Followers

Saturday, 16 May 2020

पद्मदुर्ग किल्ला...

जंजिरा किल्याच्या समोर दिसणारा महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला नामोहरम करण्यासाठी बांधलेला
पद्मदुर्ग किल्ला...
मराठी बखरीत सिद्धीचा उल्लेख "सिद्धी तो केवळ उंदीर...  जैसे घरी उंदीर मारक तैसे दौलतीस सिद्धी पानउंदीर अत्यंत त्रासदायक"
महाराज्यांना हे माहीत होतं की, "जायच्या जवळ आरमार तयाचा समुद्र"
जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले.
सिद्धी हे मुळातले आफ्रिका खंडातील सोमालिया, केनिया, टांझानिया या देशाती निग्रो लोक. ते सुल्तानाबरोबर भारतात आले.
त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला. सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. 1675 च्या आसपास किल्याची बांधणी पूर्ण झाली. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला."
सुभांजी मोहिते हे किल्याचे पाहिले किल्लेदार होते

येथील एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदली आहे, ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लाय पाटलांनी धाडसाने जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरपंतांना साह्य केले होते. पाटलांनी रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागील बाजूस पद्मदुर्गावरून येऊन तटबंदीला शिड्या लावण्याचे धाडस केले होते. तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षाव्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते; पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला; पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना, एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ असे ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्याकिनारीची सरपाटीलकी दिली. पद्मदुर्गावर जाण्यासाठी दंडाराजपुरीचे कोळी लोक नावा किंवा यांत्रिक बोटीने समुद्राचे वातावरण पाहून घेऊन जातात.
मध्यंतरी हा किल्ला सिद्धी ने जिंकून घेतला, बराच काळ सिद्धीचा ताब्यात राहल्यानंतर 2 डिसेंबर 1759 मध्ये मराठा दफ्तरातील उल्लेखाप्रमाणे कान्होजी आंग्रे यांचे नातू सरखेल राघोजी आंग्रे यांनी हा किल्ला सिद्धांकडून जिंकून घेतला.
 कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, पडकोट म्हणजे बालेकिल्ल्याला घेरून किल्याच्या संरक्षणासाठी बांधलेला घेरा होय. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.

या किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आह. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य माणसाला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून मुख्य किल्ल्याकडे गेल्यावर पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला दिसतो.

पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार पाच पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्यासाठी चार टाकी केलेली दिसतात.
किल्ला इतर किल्यापेक्षा बराच स्वच्छ आहे, किल्यावर ओतीव बांधणीच्या तोफा आहेत.
तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.
असा हा कामळासारखा फुललेला पद्मदुर्ग...

हर हर महादेव🔱 जय शिवराय...🚩🚩

No comments:

Post a Comment