वैभव महाराष्ट्राचे!
मुळा नदिच्या खोऱ्यात आणि सह्याद्रीच्या बालाघाट रांगेत नावात साधर्म्य असलेले भैरवगड (शिरपुंजे) आणी भैरोबा दुर्ग (कोथळे) असे दोन गिरीदुर्ग वसलेले आहेत. हरिश्चंद्रगडाच्या अगदी जवळ हा भैरवगड उर्फ भैरोबा दुर्ग आहे. गडाच्या पायथ्याशी कोथळे गाव असल्यामुळे तसेच गावाजवळ असलेल्या शिखरासारख्या डोंगराला ‘कोथळा’ असे म्हणत असल्यामुळे या गडाला कोथळ्याचा भैरवगड असेही म्हणतात (उंची - १०५० मीटर समुद्र सपाटी पासून). भैरोबा दुर्गाला जाण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे बोटा - कोतुळ - राजूर गाठायचे. राजूर वरून माणिक ओझर मार्गे खडकी वरून कोथळे गावात यायचे. कोतुळ वरून विहिर मार्गे सुध्दा कोथळ्याला येता येते. कोथळे गावतून विहिर कडे जाणाऱ्या रोडला तोलारखिंडी कडे जाण्यासाठी डावीकडे फाटा फूटतो. येथूनच एक चांगली मळलेली वाट भैरोबा दुर्गावर जाते. खिरेश्वर कडूनही तोलारखिंडी मार्गे चालत भैरोबा दुर्गास जाता येते.
भैरोबा दुर्गाच्या सभोवती दाट झाडी आहे. पायवाट रानातील एका छोट्या घरापासून जंगलात शिरते. एक घळ भैरोबा दुर्गावरून सरळ झाडीत उतरते, वाट याच घळीतूव गडावर जाते. सुरूवातीला अंगावर येणारी चढाई व कातळकोरीव पायऱ्या चढून लोखंडी शिडी पाशी पोहचते. पुर्वी गड कठिण श्रेणीत होता, मात्र वनखात्याने बसविलेल्या लोखंडी शिड्यान मुळे तो सोपा झाला. समोरील पहिली शिडी चढून एका टप्प्यावर पोहचतो. येथे दोन गुहा आहेत. एकात बारमाही पाणी असून ते पिण्यास योग्य आहे. थंडगार पाणी पिऊन समोरील अतीउंच शिडीवर नजर टाकायची. पुर्वी येथे शिडी नव्हती तेंव्हा कातळातील कोरलेल्या अगदी छोट्या पायऱ्यांवरून साधारण ६० फूटांचा सरळ कडा चढावा लागत होता. आता मात्र शिडीवरून टपाटप वर चढून पुढील तिसऱ्या शिडीवरून गडप्रवेश होतो. गडप्रवेशा जवळ कातळकोरीव थोड्या पायऱ्या व छोटी तटबंदी नजरेस पडते. भैरोबा दुर्गाचा माथा सपाट व अगदीच अरूंद आहे. माथ्यावर तोलारखिंडीकडील डोंगरास जेथे गड जोडला गेला आहे त्यास देवाच गाढव"असे म्हणतात. या बाजूला पाच प्रशस्त टाक्यांचा समूह आहे. गडाच्या जवळपास मध्यावर दोन पाणी टाकी असून शेजारीच दोन दिपमाळा आहेत. भैरवनाथाच्या चौथऱ्याजवळ काही कोरीव दगडी मुर्ती आहेत. बस... संपला गड फिरून!
भैरोबा दुर्गावर
पादत्राणे घालून जाता येत नाही. येथे दर रविवारी भाविकांची गर्दी असते.
अनवाणी पायानेच भाविक गडफेरी करतात. भैरोबा दुर्गा वरून कलाडगड, कुंजरगड,
हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला, तोलारखिंड व शिरपुंजाचा भैरवगड असा
सह्याद्रीचा रांगडा परिसर दिसतो.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment