Followers

Monday, 18 May 2020

#वाईकोट






#वाईकोट
लेखनसीमा #अपरिचित इतिहास
ढोल्या गणपतीच्या कुशीत अन पसरणी घाटाच्या मुशीत वसलेलं एक निसर्गसंपन्न टुमदार शहर असलेलं वाई म्हणजे पर्यटक,इतिहासप्रेमींसाठी आवडत ठिकाणच.शिवपूर्वकाळापासून ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामापर्यंतच्या इतिहासाची स्मृती गाठीशी बांधलेलं हे शहर. पेशवे सरदार रास्ते यांनी उभारलेलं ढोल्या गणपतीच्या देऊळामुळे वाईची ख्याती जनमानसांत पसरलली आहे. त्यापुढे जाऊन येथील पेशवेकालीन घाट,वाडे किंवा तत्सम वास्तूंमुळे इतिहासप्रेमींच्या तसेच स्थापत्यशैलीचा अभ्यास करणाऱ्यांच्या ताईत असलेलं हे ठिकाण.अलीकडच्या 10-15 वर्षात तर bollywood चे आवडते शूटिंग location म्हणून वाईचा उल्लेख होऊ लागला आहे. या सर्वांबरोबरच वाईत आणखी एक ऐतिहासिक महत्वाची वास्तू होती ती म्हणजे "वाईचा कोट". बऱ्याच जणांना या बद्दल फारशी माहिती नाही.बहमनी काळात १४५३ ते १४८० दरम्यान वाई ला प्रामुख्याने लष्करी छावणीचं रूप आलं. पुढे बहमनी साम्राज्याची विभागणी झाल्यावर या प्रदेशावर मुख्यतः आदिलशाही सरदारांची मंडलिकी असल्याचं दिसून येतं. वाईवर आपलं प्राबल्य दाखवण्यासाठी नेहमीच या सरदारांची एकमेकांवर कुरघोडी होत.अफझल खानाकडे जेव्हा वाईची सुभेदारी आली तेव्हा त्याने वाईच्या दक्षिणेस(आताची रविवार पेठ) तिथे राहण्यास वाडा बांधला. "कातिल मुतमर्रीदान व काफिरान, शिकांद ए बुनियादे बुतान" (अर्थ: काफिर(मराठे) व बंडखोर यांची कत्तल करणारा आणि मूर्तींचे पाय उखडून फेकणारा) अशी बिरुदावली लावणारा अफझुल खान कसा मूर्ती विध्वंसक होता हे त्याच्या या वाडा बांधणीतून कळून येईल.किकलीचे प्रसिद्ध मंदिराची तोडफोड करून त्याचे घडीव दगड हे वाड्याच्या तटबंदीत वापलेले आढळून येतात(एका लेखानुसार, कदाचित वाईतील ही मंदिर असू शकते). वाड्याच्या अगदी शेजारीच वाहणाऱ्या ओढ्याच्या बाजूने तटबंदी केलेली आढळून येते. पण सध्या पूर्णतः दुर्लक्ष झाल्याकारणाने ती तटबंदी झुडपात लुप्त झाली आहे. या कोटाचं एका भागात हा भव्य वाडा वसला होता त्यावरून अंदाज लावू शकतो की संपूर्ण कोटाचा घेरा किती असू शकतो. इथूनच पुढे फुलेनगरच्या दिशेने(साधारण 150 ते 200 मीटर) गेल्यास भरवस्तीत असलेल्या मस्जिदीच्या बाजूने तटबंदी आणि बुरुज आढळून येतात. अफझलखानाच्या वधापूर्वी त्याचा शेवटचा मुक्काम याच कोटात झाला. पुढे प्रतापगड पायथ्याशी अति-आत्मविश्वासाने भरलेला हा बत्तीस दातांचा बोकड महाराजांनी स्वराज्यभवानीस अर्पण केला आणि जावळीच्या निभिड अरण्यात वाटा रोखून बसलेले मावळे खानाच्या गाफील फौजेवर तुटून पडले. यातून कसे-बसे वाचलेले सरदार वाईच्या कोटात आश्रयाला आले. नेतोजी पालकरांनी वाई लुटून फस्त केली अन शरण आलेल्या सरदारांना सोडून दिले. या धामधुमीत वाई मराठ्यांच्या ताब्यात आली खरी पण जास्त काळ नाही. पुढे वाई कोट सहजासहजी ताब्यात येत नाही पाहुन राजांनी हळूहळू वाई शेजारील पांडवगड, वैराटगड आणि केंजळगड जिंकून घेतले. यातील केंजळगड तर राज्याभिषेकाच्या अवघ्या महिनाभर आधी राजांनी जिंकून घेतला. हे सारे किल्ले जिंकून वाई भोवती फास गुंडाळला अन एकेदिवशी थेट वाईवरच झडप घातली. तत्पुर्वी केंजळ येथील महंत केवल भारती यांच्या दर्शनाला राजे गेले. तिथे महंतांनी आशीर्वाद दिला की "वाईचा कोट तुम्हांस दिला! कार्यसिद्धी जाहलियाउपरी आपणास एक स्थळ अनुष्ठानास एकांत करून देणे." या आशीर्वादास राजांनी कर्तृत्वाची जोड दिली अन वाईचा कोट धुळीस मिळवला अन पवित्र कृष्णातीर्थ मुक्त केले. खुद्द राजेंनी या कोटाचा सुपडासाफ केल्याने याचे आज फार कमी अवशेष तग धरून आहेत त्यातीलच काही छायाचित्रे देत आहे. सद्यस्थितीत त्या वास्तूची फार कमी जणांना माहिती असल्या कारणाने तिथे पूर्णतः नागरिकीकरण झालेले आहे आणि यात बरेच अवशेष गायब झाले असणार यात शंका नाही. आपल्याकडील एकंदरीत इतिहासाची 'अति'आवड पाहता ही वास्तू देखील पुढे राहील याची शाश्वती नाही म्हणून हा लेखन प्रपंच..!

No comments:

Post a Comment