वैभव महाराष्ट्राचे!
प्राचीन थळ घाटातुन सोपार आणि कल्याण बंदरातून होणाऱ्या व्यापारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घाटाखाली बळवंतगड तर घाटावर किल्ले त्रिंगलगड (त्रिंगलवाडी) वसवले आहेत. त्रिंगलगड भटकंती साठी मुंबई नाशिक महामार्गावरील टाके घोटी किंवा इगतपुरी गावा मधून पारदेवी गावामार्गे वाकी नदी तीरावरील त्रिंगलवाडी गाव गाठावे. गावा मागे त्रिंगलवाडी धरणाची भिंत आहे, धरणाच्या पाण्याला वळसा मारून गडाच्या पायथ्याच्या अगदी जवळ असलेल्या वस्तीत जायचे. किल्याकडे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूस गडावरून डोंगर धार उतरत आली आहे. त्या डोंगर धारेवर स्वार होऊन किल्याच्या मुख्य प्रस्तराखाली पोहोचायचे. या ठिकाणावरून प्रस्तराच्या दोन्ही बाजूने गडमाथ्यावर जाण्यासाठी मार्ग आहेत. आपण जाताना किल्याच्या प्रस्तरास डाव्याबाजूस ठेवत चालायचे. एका दगडास बऱ्याच ठिकाणी शेंदूर लावलेला आहे, त्याच्या जवळच एक भुयारी टाके आहे. काही अंतरावर कातळकोरीव पायऱ्या दिसतात, त्या पुर्वेकडील दरवाजातून गडावर घेऊन जातात. पायऱ्यांवर नचढता अजून पुढे गेल्यावर एक गुहा पहायला मिळते. गुहा मोठी असून T आकारात आहे. गडाच्या पायऱ्या चढताना मध्ये डावीकडे छोटी कोरीव गुहा लागते. पायऱ्यांनी आरोहन करून आल्यावर घडीव चिऱ्यांची तटबंदी दिसते, तसेच पडक्या दरवाज्याच्या भग्नावशेषातून गडप्रवेश होतो. गडमाथ्यावर दक्षिणोत्तर पसरलेल्या टेकडीच्या डाव्या टोकावर वाड्याचे भग्नावशेष दिसतात आणि बाजूलाच बुजलेले पाण्याचे टाके ही दिसते.
गडाच्या सर्वोच्च माथ्यास डावीकडे ठेवत जाताना, कड्यालगत एक पडकी इमारत आणी एक पाणी टाके दिसते. डावीकडील टेकडीच्या पायथ्याशी एक गुहेत आणी दोन जमिनीत पाणी टाकी आहेत. उत्तर टोकाकडे एक देऊळ पहायला मिळते, देवळाच्या बाहेर भगवा ध्वज आणि त्रिशूळ उभा केलेला आहे. देवळाच्या बाहेर शिवलिंग असून देवळामध्ये श्री हनुमान, श्री गणेश आणि श्री पार्वती देवतेच्या दगडी मूर्ती आहेत. मंदिरा पासून जवळच एक पाणी टाके आहे, त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. देव दर्शन करून मंदिरामागे असलेला गडाचा सर्वोच्य माथ्या गाठायचा. किल्याचा माथा फारसा मोठा नाही, तसेच माथ्यावर कोणतेही अवशेष नाहीत, मात्र येथून पूर्वेला कावनाई किल्ला, उत्तरेस किल्ले त्रंबकगड, हरिहर व भास्करगड तर दक्षिणेस सह्याद्रीचे सर्वोच शिखर कळसुबाई आणि अलंग, मदन, कुलंग हे किल्ले दिसतात. टेकडी वरून पलिकडे उतरल्यावर उजवीकडे वळून कड्याकडे निघावे. आपल्याला जमिनीसलग एक चौकोनी भुयार दिसते. हा त्रिंगलवाडी किल्याचा कोकणाकडील अप्रतिम कातळकोरीव दरवाजा आहे. पायऱ्या उतरून खाली आलो की दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दरवाजातून बाहेर पडल्यावर, दरवाज्याच्या कमानीवर सुबक नक्षीकाम केलंल असून कोरून काढलेली शतकमळे आणि शरंभ पहायला मिळतात. पुढे काटकोनात वळून तब्बल बावन्न पायऱ्यांनी गडउतार होतो. या पायऱ्यांच्या बरोबर समोर आणी दरवाजाच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर ५ ते ६ फूट उंचीची महाबली हनुमंताची भव्य दिव्य मुर्ती कोरलेली आहे. पवनपुत्राचे दर्शन करून पायऱ्या उतरून गडाच्या पश्चिम कड्याखाली यायचे. कड्याला डावीकडे ठेवत वळसा मारला की आपण पुन्हा गडाच्या धारेवरील वाटेवर येऊन पोहोचतो.
त्रिंगलगडाची भटकंती पुर्ण
झाल्यावर परतीच्या प्रवासात गड पायथ्याशी असलेली पांडवलेणी नक्की पहायची.
या साधारण १०व्या शतकातील जैन लेण्या असाव्यात. लेणी आयताकार असून, ओसरी,
विहार आणी विहारातील कोनाडे अशी रचना आहे. विहाराच्या प्रवेशद्वारावर केलेल
सुंदर नक्षीकाम, ओसरीच्या छतावर एका वर्तुळात कोरलेल्या सुबक मानवाकृती
अप्रतिम आहे. गाभाऱ्यात प्रथम जैन तिर्थनकार वृषभनाथांची खंडित झालेली
मुर्ती आहे. मूर्तीखाली असणारा शिलालेख पुसट झालेला आहे. लेण्यात नक्षीदार
खांब, गवाक्ष, खिडक्या, छताचे अलंकरण, प्रवेशद्वार अतीसुंदर प्रकारे
कोरलेले आहे. लेण्यामध्ये पाण्याचे छोटे कुंड आहे, त्याचे पाणीही थंडगार
आणी चवदार आहे. लेण्याच्या समोरील पटांगणात बऱ्याच सुंदर मुर्तींचे
भग्नावशेष पहायला मिळतात. त्रिंगलवाडी गावकऱ्यांनी लेणी आणी परिसराची सफाई
उत्तर ठेवलेली पहायला मिळते.
किल्ले त्रिंगलगड (त्रिंगलवाडी), ता. इगतपुरी, जि. नाशिक
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment