Followers

Monday, 18 May 2020

किल्ले शहागड

वैभव महाराष्ट्राचे!

सह्याद्रीची उपरांग असलेल्‍या बाळेश्वर रांगेच्या एका सोंडेवर शहागड उर्फ पेमगिरी उर्फ भीमगड हा किल्ला आहे. गडमाथ्यापर्यंत गडी मार्ग आहे. गडाच्या माचीवर एक मंदिर असून या मंदिराच्या थोडे वरून पुरातन शिडी मार्ग गडावर जातो. पेमगिरीच्या घाटात डोक्यावर बांधलेल्या लोखंडी कमान वजा पुलाच्या पुढे गेल्यावर गडाचे बुरूज व तटबंदीचे अवशेष दिसतात. गडावर मोठी आणी खोल अशी चार पाणी टाकी आहेत. त्याच्या जवळच अष्टभुजाधारी महाशक्तीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरा मागे राजवाड्याचा पाया आणी पायऱ्या दिसतात. याच ठिकाणी नवे मंदिरही बांधलेले आहे. गडाच्या उत्तरेस ठिक ठिकाणी पाणी टाकी आणी तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. बाळंतणीचे टाके नावाचे एक अप्रतिम टाके ही गडावर पहायला मिळते. गडावरून बाळेश्वर रांग फार सुंगर दिसते. बाळेश्वराच्या शिखरावर बाळेश्वराचे पुरातन मंदिर असून एकदा जरूर पहावे.

संगमनेर पासून कळस मार्गे पेमगिरी गाव गाठायचे. गावात बरेच प्राचीनकाळचे वाडे, मंदिरे, विहीरी पहायला मिळतात. गावातील प्रसिद्ध हनुमंत मंदिर फार सुंदर आहे तेथे नतमस्तक व्हायलाच हवे. मंदिरा मागे ओढ्यालगत एक चिरेबंदी पायऱ्यांची सुरेख विहीर असून आत शके १६२८ सालचा शिलालेख कोरलेला आहे. पेमगिरीच्या दक्षिणेस काही अंतरावर पेमगिरीचा महावटवृक्ष असून त्याचा घेरा पुर्ण परिसरात पसरलेला आहे. याच नितांतसुंदर ठिकाणी बऱ्याच पुरातन देवतांच्या मुर्ती आहेत.

हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली ती याच शहागडवर. सन १६३३ मध्ये शहाजीराज्यांनी किल्ले जीवधनवर कैदेत असलेला निजाम शहाचा १० वर्षाचा वारसदार ‘मुर्तीजा’ याची सुटका करून त्याला पेमगिरीच्या भीमगडवर सन्मानपूर्वक गादिवर बसवून स्वतः वजीर म्हणून कारभार पाहू लागले. सन १७३८ ते १७४० दरम्यान पहिल्या बाजीरावाने प्रेयसी ‘मस्तानी साहेब’ हीला वास्तव्यास ठेवले होते.

किल्ले शहागड उर्फ पेमगिरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment