शिवकालीन दुर्ग व्यवस्था.
भाग १
लेखनसिमा!
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
इंग्रजी इतिहासकार ग्रँड डफचे वाक्य आहे तो म्हणतो,
"किल्ल्यातुन आतबाहेर, कोणी केव्हा जाणे, गस्त केव्हा घालणे, पहारे चौक्या सांभाळणे, व त्याजवर देखरेख ठेवणे या गोष्टींविषयी अगदी सक्तीचे व सूक्ष्म नियम शिवाजीने केलेले असून, प्रत्येक शाखेवरील मुख्य अधिकाऱ्यांची बारीक बारीक कामे सुद्धा ठरवलेली होती. आणि ते मोडण्यास तिळभर जागा नव्हती."
वरील उताऱ्यावरून शिवाजी महाराजांचे गड कोटांबद्दल कडक धोरण दिसते. आणि अशाप्रकारच्या शिस्तीमुळेच महाराज प्रदीर्घ काळ आग्र्यात मुघलांच्या तावडीत अडकून सुद्धा स्वराज्यातील एक सुद्धा गड फितूर नाही झाला. गड किल्ल्यांसोबत महाराजांनी भक्कम मनाची आणि स्वराज्य निष्ठेची माणसे घडवली होती.
आजच्या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्ग कारभार आणि त्यातील बारकावे पाहणार आहोत.
"संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग " हे वाक्य रामचंद्रपंत आमात्यकृत "आज्ञापत्र" या बहुमोल ग्रंथातील आहे.सदर ग्रंथ रामचंद्रपंतांनी महाराजांच्या आज्ञेने लिहिला होता. यातूनच शिवकाळात स्वतः महाराज दुर्ग बांधणी बरोबरच दुर्ग संरक्षण आणि दुर्ग व्यवस्थापनात किती आग्रही होते हे दिसते. असे हे परम नाजूक कार्य विशद करताना पंत पुढे सांगतात, " गडकोट हे संरक्षणाचे कार्य फार नाजूक, परम नाजूक स्थळास एखादा मामलेदारादी जे लोक ठेवणे, त्यांनी भेट केल्यामुळे अथवा शत्रू चालून आला असता नामर्दी केल्यामुळे अथवा त्याचे गाफीलीमुळे स्थळास दगा जाहला तर
स्थळासहित तितके राष्ट्र हातीचे गेलेच. उरल्या स्थळास व राष्ट्रास उपसर्ग लागला. शत्रू प्रबळ येऊन पावला असता जो गेला किल्ला, त्या किल्लेकराचे वारे इतर राहिले किल्लेकरास लागोन तेही स्थळास अपाय योजितात. म्हणजे एक राज्यसच धक्का बसतो. या कारणे किल्लेकोट जतन करणे ही गोष्ट सामान्य असे न समजता, तेथील उस्तवारी व शासन यांस तिळतुल्य अंतर पडो न द्यावे".
याचाच अर्थ एका गडावर फितुरी झाली तर त्याचा संसर्ग दुसऱ्या गडावर होऊ शकतो म्हणून डोळ्यांत तेल ठेवून लक्ष ठेवावे आणि कर्तव्यात तिळमात्र कसूर करू नये असे तिखट आणि काहीसे काळजीचे उदगार काढल्याचे दिसतात.
मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गडाचे सामर्थ्य हे, त्या गडावरील असणाऱ्या लोकांच्या मनोधैर्यावर ठरते. किल्ला कितीही बळकट असुदेत पण मजबूत मनाची माणसे त्यात नसतील तर तो किल्ला लढविला जाऊ शकत नाही. एखाद्या दुर्गाची संरक्षण व्यवस्था जितकी चोख असेल तितका तो दुर्ग जास्त दिवस लढवला जातो. साठ
मावळ्यांनिशी एका दिवसात कोंडाजी फर्जंदांनी जिंकलेला किल्ले पन्हाळा मुघलांना राजाराम महाराजांच्या काळात 2 वर्षे लढून सुद्धा जिंकता आला नाही. यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी आणि शिस्तबद्ध कारभाराचा अंदाज आपल्याला येतो. महाराजांनी दुर्ग संरक्षण यंत्रणा आणि कारभार इतका चोख ठेवला होता की, महाराजांच्या पश्चात या दुर्गांच्या सहाय्यानेच मराठा स्वराज्य टिकले हा इतिहास तर सर्वश्रुत आहेच.
कितीतरी वेळा महाराज गडाची संरक्षण व्यवस्था पाहण्यासाठी अकस्मात भेट देत. सामान्यपणे गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद होत आणि सूर्योदयाला ते पुन्हा उघडत. एकदा महाराजांनी पन्हाळा किल्ल्याचे द्वार संध्याकाळी बंद झाल्यावर सुद्धा बाहेरून उघडतात का हे तपासण्यासाठी स्वतः भेट दिली आणि 'खासे आम्ही आलो आहोत द्वार उघडा' असा निरोप पाठवला परंतु द्वारपालांनी आणि किल्लेदाराने सकाळ पर्यंत द्वार न उघडल्याचा पुरावा वाचण्यास मिळतो. यावरून आपल्यास अंदाज येऊ शकतो.
No comments:
Post a Comment