दुर्ग प्रकार : एका संक्षिप्त परिचय
भाग 3
लेखनसिमा
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
*जलदुर्ग *
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या बेटावर कोट, परकोट, तटबंदी बुरुंज बांधून तयार केलेला किल्ला म्हणजे 'जलदुर्ग ', यांत सिंधुदुर्ग, खांदेरी -उंदेरी, सोनगड, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग आणि जंजिरा हे दुर्ग येतात.
जलदुर्गास अरबी मध्ये जझीरा म्हणतात त्याचेच अपभ्रंश रूप आहे जंजिरा. जंजिऱ्याचे खरे नाव मेहरुब जझीरा म्हणजेच 'चंद्राची कोर ' असा अर्थ होतो तर असा हा किल्ला प्रथम रामा पाटील उर्फ रामाऊ ह्या कोळ्याने बांधला नंतर सिद्दींनी तो फसवून त्याच्याकडून हस्तगत केला आणि त्याचे विस्तृत बांधकाम केले. तर महाराष्ट्राच्या सागर किनारी भागात अनेक जलदुर्गांची साखळीच आहे आणि जगाच्या पाठीवर दिसत नाही इतकी विविधता भारतीय जलदुर्गांमधे पाहण्यास मिळते. छत्रपती शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग जणू मराठ्यांची पाण्यातील राजधानीच ह्या किल्ल्याच्या बांधकामातील वैज्ञानिक बारकावे पाहिल्यास महाराजांच्या स्थापत्यशास्त्रातील ज्ञानाचा प्रत्यय येतो. (सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल विस्तृत माहिती वर स्वतंत्र लेख क्रमशः येणार आहे ).
*फायदे*
स्व रक्षणाच्या दृष्टिकोनातून जलदुर्ग हा तृतीय स्थानी येतो. ह्या प्रकारच्या किल्ल्यावर चहूबाजूंनी वेढलेले पाणीच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावते. उत्तम रसद आणि भरपूर दारुगोळा असल्यास जलदुर्ग सुद्धा बरेच दिवस तग धरू शकतो. भरती-ओहोटी, सागरातील अंतर्गत जल प्रवाहांमुळे उसळणाऱ्या लाटा जलदुर्गाला
नैसर्गिक संरक्षण पुरवतात.परंतू जलदुर्गाच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. जलदुर्गातील आश्रय राजास त्याच्या शासनास मर्यादित करतो.त्यामुळे भूमीवरील अधिपत्य राजा गमावू शकतो. तसेच पावसाळ्यात किनारी भागाशी संपर्क तुटतो. परंतु सागरी व्यापारावर आरमाराच्या सहाय्याने
नियंत्रण ठेवण्याचे कार्य जलदुर्ग करू शकतात. तसेच देशाच्या सागरी सीमेचे संरक्षण किंवा सागरी आक्रमकांपासूम भूमीचे संरक्षण जलदुर्गांच्या सहाय्याने होऊ शकते.
No comments:
Post a Comment