शिवकालीन दुर्ग व्यवस्था.
लेखनसिमा!
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
प्रत्येक गडावर महाराजांची नजर होती. महाराजांचे हेरखाते इतके मजबूत होते कि गडावरील प्रत्येक संशयास्पद हालचाल महाराजांचे हेरखाते टिपत असे.परिणामी कितीतरी किल्ले महाराजांनी बऱ्याचदा न लढताच जिंकले पण स्वतःचा एकही किल्ला कधीच फितुरीने गमावला नाही. किल्ल्यावर पाण्याचा वापर काटकसरीने केला जात असे. नैसर्गिक झऱ्यांचा शोध घेऊन तळी आणि टाक्या दगड फोडून बांधल्या जात आणि हेच दगड पुन्हा तटबंदीसाठी वापरले जात. गडावर राजमहालाशिवाय कुठलीही इमारत मोठी नसे. याशिवाय आंबा, पेरू, चिंच, फणस यांसारख्या वृक्षांची लागवड आणि भाज्यांची लागवड गडावर करण्यात येई. दारुगोळा हा वस्ती पासून दूर असे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी साठवला जात असे .
गडावर वैद्य, शास्त्र वैद्य, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, लोहार, ब्राह्मण, ज्योतिष, वैदिक, रसायने वैद्य, झाडपाल्याचे वैद्य, पाथरवट, सुतार, चांभार, न्हावी ही मंडळी आवर्जून ठेवली जात..
वेळोवेळी किल्ल्यांची डागडुजी करण्यात येई.पावसाळा सरला कि तटावरचे गवत कापण्यात येई. तसेच तटबंदी आणि बुरुजांमध्ये वेल आदी झाडे उगवल्यास ती काढून टाकण्यात येत असत.
प्रत्येक किल्ल्याचा त्याच्या महत्वानुसार वार्षिक महसूल असे.
तर वरील प्रमाणे शिवकाळात कारभार चालायचा. महाराजांनी आखून दिलेल्या नियमांमुळे गड कारभार अगदी चोख राहत असे.
हिंदवी स्वराज्यात किल्ल्यांची संख्या स्वराज्यात चित्रगुप्त बखरीत 361, तर चिटणीसाच्या बखरीत 317 तर सभासद बखरीत एकूण 240 म्हटली आहे.
याशिवाय राजधानीच्या किल्ल्यावर 18कारखाने आणि 12 महाल असत.
#अठरा कारखाने
कारखाने म्हणजे किल्ल्यावर लागणाऱ्या वस्तूंचे कारखाने अथवा कोठारे असे म्हणू शकतो.
1) कोषागार : खजिना आणि मौल्यवान वस्तू धातू ठेवण्याची जागा.
2) रत्नशाळा : वेगवेगळी नवरत्ने ठेवण्याची जागा.
3)अंबारखाना : धान्यसाठा करण्याची जागा.
4) आबदारखान : वेगवेगळी पेये ठेवण्याची जागा.
5) नगारखाना : नगारे वाजविण्याचे साहित्य ठेवण्याची जागा.
6) मल्लशाला : व्यायामशाळा.
7) जामदारखाना : वस्त्रागार, कापडी तागे आदी ठेवण्याची जागा.
8)शस्त्रागार : वेगवेगळी शस्त्रे ठेवण्याची जागा.
9) मुदपाकखाना : स्वयंपाकघर.
10) शरबतखाना : औषधालय.
11) शिकारखाना : शिकारीचे साहित्य ठेवण्याची जागा.
12) दारूखाना : दारुगोळा ठेवण्याची जागा.
13) शहतखाना : मत्स्यालय.
14) गजशाळा : हत्तीचा गोठा.
15) फरासखाना : राहुट्या, शामियाने यांचे सामान आणि कापड चोपड झालरी इत्यादी ठेवण्याची जागा.
16) तोफखाना : तोफांचे साहित्य ठेवण्याची जागा.
17) दप्तरखाना : हिशोबाचे साहित्य ठेवण्याची जागा.
18) उष्टरखाना : उन्टशाला.
#बारा महाल
महाल म्हणजे भंडारगृहे असे.
१) पोते - कोशागार
२) थट्टी - गोशाळा
३) शेरी - आरामशाळा
४) वहिली - रथशाळा
५) कोठी - धान्यागार
६) सौदागीर- व्यापारी
७) टकसाल - मुद्राशाळा
८) दरुनी - अंत:पुर
९) पागा - अश्वशाळा
१०) ईमारत - शिल्पशाळा
११) पालखी - शिबिका
१२) छबिना - रात्रिरक्षणं
या व्यतिरिक्त कमी अधिक काही गडांवर बाजारपेठ, साहुकारपेठ इत्यादी सुद्धा असत.
तर अशाप्रकारे जर राजधानीचा गड असेल तर त्यावर राबता खुप असे. शिवाय वेगवेगळ्या मंत्र्यांचे त्यांच्या हुद्द्यानुसार वाडे असत.
शिवकाळात दुर्ग व्यवस्था चोख होतीच हे वेगळे सांगायची गरज नाही पण महाराजांनी गडाचा कारभार हा पारंपारिक पद्धतीने न ठेवता स्वतः आखून दिलेल्या पद्धतीने बनवला. त्यामुळे कुठेही कारभारात गलथानपणा दिसत नाही.
म्हणूनच महाराजांसारखा दुर्गवेडा आणि दुर्गदक्ष राजा शोधून सापडणार नाही.
No comments:
Post a Comment