वैभव महाराष्ट्राचे!
गर्भगिरी डोंगर रांगेत मांजरसुभा उर्फ मांजरसुंबा हा गिरीदुर्ग आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे. त्याच्या भटकंती साठी पुणे - रांजणगाव - शिरूर - सुपा असा प्रवास करत अहमदनगर गाठावे. अहमदनगर शहरातून बाहेर पडून संभाजीनगरला (म्हणजेच खिडकी नंतरचे नाव औरंगाबाद) जाणाऱ्या महामार्गावरील पोखर्डी गावात यावे. पोखर्डी गावापासून डावीकडे वांबोरी गावाला एक रोड जातो. तेथे एक कमान आहे त्यावर श्री चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, आदर्शगाव मांजरसुंबा ता. जि. अहमदनगर, सर्व नाथक्तांचे हार्दिक स्वागत!' असे लिहीले आहे. डोंगरगन गावातून वांबोरी घाटात पोहोचायचे, घाटातून गर्भगिरी रांग आणि मांजरसुभा किल्ला यांचा अप्रतिम नजारा डोळेभरून पाहायचा. आपण घाटाच्या वर असल्यामुळे या बाजूने गडाच्या डोंगराची उंची जेमतेम दिसते. गडाकडे जाताना सुरूवातीस दिसले ते हनुमंताचे मंदिर! मंदिर ज्यावर बांधले आहे, ती भिंत ही तटबंदीचा एक भाग असावा. कारण मंदिराच्या दोन्ही बाजूस खोलवर नैसर्गिक दरी गडाला अर्धवर्तुळाकार वेढा मारत आलेली आहे. दरीची टोके ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथेच ही भिंत बांधलेली आहे. या भिंती समोरच मातीत बुजलेला चुन्याचा घाना दिसतो. मंदिरात काळी कुळकुळीत हनुमंताची मुर्ती आहे. गडाच्या पदरात घरांची जोती आहेत. त्याच्या जवळच गडाच्या बाजूला एक छोटी विहीर आहे, यात पाणी आहे. पुरातन शिवमंदिर असून मंदिरा समोरील नंदी ही अप्रतिम आहे.
अहमदशहाने इमाम घाटात बहामनी सैन्याचा दारूण पराभव केला. ह्या विजयात मोलाचा वाटा या परिसराचा होता म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी अहमदशाहने निजामशाहीची स्थापना करून एका शहराची निर्मिती केली. तेच हे ऐतिहासिक शहर अहमदनगर! प्रथम शिवनेरी ' किल्यावर असणारे आपले ठाणे बदलून त्याने नवीन राजधानीला अहमदनगर ' असे नामकरण केले. आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी शहराजवळील प्रमुख डोंगरांवर टेहळणी बुरूज आणि लहान किल्ल्यांची उभारणी केली. त्यात मांजरसुंबा किल्ल्याचा समावेश आहे. इ. स. १६३६ सालापर्यंत अहमदनगरची निजामशाही अस्तित्वात होती. निजामशाहीच्या काळात मांजरसुभा किल्ल्यास खुप महत्व होते. गडाचे प्रवेशद्वार पश्चिम मुखी असल्यामुळे तेथून श्री चैतन्य गोरक्षनाथ गड अप्रतिम दिसतो. दरवाज्याचे बांधकाम मजबूत असून त्याच्या बाहेरील बाजूस सैनिकांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारे बांधकाम चौरसाकृती असून आत सैनिकांना रहाण्यासाठी दालने आहेत. दालनाला झरोके सुद्धा आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून काटकोनात वळून दुसऱ्या दरवाजातून गडावर जाता येते. छतावर जाण्यासाठी आतून एक जिना ही आहे. दरवाज्यापासून अजून दक्षिण टोकाकडे गेल्यावर घरांची तीन जोती, तटबंदी आणि खालची दरी पहायला मिळते. राजवाड्याच्या पायऱ्यांच्या डावीकडे चार चौथरे बांधलेले आहेत. तसेच दोन घरे असून त्यातील एकाचे छत चांगल्या अवस्थेत आहे. त्या घराला दोन खोल्या असून त्यांच्या छताला दोन मोठी भोके ठेवलेली आहेत. तसेच त्यात एक शौचकुपही आहे. वाड्याच्या इमारतीचे दोन मजले दिसतात. काटकोनात दोन भिंती उभ्या आहेत. या वाड्यातील लाकडी तुळया आजही बघण्यासारख्या आहेत. आत पडका जिना, तळघर, झरोके, ड्रेनेज लाईन तसेच दोन दालने दिसतात. त्यातील एका दालनाचे दोन दरवाजे बंद करून आत दर्गा बांधला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार निजामशाहीतील एका राणीचे ते थडगे आहे. तर दुसऱ्या दालनाचे तीनही दरवाजे उघडे आहेत. पुरातन काळात या ठिकाणी एक अप्रतिम कारंजे उडत असल्याचे पहायला मिळते. वाड्यापासून थोड्याच अंतरावर तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. वाड्याच्या पुर्वेस वाड्याला लागूनच भलामोठा आयताकृती हौद बांधलेला आहे. त्यात उतरण्यास दोन्ही कोपऱ्यात अर्धवर्तुळाकार पायऱ्या बांधलेल्या आहेत.
तालावा जवळच एका घराची फक्त कमानच शिल्लक राहिलेली आहे.
त्याच्या पुढे एकदम उत्तर टोकावर गडाचे मुख्य आकर्षण आजही चांगल्या अवस्थेत
आहे. पाण्यासाठी केलेली एक अफलातून व्यवस्था! म्हणजेच मोटेची विहीर किंवा
हत्तीमोट . कड्यावर बांधलेल्या दोन मजली इमारतीत मोट बसवून तीचा वापर
किल्ल्यावर पाणी भरण्यासाठी केला जात असे. किल्ल्यातला हा एक अतिशय दुर्मिळ
शोध आहे. इमारतीत उतरण्यासाठी जिना आहे. समोर मोठी कमान असून यातून
उत्तरेकडील फारमोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. या कमानीजवळच दोन
फुटाचे चौकोनी बिळ आहे, यात खाली उतरण्यासाठी दोन पायऱ्या लावलेल्या आहेत.
इमारतीच्या खालच्या मजल्यावर मोट ठेवायची किंवा दुरूस्त करायची जागा
असावी. मोटेचा आसरा घेऊन शत्रू सैन्य गडावर येऊ नये म्हणून हे प्रयोजन! या
इमारतीच्या खाली उत्तर कड्याला पाण्याची टाकी कोरलेली आहेत. त्यांच्याकडे
जाण्यासाठी इमारती पासून काही अंतरावर एक छोटा आणी गडाचा दुसरा दरवाजा
बांधलेला आहे. कड्यावर बुरूज तटबंदीचे मजबूत बांधकाम करून खाली उतरायला
पायऱ्या बांधलेल्या आहेत. डोंगराच्या पोटात खोलवर टाकी कोरलेली आहेत. एकूण
आठ टाकी असून सगळी टाकी प्रशस्त आहेत. त्यांना आधारासाठी दगडी खांब तसेच
चिरे रचून तयार केलेले कृत्रिम खांब ही बांधलेले आहेत. यातील सहाव्या
टाक्याचे तोंड मोठे असून याच्यातूनच मोटेने पाणी गडावर खेचले जात होते.
खालच्या बाजूने वर बांधलेली मोटेची इमारत काय सुंदर दिसते. हि स्थापत्य कला
तोंडात बोट घालायला भाग पाडते. टाक्यांपासून खाली उतरण्यासाठी कातळ कोरून
वाट बनवलेली आहे. ब्रिटिश काळातील कागदपत्रांमध्ये मांजरसुंबा किल्ल्याचा
उल्लेख आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या गडाची अपेक्षित दखल घेतली गेली
नासल्यामुळे स्थापत्यकलेचा हा अप्रतिम खजिना लुप्त होत चालला आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment