Followers

Monday, 18 May 2020

किल्ले पाबरगड

वैभव महाराष्ट्राचे!

भंडारदरा धरणाच्या भिंतीला अगदी चिटकून घनचक्कर डोंगर रांगेत दिमाखात उभा असलेला पाबरगड चटकन ओळखता येतो. समुद्र सपाटी पासून १३५० मीटर उंचीच्या या गिरीदुर्गस भैरोबाचा डोंगर असेही म्हणतात. पाबरगड आणी भंडारदरा धरणाचा नितांतसुंदर परिसर भटकंतीसाठी पुणे - संगमनेर - अकोले - राजूर - भंडारदरा असा गाडी मार्ग आहे. गडावर जाण्यासाठी गुहिरे, तेरूंगण, दऱ्याचीवाडी, मुथखेड या चारही दिशांच्या गावातून वाटा आहेत. या सगळ्या वाटेला अंगावर येणाऱ्या तिव्र चढाचा समोरा करावा लागतो. चार वाटांन पैकी दोन वाटा गडा समोरील मोठया टेकडीपुढे एकत्र येतात तर तीसरी वाटा गडाच्या पुर्वेस असलेल्या कातळ कोरीव पायऱ्यांन जवळ पहिल्या दोन वाटांना येवून मिळते. तर चौथी वाट गडाच्या पश्चिमेस असलेल्या खिंडीतून गडावर येते. पाबरगडा समोरील डोंगरावरून एक डोंगरसोंड गुहिरे गावामागे उतरते. धारेवरील वाटेने खड्या चढाईने गडासमोरील डोंगराच्या कातळाला जावून भिडावे. तेथे एक भगवा झेंडा अखंड फडकत आहे. तेथून पुढे डोंगराच्या कातळाला उजवीकडून वळसा मारत डोंगर व पाबरगड यांच्या मधील खिंडीत पोहचावे. वाट थोडी अवघडच असून वाटेवरून संपुर्ण पाबरगड व त्याला चिटकून असलेला छोटा सुळका व त्या मागे रतनगड, खुट्टा अप्रतिम दिसतात. खिंडीतून गडाच्या कातळावरू सावकाश चालत एका कपारी पाशी पोहचलो. येथून पुढे साधारण २० फुटाच्या कातळकडा आहे. त्यावर अगदीच लहान पायऱ्या कोरलेल्या आहेत. गडावरील भैरोबा देवाला महत्व असून शूज काढून गडावर जावे लागते. गडाच्या माथ्याला असलेल्या कातळकड्याला उजवीकडे दोन गुहा आहेत. पहिल्या कपारीत पाण्याचे कोरडे टाके आहे. पुढच्या कपारीत बारमाही पाणी असते. हे येवढेच पाणी पिण्यायोग्य आहे बाकी गडावर कोठेही पिण्यायोग्य पाणी नाही. त्या कपारीतच एका बाजूस शंकराची पिंड व नंदी कोरलेला आहे.

कातळकडा साधारण पणे २५ फुटाचा असेल. त्यावरील निंम्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. कातळकोरीव पायऱ्यांनी गडाच्या पडक्या बुरूजापाशी पोहोचावे. गडाच्या सुवर्णकाळात याच ठिकाणी गडाचा मुख्य दरवाजा असावा, मात्र आज त्याचा मागमुसही लागत नाही. बुरूजाचे जेमतेम दोनच थर शिल्लक आहेत. भैरोबाच्या छत नसलेल्या मंदिरात भैरोबाच्या शिळे जवळ बरेच त्रिशूल रोवलेले दिसतात. तर दारा समोर बऱ्याच घंट्या टांगलेल्या आहेत. तसेच डाव्या बाजूस श्रीगणेशाचे सुंदर शिल्प आहे. तसेच मंदिरा मागे पाच ते सहा पाण्याची कोरडी टाकी आहेत. दर्शन आटपायचे व जवळच असलेल्या गडाच्या सर्वोच्च माथ्या गाठायचा. तेथेही एक छोटेसे मंदिर होते. त्याच्या सभोवती खुप पांढरे व भगवे झेंडे लावलेले दिसतात, त्याचा अर्थ काही उमगत नाही. गडाच्या पश्चिम बाजूस पाण्याची चार टाकी व तीन घरांची जोती आहेत. भंडारदरा धरणाच्या बाजूस असणाऱ्या गडाच्या भुजेकडे निघावे. ही भुजा गडाला जेथे जोडली गेली आहे त्या ठिकाणी मुथखेल वरून येणारी चौथी वाट गडावर येते. या खिंडीत थोडीशी तटबंदी पहायला मिळते. पुढे भुजेवर दोन घरांची जोती व पाण्याचे एक विशाल टाके आहे. भुजेच्या टोकावरून भंडारदरा धरण व पाबरगडाचा छोटा सुळका छान दिसतो. ते पाहून माघारी फिरून पुन्हा भैरोबाच्या मंदिराकडे निघावे. वाटेत एका प्रशस्त टाक्यावर पवनसुताचे मोठे अप्रतिम शिल्प कोरलेले आहे. त्याच्या दर्शनास जाण्यासाठी कातळात अगदी छोट्या पायऱ्या आहेत. हनुमंताचे दर्शन घेवून पुन्हा भैरोबाच्या मंदिरापाशी यावे. गडाच्या उंचवट्याच्या डाव्या बाजूस घरांची बरीचशी जोती दिसतात. येथून घनचक्करची रांग, भंडारदरा धरण व परिसर, रतनगड, खुट्टा, कात्राबाई तसेच कळसूबाई शिखरासमवेत रांगेतील अलंग - मदन - कुलंगगड व पट्टा हे किल्ले दिसतात.

किल्ले पाबरगड, ता. अकोले, जि. अहमदनगर

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment