Followers

Monday, 18 May 2020

किल्ले हरिहर

वैभव महाराष्ट्राचे!

त्र्यंबकेश्वर रांगेतील हरिहर उर्फ हर्षगड हा गिरीदुर्ग गिर्यारोहकांचे कायमच आकर्षण राहिले आहे. नविन पुणे - नाशिक हायवनेे सुसाट नाशिक गाठावे. नाशिक सिटीतून त्र्यंबकेश्वर मार्गे पाहिने गावाच्यापढे असलेल्या निरगुडपाडा गावी पोहोचावे. निरगुडपाडा गावची कोठमवाडी वाडी हे किल्ले हरिहरगडाचा पायथा आहे. हरिहरचा ट्रेक सुरू करून फणी व हरिहरगड यांच्या मधे असलेल्या डोंगराचा माथ्या गाठायचा. समोर दिसणारा हर्षगड पाहून गिर्यारोहक मंडळी काही वेळासाठी मंत्रमुग्ध होतात. गडाच्या पहिल्या टप्प्यावर असलेल्या देवाला वंदन करून हरिहरगडास साष्टांग दंडवत घालून समोरील निसरड्या तीव्र चढाईवरून चालत गडाच्या कातळाला भिडायचे. सुरवातीस झाडाच्या मुळीचा आधार घेत फ्री रॉक क्लायंबीग करत कातळकोरीव पायऱ्यांना भिडावे. आंगावर येणाऱ्या सरळसोट पायऱ्या पाहतानी आपण उलटे खाली पडतो की काय असे वाटते. हरिहर गडाच्या या मुख्य आकर्षणाच्या मोहपायी कायमच ट्रेकर्स लोकांची गडावर वर्दळ असते. या पायऱ्या चढतानी एका वेळस एकच जन वर चढू शकतो किंवा खाली उतरू शकतो. पायऱ्या चढून गडाच्या एकमेव दरवाजातून गडप्रवेश केल्यावर समोर कातळावर कोरलेल्या गणेशाच्या सुंदर मुर्तीचे दर्शन होते. तेथून पुढे असलेली कातळकोरीव अर्धवर्तुळाकार बालकणी (ट्रायव्हर्स) चालताना ज्या अज्ञात शिल्पकाराने कोरली त्याचे मनोमन कौतुक करावेच लागते. पुढे इंग्रजी ‘Z' अाकारात कोरलेल्या अफलातून पायऱ्या चढून कातळकोरीव दुसऱ्या भुयारी दरवाजातून चढाई करून शेवटच्या बांधील तीसर्‍या दरवाजातून गडाच्या माथ्यावर प्रवेश होतो.

हरिहरगडाचा पुर्वी वापरात असलेला दरवाजा बंद आहे. त्यास आजकाल कैद्यांचा तुरूंग म्हणून दाखवतात, परंतू कातळात कोरलेल्या त्या सुंदर दरवाजा पर्यंत जाणारी कातळातील वाट कडा तुटल्यामुळे पुर्णपणे उध्वस्त झाली आहे. तेथून पुढे छोट्याश्या दोन गुहा लागतात व तसेच समोर गेल्यावर पाण्याची तीन प्रशस्त टाकी दिसतात. टाक्यांच्या पुढे हनुमंताचे छोटेसे मंदिर आहे व जवळच शंभूमहादेवाच्या दोन पिंडी आहेत. त्यास लागूनच गडावरील प्रशस्त तळे आहे. तळ्याची कड्याकडील बाजू पुर्णपणे बांधलेली आहे. तलावाच्या शेजारीच दोन समाधी चौथरे ही आहेत. तळ्यापासून पुढे ब्रम्हा कडे जाताना डावीकडे दुसरे सुकलेले तळे आहे. पुढे एक पुरातन वास्तू पुर्णपणे चांगल्या अवस्थेत आजही इतीहासाची साक्ष देत आहे. बहूधा हीचा उपयोग दारू कोठार म्हणून करत असावेत. तीला लागूनच पाण्याची छोटीशी चार टाकी एका सरळ रेषेत आहेत. ही वास्तू पाहून गडाचे सर्वोच्च ठिकाण असलेला एका सुळक्याकडे मोर्चा वळवावा. सुळक्याची चढाई चांगलीच अंगावर असून खुप निसरडी आहे. पुढे साधारणपणे २० ते २५ फुटाचा कातळ फ्री क्लायिंब केला की सुळक्याच्या माथ्यावर विराजमान होतो. सुळक्याच्या माथ्यावरुन त्र्यंबकेश्वर रांगेचे विलोभनीय दृश्य नजरेत भरते. उतवड या सुळक्यासमान डोंगरापासून सुरू होणाऱ्या त्र्यंबकेश्वर रांगेत पुढे भास्करगड उर्फ बसगड दिसतो. बसगडच्या पुढे फणी हा दुसरा सुळका दिमाखात उभा आहे. तेथून पुढे हरिहरगड आहे, रांगेत पुढे पुर्वेस ब्रम्हा हा डोंगर दिसतो. ब्रम्हाच्या पुढे ब्रम्हगिरी उर्फ श्रीगड हा किल्ला आहे. याच्या पायथ्याशी बारा जोर्तिलिंगातील त्र्यंबकेश्वराचे सुंदर मंदिर आहे. त्याच्या पुढे पवनपुत्र हनुमंताचे जन्म ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेला अंजनेरी किल्ला आहे. तर त्याच्या पुढे या रांगेतील शेवटचा रांजणगिरी हा किल्ला दिसतो. तसेच अजूबाजूच्या परिसरात वैतरणा धरण, वाघेरा किल्ला, पाहिने नवरा नवरी सुळके दिसतात. जर वातावरण स्वच्छ असेलतर दक्षिणेस कळसुबाई रांगेचे दर्शन होते.

हा सुंदर नजारा काळजात साठवून गडाच्या माचीवर असलेले शंभू महादेवाचे मंदिर व त्याच्या समोरील अप्रतिम बांधील टाके पहाण्यासाठी गडाच्या पुर्वेस निघायचे. हा परिसर नितांतसुंदर व शांत आहे, टाक्यावर असलेले गणेशाचे शिल्प व शिलालेख दोन्ही अप्रतिम आहे. टाक्यातील पाणी पिण्यास सुमधूर आहे.

किल्ले हरिहर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment