वैभव महाराष्ट्राचे!
कळवण पासून जवळच एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. एकलहरे गावातून हिंगुळवाडीला गाडी मार्ग आहे, हिंगुळवाडी गडाच्या पायथ्याशी आहे. समुद्र सपाटीपासून ८१० मीटर उंचीचा हा गिरीदुर्ग पुर्व पश्चिम पसरलेला आहे. प्रेमगिरी फारसा उंच नसला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढमीची पण घसाऱ्याची पायवाट आहे. हिंगुलवाडीतून चालत गडाच्या पुर्वेस असलेल्या टोकापासून उतरणाऱ्या धारेवर चढायचे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फूटाचा कातळ टप्पा चढून जावे लागते. गडमाथ्यावर पोहोचल्यावर लांबलचक पसरलेला माथा दिसतो. गडाच्या पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर सुरूवातीस घरांची दोन तीन जोती दिसतात. बरेच अंतर माथा तुडवल्यावर एका उंबराच्या झाडाखाली विराजमान असलेले शिवलिंग आणी नंदी महाराज दर्शन देतात. झाडाच्या छायेतच बांधलेले छोटेसे पुरातन मंदिर दिसते. मंदिरात हनुमंताची सुंदर मुर्ती पहायला मिळते. इतर गडावरील हनुमंत मुर्ती पेक्षा ही मुर्ती जरा वेगळीच आहे. हनुमंताच्या दर्शनास पंचकृषीतील भाविक गडावर येत असतात.
हनुमंत मंदिराच्या शेजारीच काही अंतरावर रामकुंड आणी
सीताकुंड नावाची पाणी टाकी पहायला मिळतात. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य
नाही. गडाच्या उत्तर टोकास कातळकोरीव पायऱ्यांची वाट दिसते, हा गडाचा
राजमार्ग! एकलहरे गावातून प्रेमगिरी आणी इंग्रमाळ यांच्या मधील खिंडीत
मळलेली पायवाट येते. खिंडीतून गडचढाई करताना शेवटच्या टप्प्यात कातळात
कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांवर एका अरूंद कपारीला शेंदूर लावलेला
दिसतो. मात्र दरवाजा आणी तटबंदीचे अवशेष कोठेही दिसत नाहीत. गडाचा वापर
टेहळणीसाठी करत असावेत. प्रेमगिरी वरून दक्षिणेस अजिंठा सातमाळ रांगेतील
गडकोटांचे उत्तर दर्शन होते. सप्तशृंगी, मार्कंड्या, कन्हेरगड, जवळ्या,
रावळ्या, धोडप, इखारा हा सर्व परिसर अगदी जवळ दिसतो. शेजारचा इंद्रमाळही
लक्ष वेधून घेतो.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment