बघायला भारतातून अनेकांसारखे सर जमशेटजी जिजीभोय गेले होते, त्यांनी परत भारतात आल्यावर मुंबईत जेजे स्कुल ऑफ आर्टची स्थापना केली.

तर, मित्रानो या प्रदर्शनीच्या सर्वात मोठे योगदान होते ते भारताचे आणि भारताच्या सहभागात सिंहाचा वाटा होता तो मराठ्यांच्या शस्त्रास्त्रांचा! आजही एक स्वतंत्र दालन मराठा शस्त्रास्त्रांना देण्यात आले आहे. मराठ्यांची शस्त्रास्त्रे संग्रहालयात पोचली नसून उलट हे नामांकित संग्रहालय भारताच्या-मराठ्यांच्या जिन्नसांच्या जीवावर उभे राहिले आहे!

टीप: विषय मोठा आहे, वेळ आणि जागे अभावी इथे थोडक्यात मांडला आहे.

© Maratha Arms, Armour & Artillery

No comments:

Post a Comment