वैभव महाराष्ट्राचे!
पेठ - सावळघाट - दिंडोरी या पुरातन व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी बांधलेल्या गिरीदुर्गातील एक मोती
देहेरगड! समुद्र सपाटीपासून १०९१ मीटर उंचीच्या किल्ले देहेरगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे. नाशिक मधून उत्तरेस जाणाऱ्या नाशिक - पेठ मार्गावरील आशेवाडी हे गाव किल्ले रामशेजच्या पायथ्याशी आहे. किल्ले रामशेजच्या पश्चिमेस देहेरगड - भोरगड ही किल्ल्यांची जोडगोळी आहे. त्यातील किल्ले देहेरगडवर जाण्यासाठी आशेवाडीच्या पुढे ४ किलोमीटरवर देहेरवाडी आहे. किल्ले देहेरगड व किल्ले भोरगड हे दोन्ही किल्ले एकमेकांना डोंगरधारेने चिकटलेले आहेत. किल्ले भोरगडावर एअरफोर्सने रडार बसविलेले आहे त्यामुळे तिकडे जाण्यास मनाई आहे. हा अतिदक्षतेचा परिसर असल्यामुळे किल्ले देहेरगडावरही जाऊन दिले जात नाही. गावामागे गडावरून आलेली डोंगरसोंड उतरलेली आहे, तिच्या दिशेने निघावे. पुढे डोंगर उतारावर शेतातील एकमेव घर आहे. याच्या पुढून शेतातून एक पायवाट डोंगरसोंड चढून जाते. या वाटेने पहिल्या टप्प्यावर असलेल्या सपाटीवर पोहचायचे. गावकऱ्यांनी सांगीतल्या प्रमाने एका जागी जास्त वेळ रेंगाळायचे नाही, तेथील घरांची जोती पाहून तडक समोर दिसणाऱ्या गडाच्या नाकाडाकडे निघायचे. नाकाडाच्या उजवीकडून जाणारी मळलेली वाट पकडून चढाई करायची.
गडाच्या कातळाला भिडाल्यावर एक छोटे टाके दिसते, पण
त्यात पाणी नाही. कातळ डावीकडे ठेवत पुढे सरकले की गडाच्या अप्रतिम
कातळकोरीव पायऱ्या नजरेस पडतात. एका वेळेस एकाच माणसाला चढता येईल येवढ्या
छोट्या व अंगावर येणाऱ्या पायऱ्या आहेत. गडावर वर्दळ नसल्यामुळे पायऱ्यान
वर खुप माती, दगडी झाडांच्या फांद्या पडलेल्या असतात. त्यातून सावधपणे चढाई
करायची. पुढे एका ठिकाणी दहा ते बारा फूूट पायऱ्या तुटलेल्या आहेत, तेथील
दगडाच्या फटीतून सोपे प्रस्तरारोहण करून वर चढायचे. पुढे चांगल्या
पायऱ्यांनी गडाचा नामशेष झालेल्या दरवाजात पोहचायचे. कातळात कोरलेला दरवाजा
पुर्णपणे नष्ट झालेला आहे. त्या चिटकूनच पाण्याचे प्रशस्त कोरडे टाके आहे.
जवळच बुरूजयुक्त तटबंदी नजरेस पडते. टाक्याच्या वर एका झाडाखाली वेताळाची
शिळा आहे. टाक्याच्या मागिल बाजूस असणाऱ्या पायऱ्यांनी गडाच्या दुसऱ्या
उधवस्त दरवाजात जाता येते. दरवाजा पुढील पायऱ्यांनी गडाचा माथा गाठता येतो.
गडाचा माथा छोटा असून घरांची जोती आहेत. गडाच्या पुर्वेस एक चांगले टाके
असून त्यात पाणी आहे. त्याला लागूनच अजून तीन टाकी आहेत, पण ती तुटलेली
आहेत. शेजारीच महादेवाचे शिवलिंग आहे. त्याच्या मागे वास्तुचे अवशेष आहेत.
वास्तूच्या जवळून गडाला वळसा मारत गडाच्या दक्षिणे कडून पश्चिमेस जाताना
वाटेत प्रथम तीन टाकी आहेत. त्यातील दोन टाक्यात पाणी आहे. पुढे सरकत वाट
भोरगडाकडील टोकाकडे जाते, तेथे पाण्याची तुटकी तीन टाकी आहेत. ते पाहून
पुढे अर्ध वर्तुळाकार फिरत गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या तीन टाक्यांपाशी
पोहचायचे. या टाक्यांत पाणी नसून एका टाक्याच्या कडेला दगडात कोरलेले
शिवलिंग आहे. ईथूनच किल्ले भोरगडाचे रूप मनसोक्त पहायचे. गडावर जास्त वेळ
रेंगाळायचे नाही, कारण गडावर संशयास्पद हलचाली दिसल्याकी लगेच तेथे
कमांडोची हजेरी लागते.
किल्ले देहेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment